अधीन

किती वर्षं झालीत रे तुला मला भेटून…..
किती वर्ष झालीत मी तुझी होऊन
अजूनही आठवतो ना तो दिवस
जेव्हा तुझ्या नजरेनं तू मला फ़सवलंस
गाफ़िल क्षणी नाही रे….. चक्क उघड उघड फ़सले
पण तुझ्याही डोळ्यात मला मीच दिसले
तुझं माझं गणित तेव्हाच जमलं
नजरेतलं कोडं काळजाला उलगडलं
दोघांनीही बाजी एकाच वेळी जिंकली
आणि तेव्हापासून आपल्यातली नसलेली स्पर्धाही संपली
विजयाची माळ आपण एकमेकांना घातली
मी पण सारं विरघळून गेलं
द्वैतातून एक गोड अद्वैत जन्माला आलं
मी मनात विचार करायचे
आणि तू त्याला मूर्त स्वरुप द्यायचास
माझे शब्द ओठावर यायच्या आधीच
तू सारं वाचून काढायचास
पण मला मात्र नाही जमलं तुला वाचायला
तू बराचसा अनोळखीच राहिलास !
प्रत्येक वेळी तू नव्यानं उलगडत गेलास
पण तुझं हे नवेपण सुद्धा सुखावतं रे…..
तुझ्या त्या नव्या प्रवाहात झोकून द्यायला
मला खूप आवडतं
कधी कधी किनारा कुठे….. हे सुद्धा माहित नसतं
पण मी त्याची कधीच काळजी केली नाही
एक विलक्षण कुतूहल, अनामिक ओढ आणि समर्पण…..
हेच काय ते माझं
बाकी सर्व तूच तू
मी किनार्‍याची कधी मनिषा पण केली नाही
तुझा माझा हा प्रवास असाच सुरु असावा
अगदी अनंतापर्यंत…..
मधेच कुठेतरी विसावतोस
तेव्हा तुला डोळे भरुन बघून घेते
न जाणो… इतक्या वेगाच्या प्रवासात तुझा हात सुटला तर…..
नकळत तुझ्यावरची पकड थोडी घट्ट होते
तुझ्या आणखी जवळ येते
तुला सगळं कळत असतं
सुखावत असतोस तू
तुझा अहंकार जपत मी ही…..
आनंदानं तुझं श्रेष्ठत्व मान्य करते
माझं अस्तित्व तुझ्या स्वाधीन करुन…..
आणि सर्वस्वी तुझ्या अधीन होऊन !