(याच शीर्षकाचा पुलंचा एक लेख आहे. त्यांच्या `तो'चा आणि या तोचा काहीही संबंध नाही. हे शीर्षक दिलंय ते या तोच्या एका वाक्यामुळं.)
तो पॅरोलवर सुटल्याचे समजले तेंव्हा मी आठवड्याभराच्या प्रवासानंतर परतलो होतो. आल्यावर नेहमीप्रमाणे आधीच्या दोन-चार दिवसांची वृत्तपत्रे घेऊन बसलो होतो. आतल्या पानावर एका वृत्तपत्रात ती बातमी होती.
एक काळ असा होता की त्याची कोणतीही हालचाल पहिल्या पानावर झळकायची. आता मात्र, काही काळासाठी का होईना, सुटून आलेला असूनही तो आतल्या पानावर गेला होता. माझ्या मनात त्याच्याविषयी असलेलं कुतूहल जागं होण्यास ती एकच गोष्ट पुरेशी होती. आधी पूर्ण भरात असताना त्याला भेटणं मी टाळलं होतं. त्याचा `लौकीक'च तसा होता. असं नव्हतं की त्याला कोणी भेटत नव्हतं. सारेच त्याच्या दरबारात हजेरी लावायचे. पण, तिथं तशी हजेरी लावणारे त्याचे `भाविक' ठरायचे आणि आपणही त्या पंगतीत जाऊन बसू की काय ही भीती मला वाटत होती; त्यामुळंच मी तिथं गेलो नसेन. पण आता बदलौकीक होण्याचा धोका नव्हता आणि त्यामुळे मी त्याला भेटण्याचा विचार करू लागलो.
भरात असलेल्या काळात त्याच्याकडं जाणाऱ्या प्रत्येकाला रोखीत `प्रसाद' मिळायचा. आता तोही शक्य नव्हता ही बाबही मला कदाचित सुरक्षेची भावना देऊन गेली असावी.
तो होता तसा साधाच माणूस. आपण बरं, आपली नोकरी बरी पंथातला. लग्न झालं होतं. पत्नी घर सांभाळायची. नोकरीतच त्याच्या जगण्यातला तो बदल झाला. एक-दोन कामांमधून पैसे खाता येतात, हे समजल्यावर त्याच्यात बदल झाला. आधी दुसऱ्यानंच `कमावलेल्या' पैशातून त्याला वाटा मिळाला आणि मग त्याला ती किल्ली गवसली. कशी ते त्यानं कधीच सांगितलं नव्हतं. पाहता-पाहता त्याचे रूपांतर साध्या कारकूनातून बडं प्रस्थ होण्यात झालं. तो महाराज झाला. मग त्याचे गावात भाविक तयार झाले. त्यांचा पुंडावा सुरू झाला. मग सारं गावच त्याच्या अंकीत होण्यास वेळ लागला नाही. मी त्या गावात गेलो तेंव्हा ही प्रक्रिया पूर्ण होऊनही गेली होती.
त्या दिवशी कार्यालयात बसलो होतो. गावातला तो माझा तिसरा किंवा चौथाच दिवस असावा. एका वृत्तपत्रात पहिल्याच पानावर त्याची बातमी होती. एकूणच महाराज, बाबा, बुवा म्हटलं की मला तिडीक यायची. (आज येतो संताप, कदाचित ते वयच तसं तिडीक वगैरे येण्याचं असल्याचा तो परिणाम असावा.) त्याही दिवशी ती आली. समोर कोणी आहे - नाही याचा विचारही न करता मी भडकलो: `(त्याच्या उपाधीचा उल्लेख करुन) हा कोण आलाय रे भामटा? आणि त्याची बातमी पहिल्या पानावर?' पुढं मी एक सणसणीत शिवी घालून त्याचं काय करायला हवं तेही सांगून टाकलं.
कार्यालयातील प्रत्येक जण किती नाही म्हटलं तरी हादरला होता. माझ्या, तिथं आधीपासून असणाऱ्या, सहकाऱ्यानं सांगितलं, `तुला त्याविषयी काहीही माहिती नाही, नंतर सांगतो.' असं म्हणतानाच त्यानं समोर बसलेल्याकडं पाहात मला हलकेच चूप राहण्याची खूण केली. मी गप्प झालो. गाव नवं होतं, कशाला आगाऊपणा करा?
