आमचे (ही ) काही आदर्श!

चांगभलं दादानूं, सदानंदाचा येळकोट घ्या तायांनू!
नाही, मी काय म्हणतो, की आमचे आदर्श कोण असावे, हे दुसऱ्या कुणी का ठरवावे हो? आता आमच्या भांगिर्दे खुर्दच्या (जि. सिंधुदुर्ग)  शाळेत नाही आम्हाला पु. ल. आणि भा. रा. वाचायला मिळाले, म्हणून काय आम्हाला आदर्शच नसावेत? एकतर शाळेत नाईलाज म्हणून जी पाठ्यपुस्तके वाचायला लागायची ती सोडून काही वाचायचे असते, याचा आम्हाला पत्ताच नव्हता.  आमचे पळसुले मास्तर म्हणायचे "झेंगट्या, बुके वाचीत रहाणे म्हणजे निव्वळ काळाचा अपव्यय हो! अरे, बुके वाचून माणसांस शहाणपण येत असते तर या देशाचा गव्हर्नर एखादा बुकबायंडर नसता झाला? आता तुझ्या गजाकाकाचे उदाहरण घे. चांगला विलायतेला जाऊन बालिष्टर होऊन आला, बुके काय कमी वाचली असतील त्याने? पण कुल्यार पांणी कसे घ्यांवे हे कळतें कां त्यांस?" तात्पर्य काय,  तुमच्या धोंडोपंत जोशांचा मामा म्हणायचा ना की 'राजहंसाचे चालणे. जगीया जाहले शहाणे.....' वगैरे. मग आम्ही बुके नाही वाचली म्हणून आम्हांस काय आदर्शच असू नयेत?  आमचे आदर्श असे आमच्या आसपास वावरणारेच लोक असायचे हो! अगदी लहानपणी आमच्या मोलकरणीचा नवरा बापू हा आमचा आदर्श पुरुष होता. संध्याकाळी सातच्या नंतर आमच्या अंगणाच्या गडग्याच्या भिंतीपलीकडे तो किंचित झुलत उभा असे. आसपास आंबटसर वास दरवळत असताना तो आपल्या पत्नीविषयी काही मौलिक उद्गार काढत असे. असे मर्दानी भाष्य आपल्याला कधी करता येईल का अशी आकांक्षा मनाला चाटून जात असे. आमच्या शाळेत आम्हाला कधी कुणी लैंगिक शिक्षण दिले नाही, पण बापूने आमच्या काही मूलभूत कल्पना अगदी स्वच्छ करुन ठेवल्या होत्या. आमचे परचुरे मास्तर म्हणायचे "झेंगट्या, कुणी काही म्हणो, हे खरे मर्द हो! नाहीतर बाकी सगळे आमच्यासारखे! बायकोन जरा डोळे वटारले की धोतर ओले करणारे!" बापू तराळाचा एक वेगळाच किस्सा आहे, पण तो पुन्हा कधीतरी--
तसे नाही म्हणायला आम्हाला साहित्याची आवड होती हो! पण काय वाचावे आणि काय वाचू नये याविषयी आमच्या मनात बराच गोंधळ होता. आमच्या गुरुजनांचे पुस्तकाविषयी मत हे असले तर आमचे तीर्थरुप एकतर 'केसरी' नाहीतर ब्यांकेचे पासबुक येवढेच वाचणारे! मग आम्ही आमच्या मनानेच वाचायला शिकलो. लहानपणी समर्थांसारखे बलवान झाले पाहिजे या हेतूने आम्ही प्रेरित झालो होतो. एकदा कशाला तरी आम्ही आमच्या गजाकाकाच्या खोलीत गेलो असता तिथे कसलीशी आसने की काय अशा नावाचे एक सचित्र पुस्तक दिसले. योगासनांवर आमची बालपणापासून श्रद्धा हो! मग काय विचारता! आम्ही ते पुस्तक घेऊन दिवाणखान्यात आलो आणि पोथी वाचत बसलेल्या आजोबांच्या समोर बसून ते पुस्तक उघडले....

