गाव सोडून वीसेक वर्षं झाली असावीत. काल अचानक पुन्हा ते आठवणीत आलं. निमित्त साधंच होतं. एका मित्रासोबत संध्याकाळी गप्पा करीत बसलो होतो. अचानक कानांवर गोवावेस हा शब्द पडला आणि माझं लक्ष तिकडं वळलं.
शेजारच्या टेबलावर काही मंडळी बसली होती. त्यांच्या गप्पातून निसटलेला तो शब्द माझ्या कानावर आला होता. या शब्दाचं आणि माझ्या गावाचं नातं असल्यानं त्यांच्यापैकी कोणी तिथला आहे का याचा कानोसा मी घेऊ लागलो; पण त्यात काही यश आलं नाही. मंडळी काही क्षणात गोवावेशीतून पुन्हा त्यांच्या आज्ञावली, जाल अशा विश्वात रमली.
पण त्या शब्दानं त्याचं काम केलं होतं, मला पुन्हा माझ्या गावात नेऊन सोडलं होतं. मित्राच्या ध्यानी आलं की स्वारी कुठंतरी हरवली आहे. त्यानं शांतपणे मला निरोप दिला. तो गेला आणि पुन्हा मनात तो गोवावेस हा शब्द नांदू लागला. डोळ्यांसमोर वीसेक वर्षांपूर्वीचं तिथलं चित्र उभं राहिलं.
पाठीशी ब्रिज (याला मराठी प्रतिशब्द आहे, पण इथं तो टाकला तर लेखात उल्लेखिलेलं गाव ज्यांना माहिती असेल ते वाचक मला वेड्यात काढतील. कारण त्याला ब्रिज असंच म्हंटलं जायचं, आत्ताही तसंच असावं) घेऊन उभी असलेली ती गोवावेस म्हणजे काही गोव्याची वेस रुढार्थानं नव्हती. गोव्याला जाणारा रस्ता तिथं इतर दोन रस्त्यांपासून वेगळा व्हायचा इतकंच. वेशीतून एक रस्ता जायचा डावीकडं उपनगरांसाठी, दुसरा उजवीकडं दुसऱ्या एका उपनगराकडं जायचा. डावीकडं गेलेल्या रस्त्याला पुढं पुन्हा चार फाटे फुटायचे. एक जायचा तिथल्या बाजाराच्या दिशेनं, दुसरा जायचा तिथल्या प्रसिद्ध अशा एका बेकरीवरून पुढं तयार कपड्यांच्या कारखान्यांच्या वस्तीकडं, तिसरा रस्ता किंचीत डावीकडं वळून फुटायचा तो एका उपनगरात आणि त्यापासूनच आणखी एक रस्ता सरळ निघायचा तिथल्या उच्चभ्रूंच्या वस्तीत आणि तिथून पुढं कॉलेजांकडं पोचायचा. अर्थात, रस्त्यांची ही वळणं तशी अगदी ढोबळच म्हणायची कारण प्रत्येक रस्त्यावरून गल्ल्या निघायच्या. त्या एकमेकीचा हात धरून चालल्यागत असायच्या आणि पुढं त्याच रस्त्याच्या शेवटांना भिडवणाऱ्या एकाद्या सामायीक रस्त्याला जाऊन भेटायच्या. एक वर्तुळ त्यातून पूर्ण व्हायचं.
माझ्या भावविश्वाशी संबंधित मुख्य रस्ते दोनच. एक गोव्याकडं जाणारा आणि दुसऱ्या आमच्या वसाहतीत येणारा. या दोन्ही रस्त्यांच्या मध्ये आमचं सारं आयुष्य गुंतलेलं असायचं.
गोवावेशीत येऊन भेटायच्या एकमेकीच्या सख्या असल्यासारख्या वर्षानुवर्षे तिथं नांदणाऱ्या पाच पेठा. प्रत्येकीचं नाव एकेका वारावरून. पहिली सोमवार, ही सर्वात लांब. दुसरी मंगळवार, तिसरी बुधवार, चौथी गुरुवार; या प्रत्येकी क्रमानं थोड्या-थोड्या लहान होत जायच्या. पाचवी शुक्रवार पेठ. ही पुन्हा लांबीची. म्हणजे हिलाच आधी मंगळवार, बुधवार, गुरुवार पेठा भेटायच्या. मग या तिघींनाही हाताला धरून शुक्रवार पेठ उतरायची गोवावेशीत, तिथं तिला सोमवार पेठ येऊन भेटायची. बहुदा त्या तिथं गुजगोष्टी करीत असाव्यात. कारण गोवावेशीत तशी वस्ती नव्हती. त्यामुळं माझ्यासारख्या मुलांचा ताप त्यांना तिथं होत नसावा.
