दिल्ली हाट
अनेक मैत्रिणींकडून व नातेवाईकांकडून 'दिल्ली हाट' बद्दल ऐकले होते. आमच्या बॅगा भरुन झाल्या होत्या आणि विमान सुटायला बराच होता. त्यामुळे हॉटेलमधून आम्ही ठरवल्याप्रमाणे सकाळीच दिल्ली हाट कडे निघालो. उंच चकाचक अन् मोठाल्या मॉलरूपी विदेशी बाजारापेठांच्या आक्रमणाने दिल्ली हाटची गर्दी अन किंमत थोडीही कमी कशी झाली नव्हती ह्याचेच आश्चर्य आम्हाला वाटत होते. त्यामुळेच आमची उत्सुकता वाढली होती. अरविंद मार्गावर आयएन ए मार्केटसमोर 'दिल्ली हाट ' हा भलाथोरला खुला बाजार भरलेला असतो. आम्ही तेथे गेलो तेव्हा वाहने ठेवण्यासाठी भले मोठे प्रांगण होते आणि १०-१५ रूपयात योग्य जागेचे तिकीट काढले की झाले, शांतपणे बाजारहाट करण्यास मोकळे असे आमच्या लक्षात आले.
आत जाऊन बघतो तो काय तोबा गर्दी उसळली होती! डोळ्याचे पारणेच फिटायचे बाकी होते. लहान मोठ्या असंख्य दुकानांनी सगळे प्रांगण व्यापले होते. लोक कामधंद्यात ,जेवणाखाण्यात मग्न असतील असा विचार केला होता; सकाळची वेळ आहे वेळ आहे म्हणून जरा रहदारी आणि गर्दी कमी असा विचार करून सर्वांनीच तीच वेळ खरेदीसाठी निवडली असावी आणि दिल्लीहाटकडे मोर्चा वळवला होता.
देशाच्या कानाकोपऱ्यातून आलेले विविध विक्रते आपला माल विकायला सिद्ध झालेले होते. प्रत्येकाने ती जागा काही काळासाठी भाड्याने घेतलेली दिसली. त्या थोड्या काळात आपले नशीब आजमावण्याचा प्रयत्न प्रत्येकजण करत होता. ती मुदत संपली की त्याच जागी नवा विक्रेता; प्रत्येक वेळी नवीन जिन्नस घेऊन. ह्या नाविन्यानेच दिल्लिकरांमध्ये आणि आमच्यासारख्या प्रवाशांमध्ये दिल्ली हाट खूप लोकप्रिय आहे.
सुरुवातीलाच एक भले मोठे दुकान दिसले. त्यात कानातली- गळ्यातली टांगलेली होती. लहान लहान मण्यांच्या, मोत्यांच्या आणि खोट्या खड्यांनि तयार केलेल्या अनेक माळा आणि कानातली दुकानदाराने काठ्यांच्या खुंटीला अडवली होती. वाऱ्याबरोबर त्या काठ्यांना हलकासा झोका मिळत होता. त्यामुळे त्या माळा एकमेकावर आपटत होत्या. त्यांचा खुळखुळ असा आवाज कानावर किणकिणत होता. त्या दुकानाच्याच एका बाजूला पर्सेस आणि शाली विक्रेत्याचे दुकान होते. त्या दुकानातील पर्सेस आणि शालींवरची कलाकुसर मन आकर्षित करीत होती. आजुबाजूच्या आणि परप्रांतातून आलेल्या अशा अनेक लहान मोठ्या गावातील लोककलेचे प्रदर्शनच जणु तेथे भरले होते. अशा हस्तकलेने नटलेल्या दुकानांत गिऱ्हाईकांना काय घ्यावे आणि किती घ्यावे तेच कळेनासे झाले होते.माझ्यासारखे शहरातून आलेले तर मोठ्या अचंब्यात पडले होते.
