मारिच -१

माझे एक जवळचे मित्र (आणि एक 'वाचनमात्र धाटणी'तले मनोगती) संतोष शिंत्रे यांची ' साप्ताहिक सकाळ' कथास्पर्धा २००३ मधिल पारितोषिकपात्र कथा 'मारिच' इथे त्यांच्या संमतीने देत आहे. 'मनोगत' वर हल्ली रंगलेल्या काही चर्चा आणि त्यांत व्यक्त झालेली मते यांच्या पार्श्वभूमीवर ही कथा वाचकांना अधिक मनोरंजक वाटेल अशी आशा आहे.

मारिच - भाग १

आश्रमात कैवल्यनं हिंडून फिरवलेल्या धुपाचा वास हळूहळू  कमी होत, हवेत विरत होता. भिंतीवरच्या बापूंच्या तसबिरी त्यामधून आपलं अस्तित्व दाखवू लागल्या होत्या. झाडलोटही पूर्ण झाली होती. एकंदरीत येणाऱ्या भाविकांसाठी आश्रम तयार होत होता.

कैवल्यची सकाळची लगबग चालली होती. जाजमं, सतरंज्या, प्रसादाचं गूळखोबरं, बापूंचं उच्चासन.... सारीच व्यवस्था पहायला लागणार होती. अकरा वाजता सत्संगाची वेळ होती. कैवल्य एकेके तसबीर पुसत होता. प्रत्येक तसबिरीत बापूंची एकेक वेगळीच भावमुद्रा उमटली होती. एकीत भक्ताला आशीर्वाद देताना उमटलेले अष्टसात्विक भाव होते, तर दुसरीत जगन्नियंत्यासमोर लीन झालेले बापू दिसत होते. सत्संगाला जमलेल्या हजारो श्रोत्यांसमोर तल्लीन होऊन प्रवचन करताना बापूंचा मोठा ब्लो आऊटतर आख्खी भिंत व्यापून होता. सगळ्या तसबिरी पुसून झाल्यावर काहीशा समाधानानं त्यानं हॉलकडं नजर टाकली. अचानक त्याचे डोळे एका व्यक्तीवर खिळले. सकाळीच कोणी साधक उपासनेत रममाण झालेला दिसत होता. आसपासच्या जगापासून अलग होऊन, विसरून, पद्मासनात बसून त्यानं नासिकाग्रावर केंद्रित केलेलं लक्ष कळत होतं. कैवल्यनं थोडं निरखून पाहिलं, त्याचा अंदाज खरा ठरला. साधकाच्या डोळ्यातून अश्रू वहात होते.

आश्रमात अर्थात हे दृष्य नवीन नव्हतंच. बाहेरच्या जगात जगण्याचा,  रहदारीचा, संघर्षाचा वेगच इतका तीव्र झाला होता, की आश्रमात आल्यावर लोकांचे ताणतणाव जाहीर रीतीनं उमटायचे. बाहेरच्या जगात एकटे 'पिणारे' जसे वाढले होते. तसे इथे साधक वाढले होते. मनातले विकल्प बाजूला सारुन  कैवल्यनं पुन्हा एकदा प्रसादाच्या तयारीवर नजर टाकली. तोवर साधकाची उपासना संपली होती. यथावकाश उठून कैवल्यकडे पाहून त्यानं एक मंद स्मित केलं. कैवल्यनंही काहीसा नम्र प्रतिसाद दिला.

"मी राजपाठक. बापूंचा भक्त आहे". कैवल्यशी हात मिळवत त्यानं आपली ओळख करून दिली. "मी कैवल्य. आय कोऑर्डिनेट बापूज सत्संग प्रोग्रॅम्स." बोलता बोलता कैवल्यनं काहीशा कुतुहलानंच साधकाकडं पाहिलं. नाक एकदम शार्प. चेहऱ्यावर साधनेतून आलेली शांती आणि डोळ्यांतून ओसंडणारी बुद्धिमत्ता.
राजपाठक पुढं सांगत होते, "आय गॉट टू नो बापू इन हिज मुंबई डिस्कोर्सेस लास्ट इयर. ग्रेट गुरु..... मला त्यांच्या बोलण्यातून सगळी दिशाच एकूण सापडली"
कैवल्य स्वतः उच्च्शिक्षित होता. त्यामुळे तशा प्रकारचे कुणी साधक आले की त्याला अधिक जवळीक वाटायची. "खरं तर, " राजपाठक म्हणाले, "आज मी आलो होतो, कारण बापूंच्या कार्याला थोडासा आर्थिक हातभार लावण्यासाठी. आजवर खूप प्रेरणा मिळालीय त्यांच्याकडून." ते सद्गदित झाले होते. कैवल्यनं हलकेच त्यांच्या पाठीवर हात ठेवला. "बापूंना परतफेडीची अपेक्षा नसते, राजपाठकसाहेब.साधकांनी आपली जास्तीत जास्त उन्नती केली की त्यांना पोचतं सगळ."
राजपाठकांनी डोळे पुसले. काहीशा खोल आवाजात ते म्हणाले "हो; पण तरीही.... इथं व्यवस्थापक किंवा कोणी हिशेबनीस असे कोणी आहेत का? देणगीची पावती देऊ शकतील असे?"
कैवल्यनं हातानंच दिशा दाखवली. "उजवीकडची दुसरी खोली. अकाउंटंट चौबळ आहेत.  ते पावती देतील तोवर मी प्रसाद घेऊन आलो तिकडेच."