या पाचही जणी गोव्याला जाणाऱ्या रस्त्याला समांतर होत्या. पेठांचं एक टोक गोवावेशीत असायचं. पहिल्या चारही पेठांचं दुसरं टोक शाळांपाशी असायचं. त्या टोकाला दोन प्राथमिक, आणि तीन माध्यमिक शाळा होत्या. गावच्या दोन्ही भाषांसाठी.
बुधवार पेठेच्या शाळेकडेच्या टोकाला व्यायामशाळा होती. तिच्या डोक्यावर बॅडमिण्टन हॉल होता. ज्या इमारतीत या दोन्ही संस्था नांदायच्या, त्याच इमारतीनं प्रभू रामचंद्रालाही आसरा दिला होता. या इमारतींना खेटून होती फक्त मुलींची शाळा. या शाळेच्या पाठीला पाठ लावून मंगळवार पेठेच्या टोकाला येईल अशी होती, मुलांची शाळा. मुलांच्या शाळेला जोडून दुसरी शाळा होती ती मात्र मुला-मुलींची आणि दुसऱ्या भाषेची. तिचं तोंड यायचं ते सोमवार पेठेच्या टोकाशी. या दोन्ही शाळांसाठी एकच सामायीक मैदान होतं. नंतर केंव्हा तरी त्या मैदानाच्या अर्ध्या भागात दुसरी एक शाळा उभी राहिली.
या शाळांचं मैदान संपलं की दक्षिणेला रस्ता आणि पलिकडं एक आमराई. ती आमराई मात्र मुलांना दुर्लभच होती. पक्कं कुंपण तिची राखण करत असायचे. त्यामुळं ते आंबे मुलांनी आंबटच ठरवलेले असायचे. मुलांची अंब्यांची तल्लफ भागली जायची ती तिथलं रेल्वे गेट ओलांडून पुढं गेलं की मग लागणाऱ्या एका सरकारी संस्थेच्या मागं असणाऱ्या आमराईत. त्या संस्थेत लशींचं संशोधन व्हायचं. शाळेच्या अभ्यासेतर अभ्यासाचा एक भाग म्हणून एकदा त्या संस्थेत भेट झाली की मग एरवी बंदिस्त असणाऱ्या त्या संस्थेच्या आवाराच्या कुंपणाला असणारी भगदाडं मुलांना खुणवू लागायची.
शाळांच्या पुढं नैऋत्येकडून वायव्येकडे जाणारी घळ होती आणि तीमधून गेला होता रेल्वेरूळ. सकाळी शाळा सुरू होण्याच्या वेळेस एक एक्सप्रेस धडाडत जायची. या शाळांच्या आधी साधारण फर्लांगभर अंतरावर एक, त्या मागं पुन्हा तितक्याच अंतरावर आणखी एक गेट होतं. तिथं आलं की त्या गाडीचे चालक हॉर्न द्यायचे. कधी-कधी त्या मार्गावरून नेमकी शाळेची दुपारची सुट्टी झालेली असताना `साहेबाची गाडी' जायची. गेटमधून ती गाडी येताना दिसली की मुलांची टोळी खाली रुळांपाशी जाऊन थांबायची. साहेब आला की त्याला सलाम ठोकण्यासाठी. तो त्याच्या मस्तीत गर्क असायचा. पण मुलांना त्याचं काहीही नसायचं. खाली जाऊन कल्ला करत त्याला सलाम ठोकायचा हेच त्यांच्यासाठी महत्त्वाचं असायचं. थोडं अंतर त्याच्या गाडीचा पाठलागही करता यायचा.