तेवढ्यात माझे लक्ष एका मधुबनी चित्रांच्या दुकानाकडे गेले. पोरगेलेसा दुकानदार आपली वेगवेगळी चित्रे लोकांना दाखवत होता. मी जवळ जाऊन बघू लागले. त्या दुकानदाराच्या मागे त्याची बायको भांडीकुंडी लावत होती. त्याचे बारीक पोर खेळत होते. चित्राच्या किमतीवरून बरीच घासाघीस सुरू होती. दुकानदार चित्राची किंमत कशी वाजवी आहे ते पटवून देत होता. पोराबाळांसकट येथेच रहावे लागते असे तो सांगत होता. " गाळ्याचे भाडे, दलाली सगळे धरून त्याच्या वाट्याला काही तरी येऊ द्या "अशी विनवणी तो करत होता. तेवढीच रक्कम तो मागत होता. मी बाराशे रूपयांना दोन चित्रे उचलली. मला चित्रातले आणि चित्रांच्या किमतीतले काहीच कळत नव्हते. पण बघ्याची भूमिका घेतली की चार गोष्टी कानावर पडत होत्या इतकेच. त्यावरून मी दिलेली किंमत तशी फायद्याची असावी असे वाटले. गर्दी वाढत होती...... जिन्स, हरयानवी लेंगे, टँक टोप्स, स्कर्टस , राजस्थानी घुंगट अशा विविध पोषाखातले लोक आजूबाजूला फिरत होते. पोषाखांची ,भाषांची तिथे सरमिसळ झालेली होती. कित्येक जण आपले नशीब काढायला आले होते तर काही आमच्यासारखे स्थिरस्थावर झालेले बार्गेन शोधत होते. हातातल्या बिसलरीच्या बाटल्या आणि खणखणणारे मोबाईल किलबिलाटात आणखीनच भर घालत होते. विविधतेच एकता एकच होती - गर्दी!
कोल्हापुरी चपलांचा एक गाळा होता. त्याच्याबाजूला देव्हाऱ्यांच्या दुकानाने सुद्धा बरीच गर्दी खेचली होती. गणपतीच्या विविध आकाराच्या सुबक तांब्याच्या मूर्तीना बराच उठाव दिसला. मातृभाषेचा आपलेपणाचा स्पर्श आणि दुकानातील ओळखीच्या खुणा पाहून मी मोहरून गेले. त्यात बार्गेनचा मुद्दा विसरून गेले अन् होऊन चांगलीच खरेदी करून बसले असे माझ्या नंतर लक्षात आले. एक दुकान पार करत आम्ही पुढे पुढे जात होतो. हातातले ओझे वाढत होते; खिसा रिकामा होत होता. जेवण करून आम्ही परत फिरणार होतो. तेवढ्यात एका मुलीने वेगवेगळया रंगीत रेशिमांनी भरलेली मोबाईल फोनची आवरणे विकायला आणली. कपड्याच्या रंगाला साजेसे असे ६ -६ आवरणांचे तिने गठ्ठे केले होते. कापडी, लोकरी चामड्याचे असे वेग़वेगळे साहित्य त्याकरता वापरलेले होते. कलाकुसर नजर ठरू देत नव्हती. दूर गावी राहणाऱ्या कामकऱ्याला किती पैसा मिळतो देव जाणे पण इथे विक्रेते ,दलाल आणि आमच्यासारख्यांची मात्र पोळी चांगली भाजली जात होती.
जेवणाची वेळ होत होती तसे वेगवेगळ्या प्रांतातील अन्नपदार्थांनी वातावरण दरवळून गेले. वडा सांबर पासून मक्कई की रोटीने तिथे हजरी लावली होती. साबुदाण्याच्या खिचडीने आमच्या तोंडाला पाणी सुटले. रसगुल्ले, जिलबी खाऊन आम्ही पोटपूजा संपवली. शॉपिंग केले की आणखी लोकांना पोटपूजेला दूर जायला नको हे नेमके दुकानदार ओळखून होते. अशाप्रकारे मागणी पुरवठयाची गरज ओळखून बाजार आनंदाने नांदत होता. बाजारातले वातावरण बाजारातले होते! किमतीवरून घासाघीस, पटवापटवी सुरु होती. वेगवेगळ्या प्रांतातील, वेगवेगळ्या भाषातील संभाषणे कानावर आदळत होती. येणाऱ्या जाणाऱ्याचे, निसटते स्पर्श वाढत होते, वेगवेगळ्या बोलींचा गुंजारव अंगाअंगातून सळसळत होता. 'गावदेवीची जत्रा अशीच असते' असे एक मित्र म्हणाला त्यात काही गैर नव्हते.
विमानात बसलो तेव्हा माझ्या मनात दिल्ली हाटचेच विचार होते. सुटाबुटातल्या आमच्यात आणि 'साहेब वाजवी किंमत लावली आहे 'अशी विनवणी करणाऱ्या विक्रेत्यात काय फरक होता? आम्ही आऊटसोर्सिंगच्या आवारात आमचा दिल्ली हाट घेऊन परदेशी निघालो होतो.
बाजार तसाच होता; फक्त जागा बदलल्या होत्या. बोली, दलाली, नफा तोटा , कामगारांचे शोषण सारे काही तसेच होते.......आम्ही वाट बघत होतो ती पगारवाढीची आणि बढतीची.