थोरामोठ्यांच्या सहवासात...

चांगभलं दादानूं, सदानंदाचा येळकोट घ्या तायानूं!
बरं का मंडळी, फार दिवसांपूर्वीची गोष्ट आहे. संध्याकाळची वेळ होती. मुंबापुरीतल्या एका त्यातल्या त्यात शांत गल्लीतून मी आणि छगन्या रमतगमत फिरत होतो. आमचा छगन्या म्हणजे एक भारी व्यक्तीमत्व बरं का! कुठही जायचं म्हटलं की आधी स्वारी माझ्या दारात येऊन साद घालणार,"झेंगट्या, आहेस का मायजयां वागानं खाल्ला तुला?' (मायजयां ही आमच्या कोकणातली बोलीभासा आसा हां! नायतर पुन्ना माज्या चावडीवर होळीची लाकडं जमवीन मी!) झेंगट्या हे काही माझं खरं नाव नाही बरं का मंडळी! पण दोस्तांत मी झेंगट्या याच नावानं ओळखला जातो. हां, तर सांगत काय होतो, अशी छ्गन्याची साद आली की मी निमूटपणे लेंगाबिंगा चढवून पायताणं घालायला लागायचो. छगन्या तोवर "काय मावशी, तब्येत काय म्हणते आता?" अशा चौकशा करुन बेसनाचा लाडूबिडू खाऊन पायजम्याला हात पुसत उभा असायचा.तर असा एकदा छगन्याबरोबर फिरायला बाहेर पडलो. फिरताफिरता किती लांब आलो ते कळालंच नाही. नेहमीप्रमाणं काहीतरी गुणगुणत होतो. एकदोन जागा झिंझोटीच्या अंगानं गेल्या आणि वरच्या गॅलरीतून अचानक आवाज आला " भालो, खूब भालो - कौन गाना गाता हाय?" मंडळी, आवाज ओळखीचा वाटला आणि वर वळून पाहिलं तसा अंगावर सर्रकन काटाच आला !
वरच्या मजल्यावरुन साक्षात थोरले बर्मनदा खाली बघत होते. थोरले बर्मनदा म्हणजे आमचे आराध्य दैवत बरं का मंडळी! आम्ही डोळे भरून पहात राहिलो. नकळत पायातली पायताणे काढून छातीशी धरली. बर्मनदांनी त्यांच्या गुरख्याला काहीतरी ओरडून सांगितलं गुरखा लगबगीनं आमच्या जवळ आला. आम्ही नजर न हलवता अमिताभने मुलाला आणि सुनेला तिरुपती बालाजीच्या पायावर घालताना बघावं तशा भक्तीभावानं वर बघत होतो. "आय, लडका लोग, टुमको शाब बुलाटा हाय" गुरखा दरडावणीच्या स्वरात म्हणाला. काय सांगू मंडळी, अहो, 'पुंडलिका भेटी परब्रम्ह आले गा' अशी आमची अवस्था झालेली. लगबगीनं आम्ही पायर्‍या चढून वर गेलो. बर्मनदा झोपाळ्यावर बसले होते. तोंडात भरपूर रंगलेले पान होतेच. आम्ही त्यांच्या पायावर लोळणच घेतली. "अरे बेटा, गले मिलो -" बर्मनदांनी आम्हाला उराशी धरले. "अब सुनाओ, जो नीचे गा रहे थे.." अहो, बर्मनदांसमोर गायचं म्हणजे काय खायचं काम आहे का मंडळी! आम्ही मनातल्या मनात रोकडेश्वराचं स्मरण केलं आणि पेटी पुढे ओढली. झिंझोटी म्हणजे आमचा आवडता राग बरं का मंडळी! साधारण अर्धा तास आम्ही तो आळवला. बर्मनदा तल्लीन होऊन ऐकत होते. "जिओ बेटा जिओ, क्या तैयारी हाय! अब ये सुनो - " असं म्हणून बर्मनदानी आमच्याच सुरावटीवर बांधलेली रचना आपल्या खड्या आवाजात गायला सुरुवात केली
"मोसे छल किये जाय
हाय रे हाय देखो
सैंया बेईमान -"