ते गृहस्थ गेल्यानंतर सगळ्यांनी मला घेरायचंच बाकी ठेवलं होतं. मग ते गाव, त्या गावातील त्याचं स्थान, त्याची `महती', नगरसेवकापासून मंत्र्यापर्यंत सारे कसे त्याच्या पायाशी बसतात, विरोधात बोलणाऱ्याची कशी मुस्कटदाबी होते, वगैरेचं वर्णन झालं. मग त्याच्या दरबाराच्या सुरस कहाण्याही झाल्या आणि सर्वात शेवटी मघा समोर बसलेले गृहस्थ त्याचे भक्त कसे आहेत आणि त्यांच्यासमोर बोलून मी कसा घोळ केलाय तेही मला ऐकवलं गेलं.
त्यानंतर फार तर तीन महिन्यांचा कालावधी गेला असेल. त्या तीन महिन्यात मी बरंच काही शिकलो. पहिली गोष्ट केली ती म्हणजे आता त्याच्याविषयी काहीही बोलायचं नाही हे ठरवलं. त्याचा पूर्ण अभ्यास करुनच मग आपल्याला काय करायचं आहे ते करायचं असंही निश्चित केलं. मला एकेक गोष्ट पाहाता आली. तो खरंच `सामर्थ्यशाली' होता. त्याच्याकडं पैसा बक्कळ होता. तो वैध मार्गानं आलेला नाही हे साऱ्या गावाला माहित होतं. त्याचं दैवतच त्याला पैसे देते अशी त्या गावानं (अर्थातच, अपवाद होते) समजूत करून घेतली होती. गावातील अनेक कार्यक्रमांमध्ये तो प्रमुख पाहुणा किंवा अध्यक्ष असायचा. त्या कार्यक्रमासाठी त्यानंच बरीच देणगी दिलेली असायची हाही त्यातील एक भाग असायचाच. मंत्री यायचे, त्याचे गोडवे गायचे. त्यानं दिलेल्या देणग्यांची रक्कमच काही कोटीत असल्याचं बोललं जायचं. ही रक्कम तो कोऱ्या नोटांमध्ये द्यायचा, याचं अप्रूपही अनेकांना वाटायचं.
त्याच्या मागं असलेल्यांमध्ये कोण नव्हतं? राजकारणी होते, अधिकारी होते, प्राध्यापक होते, अभियंते होते, डॉक्टर होते, साहित्यिक होते, कवी होते, चित्रकार होते, कलाकार होते, पत्रकार होते. प्रत्येकाचं क्षेत्र त्याच्यासाठी खुलं असायचं. तो प्रत्येक क्षेत्रात असायचा.
एका साध्या कारकुनाकडे इतके पैसे कोठून येतात, हा प्रश्न कोणाला पडलेला नसेल असं नाही. पण त्याच्या खोलात जायचं नाही, असंच जवळपास सर्वांनी ठरवलं होतं. त्यामुळं त्याची ही `समाजसेवा' सुखेनैव सुरू होती. अशा प्रत्येक गोष्टीची एक अखेर असतेच. तशीच त्याचीही होती. गावातील माझा तिसरा महिना सुरू झाला आणि तो जे काही करून पैसे मिळवतो ते सारं `कर्तृत्व' बाहेर आलंच. या महाराजाला बेड्या पडल्या. मग रीतसर खटला चालला आणि त्याला सक्तमजुरी झाली. शिक्षेची चार वर्षं आता झाली होती आणि तो बाहेर आला होता. पॅरोलवर.
पॅरोलवर सुटल्यानंतर तो गावात आला. जिथं अगदी मंत्र्यांच्या हातून `हार-तुरे स्वीकारले' होते तिथं त्याच्या स्वागतासाठी कोणीही नव्हतं. तो आल्याचंही लोकांना कळलं तेही वृत्तपत्रांतूनच. त्यांनीही ती बातमी का केली, हेही एक कोडंच होतं. पण मी त्याऐवजी त्याला भेटायचं आहे यावरच लक्ष केंद्रित केलं होतं. तो होता त्याच्या खेड्यात. आईवडिलांपैकी कोणी तरी आजारी होतं हे त्याच्या पॅरोलचं कारण होतं. त्यामुळं या गावात न थांबता तो तडक खेड्यातच गेला होता.
एका मित्राला सोबत घेऊन मी मोटरसायकलवर त्याचं गाव गाठलं. तो घरीच होता. मला पाहिल्यावर तो ओळखेल असं वाटलं नव्हतं. त्याची-माझी भेट झाली होती ती त्याचा खटला सुरू असतानाच. सुनावणीच्या काळात जवळपास रोजच. पण बोलणं असं कधी झालंच नव्हतं. तरीही त्यानं ओळखलं, अगदी नावानिशी. `या,' म्हणत स्वागत केलं.
