ह्या गंगेमधि गगन वितळले

p

ह्या गंगेमधि गगन वितळले, शुभाशुभाचा फिटे किनारा
अर्ध्या हाकेवरी उतरला बुद्धगयेचा पिवळा वारा

विटाळलेली मने उघडती झापड-दारे आपोआप
अन् चिखली ये बिचकत श्वास, जणु पाप्याचा पश्चात्ताप

सुरांत भरली टिटवीच्या कुणि, मृत्युंजयता भोळी भगवी
आणि अचानक शिवली गेली, ध्रुवाध्रुवांतील काही कडवी

अजाणत्याच्या आकांक्षांतील शंख-शिंपले येऊन वरती
उघड्या रंध्रांमध्ये अनामिक गगनगंध हा ठेवून घेती

इथेतिथेचे फुटले खापर, ढासळली अन् जरा 'अहम्'ता
उभ्या जगावर चढली अडवी, तव मायेची कमान आता

ह्या गंगेमधि गगन वितळले, शुभाशुभाचा फिटे किनारा
असशील जेथे तिथे रहा तू, हा इथला मज पुरे फवारा
 -- बा. सी. मर्ढेकर

मर्ढेकरांची ही कविता वाचताना, का ते माहीत नाही, पण हटकून माझ्या डोळ्यासमोर मुंबईतल्या बाणगंगा मंदिराचा तलाव येतो(छायाचित्र येथून साभार). तसं पाहिलं तर, कुठलेही पुस्तक वाचताना आपल्या डोळ्यासमोर ज्या प्रतिमा उभ्या राहतात, त्या आपल्या अनुभवविश्वाच्या संचितातूनच परत वर येत असतात. एखाद्या ग्रामीण पार्श्वभूमीवरील पुस्तकातली वर्णने वाचताना, आपल्या नकळत आपला गाव आपल्या डोळ्यासमोर उभा राहतोच की. त्यामुळे मुंबईतीलच एखादी प्रतिमा या कवितेमुळे माझ्या मनात उभी राहणे हे साहजिकच आहे. अर्थात, हा प्रत्येकाच्या वैयक्तिक अनुभवाचा भाग झाला. दुसरं कारण असं असावं की, मर्ढेकर हे मराठीतील पहिलेच 'महानगरीय' कवी असावेत. निसर्ग, प्रेम, चांदणे, हृदयभंग यांच्याबाहेर पडून शहरातील - आणि विशेषतः मुंबईतील अनुभवांचे चित्रण करणारे. त्यामुळे ही कविता मर्ढेकरांना या (बाण)गंगेच्या पायऱ्यांवर बसून समोरच्या तलावातील आकाशाचे वितळलेले प्रतिबिंब पाहत पाहत, 'देव आहे की नाही? असलाच तर त्याचे काम काय?' असा विचार करत असताना सुचली असावी, असं मला सतत वाटत राहतं.

अर्थात या कवितेतील प्रत्येक शब्दाचा अर्थ किंवा तो वापरण्यामागचे प्रयोजन मला पूर्णपणे कळले आहे असे नाही, पण तिचा एकंदर आशय किंवा मूड थोडाफार पकडता येतो. 'भावनेला येऊ दे गा शास्त्रकाट्याची कसोटी' असे म्हटले तरी प्रत्येक गोष्ट, भावना बुद्धीच्या निकषांवर घासून तिचे स्पष्टीकरण देता येतेच असे नाही. विमनस्क परिस्थितीत, अतर्क्य अवस्थेत मग हे दैववादाचे 'विटाळलेले झापडदार' किलकिले होऊ लागते. एकदा का, 'तूच कर्ता आणि करविता' मान्य केले की ज्या प्रश्नांची उत्तरे आपली तर्कशक्ती देऊ शकत नाही असे प्रश्न आणि त्यांची उत्तरे यांच्यातले दोन ध्रुवांतले अंतर शिवले जाते. खूप वेळ भेडसावणाऱ्या साऱ्या प्रश्नांची उत्तरे सहज मिळणे किती सुखद आहे! आजवर अंतर्मनात, नेणीवेत दडपून ठेवलेले, स्वतःलाच कायम विचारलेले हे प्रश्न मग जाणीवेत येऊन हा सुखद उतारा, हा गगनगंध भरून घेतात. एकदा या दृष्टीने मग जगाकडे पाहिले, तर मग सगळ्या चराचरावर त्याचेच राज्य, त्याच्याच मायेची कमान दिसू लागते.

इथवर जरी कवितेचा अर्थ नीट लागत असला, तरी शेवटची परमेश्वराला 'असशील जेथे तिथे रहा तू' बजावणारी ओळ म्हणजे केवळ - 'देव शोधण्यासाठी देवळात जायची गरज नाही, या इथल्या फवाऱ्यात, सभोवतीच्या सृष्टीतच तो लपलेला आहे' अशा काहीशा बाळबोध अर्थाची असेल असा निष्कर्ष काढणे सयुक्तिक वाटत नाही. पण मग, आपल्या ढासळलेल्या 'अहम्'ची कबुली देणाऱ्या कडव्यानंतर अचानक हे आत्मभानाचा प्रत्यय येणारे कडवे का यावे? तात्पुरती चलबिचल झाली, तरी पुन्हा 'व्हेन रीझन रिटर्न्स टू इटस थ्रोन' झाले की जसा नव्याने आत्मविश्वास येतो ते दर्शविण्यासाठी? किंवा यापेक्षा तिसरेच काहीतरी अपेक्षित आहे किंवा काहीच नाही? मला वाटतं, याचं उत्तर प्रत्येकाने आपल्यापुरतं ठरवावं.

ही हवीहवीशी वाटणारी 'किंचित' दुर्बोधता/अनिश्चितता वाचकाला -- शांताबाई शेळकांच्या शब्दांत सांगायचे झाले तर 'जाणीव विरते तरीही उरते अतीत काही, तेच मला मम अस्तित्वाची देते ग्वाही' सारखी अनुभूती देणारी -- मर्ढेकरांच्या कवितांच्या इतर अनेक वैशिष्ट्यांपैकी एक म्हणता येईल.

[हाच लेख येथेही वाचता येईल]