"सिटी ऑफ गॉड" बद्दल

"सिटी ऑफ गॉड" हा चित्रपट पुण्यातील गोल्ड ऍडलॅब्ज मध्ये लागणार आहे. तेव्हा वेळ न घालवता तिकिट, देणगी प्रवेशिका, फुकट पास जे मिळेल ते घ्या. काहीही मिळालं नाही तर डोअरकीपरला वशिला लाऊन पायरीवर बसून बघा पण मोठ्या पडद्यावर पाहण्याची सुवर्णसंधी अजिबात घालवू नका.


ई-स्क्वेअरचा स्क्रीन नंबर ४. पुणे आंतरराष्ट्रीय चित्रपट महोत्सवात (पिफ) सिटी ऑफ गॉड हा चित्रपट बघितला.
स्क्रीनमधली जागा तशी लोकांच्या मानाने खूप कमी. त्यात आयएमडीबी, रॉटन टोमॅटोज या चित्रपटविषयक संकेतस्थळांवर या चित्रपटाला अगदी दणकून रेटिंग. त्यामुळंही तुफान गर्दी.
पायर्‍यांवर पाय ठेवायला जागा नाही.
अगदी पहिली रांग व पडदा याच्यामध्ये असणार्‍या जागेतही लोक बसलेले.
चित्रपट सुरु झाल्यावरही लाईट्स चालू होते म्हणून एकानं "मालवून टाक दीप" हे गाणं सूर लावून म्हटलं तर सगळा हशा.

टायटल्स संपली आणि चित्रपट सुरु झाल्यावर एकदम शांतता झाली.

एक कोंबडा आजच्या चिकनच्या मेनूमध्ये आपली आहुती पडू नये म्हणून जिवाच्या आकांताने पळतोय... त्याच्यामागे दहा पंधरा जण हातात पिस्तुलं घेऊन धावत आहेत... अगदी मुंबईच्या झोपडपट्टीतलंच वाटावं असं आजूबाजूचं वातावरण... मात्र पडद्यावरच्या उन्हाचा रखरखाट अगदी थेटरातल्या एसीतही जाणवतो आहे... कोंबडा गल्लीबोळ हिंडून नंतर मेन रोडवर येतो... तोपर्यंत त्याच्यामागं पळणार्‍यांची संख्याही हळूहळू वाढते आहे... त्यांच्या हातातील पिस्तुलं उन्हात चमकत आहेत... मेन रोडवर हातात कॅमेरा घेऊन एक पत्रकार उभा आहे... त्याच्यामागं बरेच दूर दोन-तीन पोलीस उभे आहेत... मात्र पोलीसांना काडीचीही किंमत न देता गटाचा म्होरक्या कॅमेरामनला तो कोंबडा पकडायला सांगतो... आणि चित्रपट फ्लॅशबॅकमध्ये जातो.

रिओ दि जानेरो शहरातल्या झोपडपट्टीतील जीवनावर आधारित हा चित्रपट आहे. मादक द्रव्यांची तस्करी, स्वार्थी राजकारणी, भ्रष्ट्राचारी पोलीस यांच्या कचाट्यात सापडलेल्या रॉकेट आणि लिट्ल झेड या समवयीन तरुणांची होणारी होरपळ यांची ही कथा. ज्या शहरात मादक द्र्व्यांचे व्यापारी हेच राजे आहेत तेथे हे दोघे वेगवेगळ्या मार्गाने कसे पुढे जातात आणि पुढं त्यांचं काय होतं याची आपल्याला अक्षरश: मुळापासून हादरवून टाकणारी गोष्ट.

रॉकेटच्या निवेदनातून ही कथा उलगडत जाते. पैसा, सत्ता व पुढे प्रसिद्धी यांचे अमाप आकर्षण असणार्‍या लिट्ल झेडचे आयुष्य दोन-तीन दशकांच्या वाटचालीत कसे बदलत जाते. गुन्हेगारी विश्वातील त्याच्या प्रवासात अडथळा ठरणारे - न ठरणारे यांना मनात येईल तेव्हा मारुन टाकणे. जे माझ्याबरोबर नाहीत ते सगळे माझ्याविरोधात असं उफराटं तत्त्वज्ञान लावणार्‍या झेडला पुढे शेरास सव्वाशेर असा फायटर नेड भेटतो. दोघांमधल्या वैयक्तिक वादाचा उपयोग प्रतिस्पर्धी गॅंग लिट्ल झेडशी लढण्यासाठी करु लागते. केवळ लिट्ल झेडशी असलेले भांडण सेटल करण्यासाठी यात सामील झालेला नेडही ह्या गॅंगवॉरमध्ये पुढे पूर्ण गुरफटून जातो.

