...
हलकेच ओंजळीत घेतो मी सुखस्वप्ने ही माझी
अर्घ्य द्यावया त्यांचे या आत्मरत सूर्याशी ।
या सवितेच्या तेजाने मी मार्ग आजवर क्रमलो
आधार मला त्या रवीचा सर्वत्र सर्व पंथांशी ॥ १ ॥
मज इच्छा अन शंकांनी घेरले अनेक वेळा
द्वंद्वाने त्यांच्या मजला जखडले अनेक वेळा ।
भांबावलो, थकलो क्षणभर, शक्तीने मी सावरलो
त्या सत्याचे ज्ञातेपण तो सूर्य दावूनी गेला ॥ २ ॥
निष्क्रिय मनाची संथा, बळी देत कर्माची
मिथ्येची माया मांडूनी करी दिशाभूलही माझी ।
त्या भानूच्या स्पर्शाने भिवविली क्रूर निश्चलता
मज उत्साहाचा कल्पद्रूम कर्तव्य शिकवूनी गेला ॥ ३ ॥
अत्यंत आदराने मी मग शोध तयाचा केला
हे तेज कोठूनी आले, सन्मित्र कुठे हा लपला?
शोधले जसे मी त्याला, मज शोध नवाची गवसला
मी नव्हतो आणखी उरलो, मी तो तेजःपुंज होतो ! ॥ ४ ॥
- श्रीपाद