(पुढे ती रचना खूप गाजली वगैरे सगळा इतिहास आहे, पण त्याविषयी पुन्हा कधीतरी!) बर्मनदांच्या घरुन चमचम, शोंदेश वगैरे खाऊन भरल्या पोटाने आणि तृप्त मनाने आम्ही पायर्‍या उतरत होतो तेवढ्यात खालच्या मजल्यावरुन "ऑरे झेंगट्या, तुम इदर क्या करता हाय?" अशी आणखी एक हाक ऐकू आली. टी शर्ट आणि शॉर्टसमधली एक चष्मीश गोलमटोल आकृती घरातल्या घरात फुटबॉल खेळत होती. हा आपला पंचम बरं का मंडळी! माझ्या गणेशोत्सवातल्या गाण्याच्या कार्यक्रमात कधीतरी तंबोरा धरायला वगैरे यायचा. 'रैना बीती जाय - ' चा वेळी सुरुवातीचा आलाप कसा घ्यायचा यावर रडकुंडीला आला होता बिचारा. 'झेंगट्या. बचा लो यार. दीदी का गाना हाय, अच्छा होना चाहिये - ' असं म्हणत माझ्या घरी आला होता. तेंव्हा त्याला पुढ्यात बसवून त्याच्या गळ्यातनं ती जागा घोटवून घेतली होती. पुढे ते गाणं खूप गाजलं. त्याचा एक वेगळा किस्सा आहे, पण तो किस्सा पुन्हा कधीतरी -
बर्मनदांच्या घरुन बाहेर पडलो. मन धुंद झालं होतं. ही संगीताची धुंदी काही वेगळीच चीज आहे बरं का मंडळी! चालत चालत पेडर रोडवर कधी आलो ते कळालंच नाही. अचानकच आजूबाजूची गर्दी वाढल्याचं जाणवलं. लोक टाचा उंच करकरुन बघत होते. आम्हीही गर्दीत सामिल झालो. पांढऱ्या शुभ्र साडीतल्या लतादीदी गच्चीत फेऱ्या मारत होत्या. त्यांचा दारवान पांडुरंग माझ्या चांगल्याच ओळखीचा आहे (आम्ही दोघे पास्कलच्या अड्ड्यावर - पण तो किस्सा पुन्हा कधीतरी!) "काय झेंगट्या, तंबाखू काढ गड्या!" पांडुरंग म्हणाला. मी पुडी त्याच्या हातात ठेवली. "दीदी भेटतील का रे पाच मिनिटं?" मी भीतभीतच त्याला विचारलं. "थांब हां जरा - मी विचारुन येतो - ही तंबाखू धर जरा तोवर" पांड्या माझ्या हातात मळलेली तंबाखू देऊन हात झटकत आत गेला. इकडे आम्ही माना उंचावून बघतोय, हातात मळलेली तंबाखू सत्यनारायणाचा प्रसाद धरावा तशी धरलेली आणि दीदींच्या गच्चीतल्या फेऱ्या सुरुच! 
पाच मिनिटे झाली असतील नसतील. पांड्या धापा टाकत खाली आला "लेका झेंगट्या, दीदी कालपास्नं तुला फोन लावतायत. तू काहीतरी बील भरलं नाहीस म्हणून तुझा फोन बंद आहे, असं काहीतरी रेकॉर्डिंग ऐकू येतंय म्हणे. मला म्हणाल्या, "संगीतात काय जादू असते बघ पांडुरंग! मंगेशीनं आपणहून त्याला पाठवला!" मंगेशी म्हणजे आमचं आणखी एक श्रद्धास्थान बरं का मंडळी! "जा लवकर वर!"
आम्ही परत पायताणे काढून छातीशी धरली. वर गेलो. दीदींच्या फेऱ्या संपल्या होत्या. आमच्याकडं बघून त्या नेहमीप्रमाणं प्रसन्न हसल्या. "या, या, झेंगटराव, अहो कित्ती दिवस झाले, काही गाठ नाही, भेट नाही-" दीदींच्या तोंडून 'कित्ती' हा शब्द ऐकणं म्हणजे एक स्वर्गीय अनुभव आहे बरं का मंडळी! आम्हाला वाटलं आता 'आयेगा आनेवाला-' म्हणतायत की काय! पण त्या म्हणाल्या, "चपला, तिथं दाराशी ठेवल्या तरी चालतील!"
मग आम्ही बसलो. दीदींनी पन्हं मागवलं. दीदींच्या घरचं पन्हं म्हणजे काय चीज आहे मंडळी! छगन्यानं बावळटासारखं तीनतीनदा मागून घेतलं. "अहो, तुमची मुद्दाम आठवण झाली म्हणजे मीरेची काही भजनं रेकॉर्ड करत्येय. बाळचं डायरेक्शन आहे, पण त्यातल्या काही जागा अपुऱ्या वाटतायत मला! आता हेच बघा" दीदींनी चष्मा सावरत आमच्यापुढं कागद ठेवला. आम्ही पुन्हा एकदा रोकडेश्वराचं स्मरण केलं आणि हार्मोनियम पुढं ओढला. पुढं ती भजनं खूप गाजली वगैरे -पण तो किस्सा पुन्हा कधीतरी!