घराबाहेर खाटा टाकल्या गेल्या. पाणी आलं. चहा सांगितला गेला. त्याचे काही नातलग होते. त्यांच्यापैकी एक-दोघांच्या ओळखी त्यानं करून दिल्या.
`काय म्हणताय? इकडं कुठं?' त्यानंच सुरवात केली.
`तुम्ही बाहेर आल्याचं कळलं. म्हटलं, भेटावं तुम्हाला. बोलावं.'
`मी काय बोलणार? घरची अडचण होती, म्हणून अर्ज केला. मंजूर झाला, आलो. पंधरा दिवसांनी निघेन.'
तो विषय संपवण्याच्या मनस्थितीत होता, हे माझ्या ध्यानी आलं. त्याचा विषय म्हणजे गाजणाराच. त्याचे राजकीय परिणामही लांबवर जाऊन पोचणारे होते. त्यामुळं त्यानं सावध असणं स्वाभाविक होतं.
इतक्यात बहुदा आम्ही आल्याची वर्दी आत गेली असावी. त्याची पत्नी बाहेर आली. एकेकाळी `कडक' आणि लक्ष्मी पाणी भरणाऱ्या घरातील कर्ती स्त्री म्हणून जे धनीणीचं रूप तिच्याकडं होतं ते आता पार लयास गेलं होतं. त्या काळात तिचा त्याच्या प्रत्येक बाबीत वरचष्मा असायचा. तो सूर मात्र आताही कायम होता.
`काही बोलू नका हं तुम्ही. झालंय इतकं पुरे झालंय. आता काहीही वाढवू नका.' आमच्याकडं न पाहाताच ती त्याला सांगू लागली. तिला थांबवत तोच म्हणाला,
`अगं, कोण आहेत हे तरी बघ. ही माणसं तेंव्हा आपल्याकडं कधीही आली नव्हती. आजच पहिल्यांदा आली आहेत.' त्याचा संदर्भ त्या काळात त्याच्याकडं `प्रसाद' घेण्यासाठी जाणाऱ्यांकडं असावा.
मीच म्हणालो, `काळजी करू नका. आम्ही काहीही काढून घेण्यासाठी आलेलो नाही.'
तिचा विश्वास बसला नाही, हे स्पष्ट दिसत होतं. कदाचित माझ्या किंवा माझ्या मित्राच्या चेहऱ्यावर बेरकी भाव आले असावेत. कितीही नाही म्हटलं तरी `काही' मिळालं तर मला ते हवंच होतं. या प्रकरणाचे सर्वदूर पोचणारे लागेबांधे आणि त्यातून अलगद सुटलेले बडे मासे हे सर्वश्रुतच होते. सुटलेले हे मासे कुठं अडकतात का हे माझं कुतूहलही कायम होतं. म्हणूनच तर मी त्याला भेटायला आलो होतो.
`तरीही नको. आता झालंय ते आम्हालाच बास झालंय. आयुष्य उद्ध्वस्त व्हायचंच काय ते बाकी आहे.' एकेकाळी हा माणूस आणत असलेल्या नोटांवरच आपणही `राज्य' केलं होतं हे ती `लक्ष्मी' विसरू लागली होती बहुदा. त्यामुळंच आता ती विरोधाचा सूर लावू लागली होती.
त्यानंच हस्तक्षेप केला. `काळजी करू नकोस. आता आपलं उद्ध्वस्त व्हायचं काही बाकी नाही. गेल्या चार दिवसात किती जण आले यावरून तुला ते कळायला हरकत नाही.' हा माणूस बऱ्यापैकी विचार करतो हे माझ्या लक्षात आलं. आधी त्याची प्रतिमा, `कोणीही यावं आणि गंडवावं' अशी अगदी `परोपकारी गोपाळ' अशीच होती. कदाचित, त्यावेळी तो तसा असावाही आणि `लक्ष्मी'चा स्रोत आटल्यानंतर विपन्नतेनं (आधीच्या तुलनेत) लादलेल्या परिस्थितीनं त्याला ते शिकवलं असावं.
थोड्या नाराजीनंच ती आत गेली. त्यानं माझ्याकडं पाहिलं.
`काय वाटतं तुम्हाला हे जे काही सारं झालं आहे त्याविषयी?' मी विचारलं.
`तुम्हाला काय वाटतं, मला काय वाटत असावं याविषयी?' त्यानं मलाच विचारलं.