शाळांच्या इमारतींना लागूनच सगळ्या पेठांना जोडणारा एक रस्ता जायचा. बुधवारात्ल्या टोकावर गावातल्या प्रसिद्ध उद्योगपतींचा बंगला दिमाखात उभा असायचा. मंगळवार आणि सोमवार या दोन पेठांच्या मध्ये त्या रस्त्यावर असलेल्या बंगल्यात त्या काळी एक वेडा क्रिकेट शौकीन रहायचा. प्रत्येक कसोटीवेळी (हो, तो काळ झटपट क्रिकेटचा नव्हता) तो बंगल्याच्या गॅरेजमध्ये बसायचा. मोठ्यानं ट्रांझिस्टर लावलेला असायचा. दर पाच-दहा मिनिटांनी तो गॅरेजमधून बाहेर गेटपाशी यायचा आणि तिथं ठेवलेल्या एका काळ्या फलकावर ताजा स्कोअर लिहायचा. शाळेच्या त्या बाजुच्या वर्गांच्या खिडक्यातून तो पाहून मग इतर वर्गात ते आकडे फिरायचे. क्वचित एखादे शिक्षक क्रिकेटप्रेमी असले की, मग हा उद्योग चोरून करावा लागत नसे. तेंव्हाच्या आठवणीतली एक कसोटी आहे कलकत्त्याची (तेंव्हाचे, आत्ता इतर अनेक बदलांप्रमाणे त्याचेही कोलकता झाले आहे). त्या वेस्ट इंडीजविरुद्धच्या सामन्यात गावसकर आणि वेंगसरकरने शतके ठोकली होती. त्या दिवशी आमच्या वर्गावर ते क्रिकेटप्रेमी मास्तरच होते. त्यामुळे त्या क्रिकेटवेड्याच्या फलकावरून ती शतकं आमच्या वर्गांनं `पाहिली' होती.
सोमवार, मंगळवार, बुधवार आणि गुरुवार पेठांच्या त्या टोकाला शाळा होत्या, तशीच एक शाळा शुक्रवार पेठेला गोवावेशीकडच्याच भागात होती. या पेठेला जिथं मंगळवार पेठ भेटायची त्या कोपऱ्यातून एक पाच-सहा फुटी पायवाट उत्तरेच्या दिशेनं निघाली होती. तो कोपरा त्याकाळी अनेक मुलांचा नाजूक कोपरा होता. त्या पायवाटेवरून पुढं गेलं की तिचा प्रवेश व्हायचा डीपी हायस्कूलमध्ये. डी म्हणजे डिव्हाईन आणि पी म्हणजे प्रॉव्हिडन्स. पण ती माहिती त्याकाळी कोणाच्याही दृष्टीनं फारशी महत्त्वाची नसणार. कारण ती शाळा फक्त मुलींची होती आणि इंग्रजी माध्यमाची, हे महत्त्वाचं असायचं.
गंमत अशी की, पायवाटेचा एक भाग त्या शाळेच्या आवारात प्रवेश करीत असला तरी दुसरा तिथून पुढं शेतात निघायचा. त्या शेतात मारुतीचं एक मंदीर होतं. तिथं कोणी जायचंही नाही. सारे थांबायचे त्या `नाजूक' कोपऱ्यावर. ती शाळा सकाळी इतर शाळांच्या आधी सुरू व्हायची. नऊच्या सुमाराला तो कोपरा गजबजू लागायचा. तेव्हढ्या लवकर तिथं इकडच्या शाळांची मुलं कशी येतात, हे कोडं उलगडलं तेंव्हा अनेकांना कळलं की `शाळेत आधी जाऊन अभ्यासही करायचा असतो'. इतका अभ्यास करणारी ती मुलं नंबरात मात्र कशी येत नव्हती हे कोडं उलगडण्याचं कारण आमच्यापुरतं राहिलेलं नव्हतंच. संध्याकाळी ती शाळा लवकर सुटायची तेंव्हाही आपले शेवटचे खेळ किंवा भूगोल असले तास बुडवून तिथं येणारे महभागही होतेच. मुलं रस्त्याच्या या बाजुला आणि शाळेच्या मुली त्या बाजूंनी जाताहेत हे दृष्य करमणूक करणारं असायचं. रस्ताही ओलांडण्याचं धाडस त्यांच्यातील कोणी केलं नसावं. ही मुलं मग शाळेत आली की त्यावरून त्यांची माफक चेष्टाही व्हायची. रस्त्याच्या या बाजूला ही मुलं आणि तिकडच्या त्या बाजूला मुली असा हा एकतर्फी मामला अखेर अपेशीच ठरायचा हे नक्की.
