मुंज करावी का?

मुंज, मौंजीबंधन, व्रतबंध अथवा तत्सम नावांनी ओळखला जाणारा विधी करावा का? आणि का करावा?

'आपण' ('आपल्यात' हे करतात) आणि 'ते' ('त्यांच्यात' हे करत नाहीत; इथे एक विशिष्ट जात सोडून बाकी सर्व जाती आणि धर्म एकत्र 'त्यांच्या'त ढकलले जातात) असा फरक त्या कळत्या-नकळत्या वयातच मनावर बिंबवण्याखेरीज त्या विधीतून काय साध्य होते?

दुर्गा भागवतांनी एका लेखात म्हटले आहे की त्यांना मावळातील शेतकरी पीक कापणीला येण्याच्या काळात शेतात मध्यभागी एक काटकी पुरताना दिसले. दुर्गाबाईंनी त्या प्रथेचा शोध घेतला तेव्हा असे कळले की फार पूर्वी त्या हंगामात पिकांवर येणाऱ्या पाखरांना हाकलण्यासाठी शेतात एक मोठा खांब पुरत आणि त्यावर मचाण बांधत. कालांतराने त्या खांबाची काटकी झाली!

तसेच या विधीचेही झालेले आहे असे वाटत नाही काय? ज्याला ह्या विधीतून जावे लागते ते रत्न बहुतेक वेळेला ('बहुतेक' हा एक सर्वसाधारण शब्द आहे; नक्की किती टक्के ही आकडेवारी मजपाशी नाही) कुठल्यातरी ख्रिश्चन 'संता'च्या (या ख्रिश्चन संतांचे मूळ पाहिले तर वेगळीच मजा येईल; 'संत' झेवियर यांचे कर्तृत्व काय तर त्यांनी गोव्यावर 'हिंदू' चालून आले असता त्यांना पळवून लावले आणि ख्रिश्चन 'धर्मगुरूंचे' बाटवाबाटवीचे उद्योग निर्विघ्न चालू ठेवण्यास मदत केली) नावे चालवलेल्या शाळेत विद्या ग्रहण करत असतो. त्यांना संस्कृतचा 'स' अथवा परंपरेचा 'प' देखिल माहीत नसतो. अशा वेळेला त्यांच्या एका विशिष्ट जातीत जन्मलेल्या आई-बापांच्या मनातील कुठलातरी गंड शमवण्याकरता हा विधी करावा का? हा विधी करून कुणी खरेच 'गुरुकुलात' गेल्याचे एक तरी उदाहरण आपल्याला आजच्या २००७ साली दिसेल काय? ज्याची मुंज झाली आहे तो मुलगा लग्न होईपर्यंत 'ब्रह्मचर्याश्रम' पाळेलच याची खात्री कोणी देईल काय?

हे सर्व आक्षेप लहान ठरतील असा मोठा आक्षेप - थोडक्यात म्हणजे स्त्रिया आणि इतर जातींतील लोक यांनी विद्याग्रहण करू नये असेच गृहीतक या विधीतून ठसवण्याचा निंदनीय प्रयत्न या विधीतून बिनबोभाट होत नाही काय? बाकीच्यांचे सोडा, पण या समारंभात ज्या मारे नथी आणि शालू घालून मिरवतात अशा स्त्रियांना हे खटकत नाही काय?

हा 'हिंदू धर्मावर' हल्ला आहे असा गळा काढणाऱ्यांनी आधीच थांबावे. हा केवळ एका जातीतल्या एका लिंगाच्या जुनाट कर्मकांडाविरुद्धचा आक्षेप आहे. आणि 'आम्ही आमच्या घरी काय वाटेल ते करू' म्हणू इच्छिणाऱ्यांनी आपण जे करतो आहोत त्यामुळे समाजात दुहीचा संदेश जात नाही ना याचा विचार करायला नको का? आणि हे कुणाच्या 'घरी', इतरांना नकळत होत नसून चारचौघात सर्वांना कळेल अशा थाटात होते.

समाज सुरळीत चालू रहावा यासाठी काही विधी आवश्यक असतात. लग्न हा त्यातीलच एक. त्यामुळे हे आक्षेप लग्नाला घेता येत नाहीत. कारण लग्न सर्वांचे (करू इच्छीणारांचे!) होते. जन्म सर्वांचाच होतो आणि मृत्यूही सर्वांचाच होतो. त्यामुळे ते विधी या चर्चेत आणत नाही. अन्यथा या चर्चेचा पट फारच विस्तारेल आणि हा प्रश्न अलगद नगण्य होऊन जाईल. कृपया प्रतिसाद देताना ते टाळावे.

'आमचा पैसा आम्ही कसा खर्च करू हे इतरांनी सांगू नये' हे खुसपट मान्य. ते मी सांगूही इच्छीत नाही. फक्त तो अशा 'विकृत' मार्गांनी खर्च करू नये असे वाटते.

शेवटी, आम्ही मुलींचीही मुंज करायला तयार आहोत असा खुळचट प्रतिसाद देण्याआधी मानवजातीतल्या सर्वांची मुंज करायला (स्व-खर्चाने नव्हे) तुमची तयारी आहे का? आणि त्याहून महत्त्वाचे म्हणजे आजच्या काळात ह्या विधीला काही अर्थ आहे काय? या प्रश्नांची उत्तरे द्यावीत.

तळटीप: माझा धर्म आणि जात वरील लिखाण वाचताना गौणच नव्हे तर निरर्थक मानावी. तसेच हे लिखाण कोणाही व्यक्तीला नजरेसमोर ठेवून केलेले नाही याची खात्री बाळगावी.

मतभेद असू शकतील, नव्हे असतीलच. मतभेद असणे हेच तर 'जिवंतपणाचे' लक्षण. त्यातून विचारशक्तीचा पट विस्तारावा एवढ्याच हेतूने हे लिखाण झाले.