पुढचे काही नीटसे आठवत नाही. काही दिवस सुन्न झालेला गाल, कानात गूंsss असा होणारा आवाज, गजाकाकासाठी तात्काळ मुली बघायला झालेली सुरुवात असे काही झाल्याचे अंधुक आठवते. आमच्या गजाकाकाचीही एक वेगळीच कथा आहे, पण तोही किस्सा पुन्हा कधीतरी--
तात्पर्य काय, तर आम्हीही असे पडतझडत वाचायला शिकलो.शाळेत जायला लागण्याच्या वयात आमच्या गावात नवी लायब्री उघडली. आम्ही काहीसे बिचकतच त्या लायब्रीत जायला लागलो आणि पहिल्याच दिवशी बाबुराव अर्नाळकर यांचे फ्यान झालो. झुंझार, काळा पहाड, सुप.रंगराव हे आमचे त्या काळातले आदर्श! विशेषत: 'झुंझाररावांनी आपली गुप्त बॅटरी पेटवली. या बॅटरीचा प्रकाश फक्त त्यांनाच दिसू शके-' असली चिरंतन साहित्यीक मूल्ये असलेली वाक्ये आमच्या अजून लक्षात आहेत. हळूहळू मग सोबतीला एस.एम. काशीकर, गुरुनाथ नाईक असे शिलेदारही आले. अशा मंडळींत आम्ही गुंगूनही राहिलो असतो, पण एका आडबाजूला असलेल्या कपाटातली चंद्रकांत काकोडकर नावाच्या लेखकाची काही पुस्तकं आमच्या वाचनात आली. त्यांची पुस्तके आधी चोरुन आणि नंतर अभ्यासाच्या पुस्तकात घालून वाचली. आमचा छगन्या हा काकोडकरांचा जबरदस्त फ्यान!त्यांच्या त्या कमनिय नायिका, ते पदर ढळणे, ते गाल आरक्त होणे, कानशिले तप्त होणे - छगन्या आपली मनगटे चावत गुरुचरित्राची पोथी वाचावी तशा भक्तीभावाने काकोडकरांच्या कादंबऱ्या वाचत असे. छे! आठवले की अजून अंगावर बसलेले तीर्थरुपांचे फटके जागे होतात. दहावीला नापास होणाऱ्या किती विद्यार्थ्यांचे शिव्याशाप काकोडकरांनी घेतले असतील कुणास ठाऊक! 'काकोडकरांनी आमच्या भावविश्वावर केलेला परिणाम' हा एक वेगळ्या लेखाचा विषय आहे, पण तो किस्सा पुन्हा कधीतरी-
काकोडकरांनंतर आमच्या मनावर मोहिनी पसरली ती सुहास शिरवळकर नावाच्या जादूगाराची. वाहवा! काय त्यांची कल्पनाशक्ती! काय ती मोहमयी भाषा! त्याच काळात आम्ही रजनीकांत नावाच्या अभिनयसम्राटाचेही फ्यान झालो होतो, त्यामुळे शिरवळकर आम्हाला अधिकच भावत होते. आमच्या इकॉनॉमिक्सच्या पुस्तकात केटी मिर्जा, कोमिला विर्क आणि आशा सचदेवच्या जोडीला आम्ही शिरवळकरांचाही एक ष्टाईलबाज फोटू लपवून ठेवला होता. अडचण फक्त एवढीच होती की लोकांच्या शिरवळकरांबद्दाल्च्या कल्पना इतक्या भन्नाट असत की त्यांना हेच ते शिरवळकर हे काही पटत नसे. शेवटी मीच ज्याला त्याला फोटो दाखवून 'ओळख बरं , ओळख बरं---?' असं विचारून बघीतलं, पण कुणाला काही टोटल लागली नाही. नाही म्हणायला छगन्याच एकदा 'गुलशन बावरा का रे?' असं म्हणाला!
असे हे आमचे लहानपणीचे आदर्श मंडळी! यांच्याशिवाय केश्तो मुखर्जी, जगजीवनराम, जोगिंदर, अनिल धवन असेही आमचे काही आदर्श होते, पण तो किस्सा पुन्हा कधीतरी---