भैरवी - एक कादम्बरी

श्री नारायण वासुदेव फडके यांची भैरवी ही कादंबरी नुकतीच वाचली. कादंबरी तशी जुनी आहे - १९८९ ला प्रसिद्ध झालेली. म्हणजे बऱ्याच जणांना कल्पना करायलाही अवघड. असो.

विशेष लिहावेसे वाटले कारण ही कादंबरी सुरुवातीपासूनच वेगळेपण दाखवत जाते. प्रथम म्हणजे श्री द्वारकानाथ कर्णीक यानी केवळ हस्तलिखित वाचले एवढेच नाही तर मुद्रित शोधनही केले. श्रीविद्या प्रकाशनाने हे प्रसिद्ध केले. दुसरे म्हणजे सुरुवातीची अवतरणे. मल्लिनाथ (हे कोण होते कुणाला माहीत आहे का?), रविंद्रनाथ टागोर, आईन्स्टाईन, भवभूती, शेक्सपीअर आणि लॉर्ड बायरन एवढ्या जणांना अवतरवले आहे. त्यातील भवभूती आणि बायरन यांच्या अवतरणांचा सविस्तर उहापोहही केलेला आहे.

अवतरणांचाच विषय आहे तर, एकंदरीतच पुस्तकात ती अगदी सढळ हाताने वापरली आहेत. त्यात बरीच संस्कृत आहेत. त्यातच एखादी मराठी गाण्याची ओळही घुसून बसलेली आहे.

लेखक वाचकाला खेळवत जातो. वर्णनाचा प्रकार अगदी बाळबोध आहे असे वाटेस्तोवर मध्येच सटकन एखादी खोचक, बोचक आणि 'प्रतिगामी' टिपणी करून जातो. (निसर्गाविरुद्ध आपले नाजूक गोल गोल, मऊ मऊ दंड ठोकून उभी ठाकलेली स्त्री मुक्ती चळवळ अजून आपली चविष्ट, आंबटगोड गर्जना करीत या सदाशिव - पार्वती युगुलापर्यंत पोचली नव्हती हे उघड आहे - पान ४५).

कथानक अगदीच सरळ आहे. पण पात्रे येतात आणि जातात एवढ्यावर न थांबता कधी कधी स्पाईक मिलिगन या आयरिश लेखकाच्या "पकून" (Puckoon) या कादंबरीची आठवण व्हावी अशा रीतीने लेखक पात्रांबद्दल आपल्याशी वेगळाच सम्वाद साधू पाहतो. इथे या कादंबरीचे वेगळेपण उठून दिसते.

मानसिक आजार आणि उपचार यांचे सविस्तर वर्णन हे या कथानकाच्या उत्कर्ष बिंदूला नेणारे महत्त्वाचे दूत. ते (वर्णन) बरे जमले आहे. त्यात तांत्रिक दृष्ट्या काही राहिले असेल तर माहीत नाही.

समीक्षा करताना जे स्वातंत्र्य मिळते त्याचा फायदा घेऊन नोंदवतो की हा प्रयोग वेगळा आणि आकर्षक असला तरी तो फारसा यशस्वी झालेला नाही. त्या नावीन्यातच लेखक गुरफटून गेलेला दिसतो. लेखकाची एकंदर विचारधारा ही त्या काळाची प्रकर्षाने आठवण करून देते. त्या अर्थाने लेखक काळाच्या पुढे नाही.

शेवटी फारच घाई करून कथानक गुंडाळले आहे. (इतके की पुस्तक संपले हेदेखील पटकन कळत नाही - पान ३१० वर कथानक संपते आणि पान ३११ वर लेखकाच्या अजून तीन पुस्तकांची जाहिरात आणि काही प्रतिक्रिया आहेत, त्या कथानकाचाच भाग म्हणून पटकन वाटते) काही पात्रे तर फारच अनाकलनीय रीतीने कथानकातून बाहेर पडतात. येथेही लेखकाच्या मर्यादा ठळक दिसतात. पात्रांचे अचानक बाहेर पडणे हेसुद्धा खूप चित्तवेधक आणि आकर्षक करता येते (Mario Vergas Llosa या लेखकाची Aunt Julia and The Scriptwriter ही कादंबरी).

कमल शेडगे यांच्यासारख्या प्रथितयश कलाकाराने केलेले मुखप्रुश्ठावरील चित्र फारच निराशा करते. ते जर कथानकाशी संबंधित असेल तर कुतुब मिनार अथवा चीनच्या भिंतीचे चित्रही कथानकाशी तेवढेच संबंधित आहे!

एक वेगळा प्रयोग करण्याचा प्रयत्न - थोडा कमी जमलेला, थोडा जास्ती फसलेला असे वर्णन करून हे आटपतो.