माझ्याकडं उत्तर नव्हतं. मी त्याच्याचकडे पाहात राहिलो.
`काय वाटणार आहे? शिक्षा झाली आहे, ती भोगायची आहे. आत्ता कुठं एकाच खटल्याचा निकाल लागला आहे. अजून १४ बाकी आहेत. सगळ्यांचा विचार केला तर एक गोष्ट स्पष्ट आहे. मला होणारी जन्मठेप आजन्मच असणार आहे. एकदा हे समजल्यावर बाकी विचार कशाला करायचा?'
`तुम्ही फारच तात्त्विक होताय. यांना तसं विचारायचं नाहिये. जे झालं त्यात काही तुम्ही एकटे नव्हता. इतरही अनेकजण होते. काही तुमच्यासोबतच आत गेले; काही मात्र बाहेर आहेत...' माझा मित्र बोलू लागला. त्याला रोखत तोच म्हणाला,
`त्यांची नावं मी घेणार नाही. एकदा घेतली आहेत. कबुलीजबाब देताना. आता परत नाही.'
`नाही. आम्हाला त्यांच्या नावात रस नाहिये. तुम्ही त्यांना खरंच काही दिलं आहे की नाही यातही नाही. तुम्ही असे नव्हता. असे का झालात हे समजून घ्यायचंय. तुम्ही असे होण्यात त्यांची काय भूमिका आहे हेच मला हवंय.'
`काय कादंबरी लिहिता आहात काय,' असं विचारून उत्तराची वाटही न पाहता तोच पुढे म्हणाला, `मोह. त्यात फसलो. तो पुरवण्यासाठी जे-जे करावं लागेल त्यामागं धावत गेलो. तेही मिळत गेलं. लोकांनाही त्यातून काही मिळत गेलं. अख्खं गाव माझ्यामागं होतं; मला वाटलं ते कवचकुंडलांसारखंच आहे. तसं नसतं हे कळलं.'
तो पुन्हा तत्त्वज्ञान्यासारखं बोलू लागला होता. मला त्यात काहीही रस नव्हता. तरीही मी विचारलं, `हे असं बोलणं कुठं शिकलात? आत्ता जेलमध्ये?'
`नाही. त्यात शिकण्यासारखं काय आहे? जगणंच माणसाला शिकवतं.'
`तुमची `कवचकुंडलं' गळून पडल्यावर काय वाटलं?'
`खरं सांगू, मी इतक्या हुषारीनं सारं केलं होतं ती हुषारी या लोकांना ओळखण्यात कुठं कमी पडली याचाच आधी विचार मनात आला. त्यासरशी दुसरी एक गोष्ट झाली. या लोकांना तरी का दोष द्यायचा हाही प्रश्न मनात आला आणि त्याचं उत्तरही: नकोच, त्यांना दोष द्यायला...'
त्याच्या हुशारीचा `अभिमान' खराच होता. बँकिंगमध्ये त्याच्या `पराक्रमा'मुळे काही नवे पायंडे पडले होते देशभर.
`प्रश्न दोष देण्याचा नाही. त्या-त्या लोकांची कुंडली तुम्ही कबुलीजबाबात मांडून ठेवली आहेच. प्रश्न आहे तो, ती मंडळी कधी तरी तुम्हाला कवचकुंडलं वाटली होती आणि तशी ती नाहीत, हे लक्षात आल्यावर काय वाटलं, हा.' मी मध्येच म्हणालो.
`मी तेच सांगतोय. त्यांचं काहीही होणार नाही हे एकदा समजल्यावर त्याचा विचारच का करायचा?'
तो काहीही थांगपत्ता लागू देण्याच्या मनस्थितीत नाही हे माझ्या ध्यानात आलं. `तुम्हाला कोणाचाही राग नाही आला? आपण या लोकांना इतकं दिलं आणि त्यापैकी कोणीही आपल्याला या काळात काहीही `साथ' दिली नाही याचा?'
`तुम्हाला काय वाटतं, त्यांनी साथ दिली असती तर मी सुटलो असतो?'
माझ्या प्रश्नातली खोच माझ्याच ध्यानी आली नव्हती. "तो दोषीच होता, आहेही; तरीही मी हा प्रश्न असा कसा विचारला?" मी लगेचच दुरुस्ती केली. `तुम्ही सुटला नसता. सुटणं योग्यही ठरलं नसतं' मी म्हणालो आणि क्षणभर त्याच्या प्रतिक्रियेसाठी वाट पाहीली. तो नुसताच पाहात राहिला. तीच संधी समजून मीच म्हणालो, `पण तुम्ही एकट्यानंच शिक्षा भोगावी यात तुम्हाला काही विषम वाटत नाही?'