सिटी ऑफ गॉडमध्ये एकही लोकप्रिय किंवा प्रोफेशनल म्हणावा असा कलाकार नाही. फेस्टिव्हलच्या माहितीपत्रकात आणि चित्रपट सुरु होण्यापूर्वीच्या निवेदनात दिलेल्या माहितीनुसार चित्रपटातील अगदी सगळेच कलाकार हे तिथलेच स्थानिक रहिवासी आहेत. आणि हा चित्रपटाचा खूपच स्ट्रॉंग पॉइंट आहे.
संपूर्णपणे दिग्दर्शकाचीच कामगिरी म्हणावा असा हा चित्रपट आहे. पहिल्या प्रसंगापासून तर शेवटच्या प्रसंगापर्यंत आपण स्वत: हे सगळं अनुभवत आहोत असं वाटत राहतं.

चित्रपटातल्या एका प्रसंगात लिट्ल झेडची सारखी कुरापत काढणार्‍या दहाबारा वर्षाच्या मुलांच्या टोळक्यातील दोन मुलं त्याच्या हाती लागतात. तेव्हा या दोघांपैकी कोणाला मारायचं आणि कोणाला ठेवायचं याचा निर्णय तो गॅंगमध्ये नव्यानेच सामील झालेल्या तितक्याच वयाच्या मुलाला सांगतो. आता आपल्यापैकी कोण मरणार याची दोघांच्या डोळ्यात दिसणारी भीती आणि या दोघांपैकी कोणाला मारलं तर लिट्ल झेड आपल्याला मारणार नाही या गहनप्रश्नात गुंतलेला मारेकरी हा प्रसंग पाहताना आपल्या मनात अगदी आतमध्ये काहीतरी टोचतं आणि तोंडाची चव कडवट होते.

"थोडं समजुतीनं घे" असा लिट्ल झेडला नेहमी सल्ला देणार्‍या, रंगीत केस आणि रंगीत कपडे घातले की आपण 'सेक्सी' दिसू असा विचार करणार्‍या, त्याच्या लहानपणापासूनच्या पार्टनरचं - बेनीचं कॅरॅक्टरही असंच जिवाला चटका लावून जाणारं आहे.

चित्रपटातील गोळ्यांचा खणखणाट, सतत-प्रत्येक क्षणाला अंगावर येणारा हिंसाचार यामागे सतत जाणवत राहते ते माणसाच्या मनातलं क्रौर्य. जगण्याचा दुसरा कोणताही "मानवी" मार्ग शिल्लक नसल्यामुळे याच मार्गावर वळण्याची अपरिहार्यता. अगदी सात-आठ-दहा वर्षाची मुलंही हातात खुलेआम पिस्तुलं घेऊन सिटी ऑफ गॉड मध्ये फिरताहेत, दिवाळीच्या टिकल्या वाजवाव्यात तशा बंदुका झाडताहेत हे पाहून आपण उद्विग्न होतो. हे सगळं कशासाठी चाललंय. ज्याच्या नावानं हे शहर उभं आहे तो आकाशातला देव झोपलाय का? त्याला हे सगळं थांबवता येत नाही का? या लोकांना जगण्यासाठी दुसरे पर्याय उपलब्ध नाहीत का? असल्या असंख्य प्रश्नांचं मोहोळ मनामध्ये उभं राहतं.

चित्रपटाच्या शेवटी येणारं "हा चित्रपट वास्तव प्रसंगांवर आधारित आहे" हे वाचून तर आपण अगदीच बधीर होऊन जातो. चित्रपट संपल्यावर "सुंदर चित्रपट" म्हणून टाळ्या वाजवायचंही कोणाला भान राहत नाही.

चित्र विकिपीडिया वरुन घेतले आहे.
हाच लेख येथेही वाचता येईल.