कांदा बटाटा रस्सा भाजी

  • कान्दे व बटाटे अर्धा किलो प्रत्येकी
  • फोडणीचे साहित्य
  • दोनशे ग्राम दाण्याचे कूट
  • दोनशे ग्राम सुके खोबरे (किसून)
  • लसूण वीस - तीस पाकळ्या
३० मिनिटे
पाच जणाना पोटभर

प्रथम कांदे बारीक पण उभट कापून घ्यावेत (डोसा भाजीत असतात तसे). बटाट्याच्या मोठ्या फोडी करून पाण्यात टाकाव्यात.

लसूण चांगली ठेचून घ्यावी.

तेल तापवून ते धुरावल्यावर त्यात मोहरी, हळद, ठेचलेली लसूण, व तिचा रंग थोडा बदलला की लाल तिखट घालावे. लसूण घातल्यावर ज्योत बारीक करावी.

त्यात चिरलेला कांदा घालून ज्योत मोठी करावी व भराभर हलवावे. कांदा रंग बदलू लागला की ज्योत बारीक करून त्यात दाण्याचे कूट व किसलेले खोबरे घालावे (निम्मे). आता सतत हलवणे गरजेचे आहे, अन्यथा सुके खोबरे / दाण्याचे कूट लगेच खाली लागते.

खोबरे आणि कूट तेल पाझरू लागले की बटाटा घालावा. ज्योत मोठी करून हा मसाला सर्व बटाट्याला लागेल अशा रीतीने हलवावे.

ज्योत बारीक करावी. एक पाण्याचा हबका मारावा आणि झाकण ठेवून वाफ आणावी. परत सर्व हलवून, गरज असल्यास पाण्याचा अजून एक हबका मारून, झाकण ठेवून वाफ आणावी. आता बटाटा होत आला असेल (उलथण्याने कोचून पहावे) तर उरलेले कूट आणि उरलेला कीस घालावा, थोडे कोमट पाणी (जितका रस्सा पाहिजे असेल त्या अंदाजाने) घालावे आणि रस्सा रटारटा शिजवावा. चवीनुसार मीठ घालावे.

यात लसूण, खोबरे आणि दाण्याचे कूट यांचे प्रमाण आपापल्या आवडीवर ठरते. लसणीचा ठसका जितका जास्त तितकी ती चव अस्सल. बारीक लसणीचे खरपूस तळले गेलेले तुकडे तरंगताना दिसणे म्हणजे त्या असलीपणाची परमावधी.

जितके जास्त खोबरे आणि कूट तितका त्यावर तवंग येतो. फार तिखट नको असल्यास परंतु तवंग लाल पाहिजे असल्यास काश्मिरी मिरच्यांचे तिखट वापरावे.

* तैलजन्य पदार्थांचा सढळ वावर असलेला हा पदार्थ आहे याची परत एकदा जाणीव करून देण्यात येत आहे!

* या सोबत तेल लावलेली घडीची पोळी झकास लागते. यात कुस्करून घालण्यासाठी शिळी भाकरी असेल तर आनंद.

सातारा, कराड, कोल्हापूर या भागातल्या जुन्या खाणावळी