`डीपी'पाशी डाळ न शिजलेली मुलं मग काही काळानं, या सगळ्या पेठांना मधोमध जोडणाऱ्या रस्त्यावर संध्याकाळी तेंव्हाच्या ताज्या स्टाईलीत भांग पाडून फिरताना दिसत. हा जोडरस्ता गोव्याला जाणारा रस्ता ओलांडून कॉलेजांकडे जायचा. गोवा रस्त्यापासून या रस्त्यावरून चालत सुटायचं आणि थेट शुक्रवार पेठ जिथं सुरु होते त्या रेल्वे गेटपाशी यायचं. तिथं भाजीबाजाराच्या आवाराला लागून असलेल्या पटांगणात पावभाजी मिळायची. ही `बाळूची पावभाजी' त्या काळात अनेकांना चटक लावून गेली (तिचा आस्वाद फारसा न मिळलेल्यांना तिनं चटका लावला होता). पावभाजी खायची आणि, किंवा आधी, पुढं जाऊन साईबाबांचं दर्शन घ्यायचं. मुलांची ही धार्मिकता तेव्हढ्यापुरतीच असायची. कारण त्या चालण्याचं लक्ष्य काही साईबाबा नसायचे, रस्त्यात दिसणारे चेहरे हेच अनेकांचं लक्ष्य असायचं. त्यामुळं ती धार्मिकताही चेष्टेचा विषय व्हायची. `साईमंदिरात जाणं' याला छद्मी अर्थ प्राप्त झालेला तो काळ होता.
बुधवार पेठ जिथं संपायची तिथं तिच्या आणि मंगळवार पेठेच्या मध्ये एक बाग आहे. `वाघ-सिंहांची बाग' ही तिची ओळख तिच्या `महात्मा गांधी उद्यान' या नावावर अन्याय करणारी आहे हे काही कोणालाही जाणवलंही नसावं. वाघ-सिंह काही खरे नव्हते. वाघ, सिंह, हत्ती, गवा आणि आणखी एक कसलासा प्राणी यांच्या चेहऱ्यांचे मोठे मुखवटे सिमेण्टनं वर्तुळाकार बांधून काढलेले होते. मधल्या वर्तुळात वाळु टाकलेली असायची. प्रत्येक प्राण्याच्या चेहऱ्याच्या पाठीमागे ठेवलेल्या भगदाडातून आत शिरायचं, तोंडातून बाहेर आलं की वाळुवर खेळायला मोकळे. बाग मोठी होती. तिच्या दुसऱ्या टोकाला एक महाकाय कासव बांधलेलं होतं. आतून पोकळ. लपंडावासाठी उत्तम. लहान मुलं त्या बागेत आधी या प्राण्यांच्या माध्यमातून खेळायची, लपंडाव वगैरे. वय वाढलं की त्याच बागेतल्या अंब्याच्या आणि चिकुच्या झाडांकडे त्यांचं लक्ष जायचं. फळांच्या हंगामात बागेच्या माळ्याला चुकवत झाडांची लूट व्हायची. काही पराक्रमींनी तर लोणच्याच्या कैऱ्यांचा खर्च त्या बागेतूनच वाचवलेला असायचा. फळांचा हंगाम नसेल तेंव्हा मात्र त्या झाडांच्या आधारानं इतर खेळ चालायचे. अभ्यासासाठी गर्द सावलीही ती झाडं द्यायची, त्यामुळं त्या पेठांमध्ये राहणाऱ्या मुलांचं आणि त्या झाडांचं नातं घट्ट विणलेलं असायचं. अशीच एक बाग बुधवार आणि गुरूवार पेठांच्या मध्ये वाघ-सिंहांच्या बागेच्या विरुद्ध टोकाला होती. तिथं मात्र असलं काही आकर्षण नव्हतं. त्यामुळं नुसतीच जाऊन बसण्यासाठीची किंवा फक्त लेकुरवाळ्या माऊल्यांनी कडेवरच्यांना आणण्याची ती बाग झाली होती. तिची कळाही साहजिकच तशीच असायची. झाडं वगैरे फुललेली असायची, पण ते फुलणंही उदास वाटायचं.