`नाही.' त्याचं `साधूत्व' कायमच होतं. `केलं ते सारं मीच. पैसे मीच काढायचो. मीच वाटायचो. ते घ्यायचे. इतकंच.'
तो जे काही बोलत होता ते किती प्रामाणिक आहे याची मला शंका येऊ लागली होती. माझ्या लक्षात आलं की, या मार्गानं काहीही उत्तर मिळणार नाही. त्याच्याविषयी, त्याचं प्रकरण उघडकीस आल्यानंतर अनेकांनी वापरलेली उपमा मी वापरली.
`तुम्हाला वाल्मिकीचा वाल्या झाला असं म्हटलं गेलं.'
`ते तुम्ही ठरवा. जे झालं, जसं झालं ते सारं मी कबुलीजबाबात सांगून टाकलंय.'
`तुम्ही नुसताच कबुलीजबाब दिलेला नाहीत. त्यात वाटेकऱ्यांची नावंही घेतली आहेत.'
`म्हणून काय झालं?'
`ती घेण्यामागं तुमचा काही उद्देश असेलच ना?'
`काय असणार?'
`तोच आम्ही विचारतोय?' माझा मित्र म्हणाला.
`त्यांच्यावर कारवाई व्हावी हाच.' दरवाजा थोडा किलकिला झाला होता.
`मग तीच होत नाहिये, याविषयी तुम्हाला काय वाटतं?' माझ्या मित्रानं विचारलं.
`खरं तर, मी इथंही मूर्ख ठरलोय. त्यांच्यावर कारवाई होईल असं मला वाटलं हेच मुळात चुकीचं आहे. तशी कारवाई कोणावरही होणार नाही. जे खात्यातले होते तेच फक्त अडकणार आहेत. माझ्या हे लक्षातही आलं नाही. मी त्यांची नावं घेतली आणि स्वतःच अडचणीत आलो.'
`कसं?'
`त्यांची नावं घेतल्यानं त्यांची सारी ताकत एकवटली गेली. त्यामुळं माझ्याचविरोधातील साक्षी बळकट झाल्या. मी पुरता अडकलो.'
`म्हणजे ते मोकळेच राहाणार?'
`त्यात आता बदल नाही. माझ्यावरचे खटले या-ना-त्या कारणानं लांबत जातील.'
मला हा माणूस समजेनाच झाला. तो शांतपणे त्याचं विधिलिखितच सांगत होता. आजन्म कारावास!
`जे केलं त्याचा पश्चाताप होतोय?' मी विचारलं.
`होतोय. पण काय करणार? शिक्षा काही टळणार नाही. किमान माझ्यासोबत घरचे नाहीत याचंच समाधान मानायचं. त्यांनी जबाबदारी टाळलेली नसूनही. ते तरी वाल्याचे कुटुंबीय झाले नाहीत.' त्यानं त्याच्यासाठी वापरलेल्या उपमेची परतफेड केली.
`महाराज, धर्मात्मा ते आता गुन्हेगार...' मी म्हणालो.
`ते फक्त मुखवटेच ठरले; खरं आहे ते आत्ताचं रूप.'
`पुढं काय करणार?'
`जन्मठेप!' त्यानं एका शब्दांत उत्तर दिलं आणि नमस्कार केला.
मी परतीच्या मार्गावर होतो. मला त्याचा काहीही थांग लागला नव्हताच.
तो आजही तुरुंगातच आहे. त्याच्यावर त्या काळात कृपाछत्र धरणारे त्याच गावात प्रतिष्ठीत म्हणून मिरवताहेत. त्याला साथ देणाऱ्यापैकी एक `लोकप्रतिनिधी' अलिकडेच वेगळ्याच प्रकरणात तुरुंगात जाऊन आले. अधिकाऱ्यांपैकी काही जण सचिव पदापर्यंत जाऊन निवृत्तही झाले. त्यानं `मिळवून' वाटलेल्या सुमारे तीस कोटी रुपयांचा आजही हिशेब लागलेला नाही. त्याच्यावरील आणखी एका खटल्याचा निकाल अलीकडेच लागला आहे. त्यातही त्याला शिक्षा झाली आहे. तो तीही भोगणार आहे.
ते गाव तसंच आहे. त्याच्याकडं अजूनही पैसे किती आहेत याचा विचार आजही तिथं होतो म्हणतात!