कैवल्य प्रसाद घेऊन येईपर्यंत चौबळांनी पावती तयारही केली होती. प्रसाद देताना कैवल्यनं सहज नजर टाकली आणि तो जरासा दचकलाच. एक लक्ष रुपये नगद, आश्रमाच्या गोशाळेसाठी राजपाठकांनी दिले होते. चौबळही काहीसे अवाक होऊन त्यांच्याकडे पहात होते. काहीसं चाचरुन ते म्हणाले, "सर, इंकमटॅक्स रिफंड होईलच ८० जी खाली. बाय द वे, आपला कसला बिझनेस आहे सर?"
राजपाठकांनी स्मित केलं "या डिव्हाईन वातावरणात या गोष्टी कशाला.. प्लस इटस अ व्हेरी टेक्निकल अफेअर. बस! इतकंच म्हणूयात की बापू की कृपा है. भेटू" पुढच्या क्षणी ते निघालेही होते.

अशा देणग्या तर सर्वदूर पसरलेल्या अशा कार्याला लागतातच. कैवल्यला बापूंच्या हिंदी सत्संगातलं एक वाक्य आठवलं, "कोई देनेवाला आनाही है तो उसे अपने खुद की इच्छा से आना है. और ईश्वर भेजताभी है ऐसे लोग. आश्रमवासी को जाके हाथ फैलानेकी जरुरत नही"
हिंदीच काय, बापूंच्या मराठी, गुजराठी आणि इंग्रजी भाषेचंही वक्तृत्वातलं ओज अमोघच होतं.
आज असंच काहीसं होऊन गोशाळेच्या कैक राहून गेलेल्या गोष्टी राजपाठकांच्या देणगीमुळे मार्गी लागणार होत्या.   गोठे अद्यावत करायचे होते, फरसबंदी, पाण्याचे नवे हौद  बांधायचे होते - सगळंच. चौबळ बापूंशी बोलतीलच. कैवल्य पुढच्या तयारीसाठी उठला...

गेल्या काही वर्षांमध्ये बापू सर्वेसर्वा असणाऱ्या त्यांच्या संप्रदायाचं नाव पुष्कळच नावारुपाला आलं होतं. भक्तसंप्रदायामध्ये जणू एखादं कुटुंब असल्यासारखी आपुलकी होती. हेवेदावे, राजकारण याला कुठेच स्थान नव्हतं. बाहेरच्या जगातल्या याच तर  गोष्टींना कंटाळून साधक इथं यायचे. बापूंनी घालून दिलेली जीवनशैली, त्यांचा शब्द पाळला की झालं. निव्वळ योगिक - पारलौकिक पद्धतीपेक्षाही रोजच्या आयुष्यातले ताणतणाव झेलण्याची बापूंची सिद्धहस्त शिकवण साधकांना लुभावून जायची.
भौतिक कार्यही विस्तारलं होतं. आश्रमाची कैक एकर नैसर्गिक शेती होती. भात होता फळबागाही. गोशाळा तर आता अत्याधुनिक होत होतीच. तरुण मुलांवर संस्कारांसाठी एक कायमस्वरुपी केंद्रही होतंच. बापूंच्या मिशनची एक शाळा आणि कॉलेजही होतं. नर्सरी होती.

आश्रमाची आर्थिक बाजूही अशा एकमेकाला पूरक उद्योगांमुळे सुस्थितीत होती. बापू एकट्यानं पूर्णपणे या गोष्टींची आर्थिक बाजूदेखील सांभाळत. शाळा - कॉलेजाच्या वसतिगृहाला धान्य, फळ.म, भाज्या शेतीच्या उत्पादनातून विकल्या जात. दूधही तिथं गोशाळेतून पुरवलं जाई, तर तिथलंच शेणखत शेती संस्थेला विकलं जाई.
प्रत्येक स्वायत्त केंद्रं एकमेकांशी आर्थिक व्यवहार करण्याइतकी सक्षम होती. बाहीरुन टेंडर्स मागवणं किंवा बाहेरचे पुरवठादार यांची गरजच भासायची नाही फारशी. अगदीच बांधकाम किंवा संगणक पुरवठा अशा गोष्टी वगळल्या तर. 

(क्रमशः)