या बागेच्या शेजारी एक बंगला होता. तो होता क्लब. पण तिथं प्रवेश फक्त मोठ्यानाच. बाहेर टेनीसची दोन कोर्ट होती. त्यांचंच दर्शन काय ते व्हायचं. तिथं खेळणाऱ्यांच्या हाती असलेल्या टेनीस बॉलची संख्याच मुलांना अचंबीत करून जायची. त्या बंगल्यात काय चालतं हे कुतुहल काही त्या वयात कधीच शमलं नाही.
शुक्रवारात कलामंदिर होतं. नाव कलामंदिर, पण तिथं तसे कलेचे कार्यक्रम म्हणजे हिंदी वाद्यवृंदांचेच कार्यक्रम व्हायचे. आणखी एक कार्यक्रम तिथं दर वर्षाचं आकर्षण असायचा, शरीरसौष्ठव स्पर्धा. कलामंदिराशेजारी एक चित्रपटगृह होतं. त्याच्या पुढं डीपी हायस्कूलपर्यंत शेत पसरलं होतं. ताजे फ्लॉवर आणि कोबी तिथून मिळायचे. त्या भाज्या आणायची जबाबदारी मुलांवर अगदी निकर असेल तरच यायची, कारण खरेदी करून आणताना मुलं त्या भाज्या कच्च्याच खात यायची. घरी पोचेतो किलोभर भाजी फक्त पाऊण किंवा अर्धा किलो शिल्लक राहिलेली असायची.
या सगळ्या पेठांमधील बंगल्यांमध्ये किमान थोडी तरी मोकळी जागा असायची. एक - दोन अपवाद सोडले तर ते बंगले लोकांनी गजबजलेले असायचे. कारण त्यांना बंगले म्हंटलं तरी तिथं नांदायची ती वाडा संस्कृतीच. म्हणूनच तर तिथल्या प्रत्येक मुलाच्या, आणि मुलीच्याही मनात, आपल्या पेठेविषयी एक आपुलकीचा भाव असायचा. तुझी पेठ श्रेष्ठ की माझी हे वाद त्या पेठांनी कितीकदा ऐकले असतील त्याची मोजदादही नसावी. ही श्रेष्ठत्त्वाची चुरस दिवाळीत होणारे किल्ले, एरवी केंव्हाही रंगणारे क्रिकेटचे सामने, होळी आणि वर्षाअखेरीला होणारा `ओल्ड मॅन' जाळण्याचा कार्यक्रम यातूनही व्यक्त होत असायची. मग त्यातून काहीवेळा खुन्नसही व्हायची आणि पुन्हा सारं विसरून मुलं एक यायचीही. मुलींचे असे वेगळे सोहळे मात्र आता आठवणीतून निघून गेले आहेत. हादगा एक असावा, आणि क्वचित भातुकली.
दिवस निघून गेले तसं तिथलंही वातावरण बदलू लागलं. बंगल्यांची जागा अपार्टमेण्ट घेऊ लागल्या. मुलांमधला एकजिनसीपणाही नंतर संपत गेला. बहुदा अनेक मुलंच तिथून उठून बाहेर गेली. जी राहिली ती त्यांच्या-त्यांच्या व्यापांमध्ये. पुढच्या पिढ्यांसाठी इतर साधनं आली करमणुकीसाठी तसा तिथला जिवंतपणाचं स्वरूप बदलून गेलं.
काही दिवसांपूर्वी तिथं गेलो होतो. शुक्रवार पेठेतून आधी चक्कर मारली. तिथं असलेल्या चित्रपटगृहाची जागा आता एका व्यापारी संकुलानं घेतली होती. समोर एक बारही आला होता. वाघ-सिंहांच्या बागेतली झाडं म्हातारी झाल्यासारखी दिसत होती. वाडेवजा असणाऱ्या बंगल्यांची जागा अपार्टमेण्टनी घेतली होती. त्या पेठा तेंव्हा आपल्याच वयाच्या मैत्रिणींसारख्या वाटायच्या, आता मात्र त्या अपार्टमेण्ट अंगावर वागवताना प्रौढ कुमारिका वाटत होत्या. त्यांचं वय वाढलं असावं असा विचार मनात आला तेंव्हाच लक्षात आलं, अरे आपलंही वय वाढलंच आहे की!