सुवर्ण शृंगार

आंब्याच्या झाडावरून लावण्य ओसंडत होते
मोहोराचे थेंबथेंब धुंदावून सांडत होते

सोनेरी फुलोऱ्याने फांदीफांदी सजली होती
धरणीची माया कणाकणात रुजली होती

निसर्गाचं देणं, लेणं म्हणून ल्यायलं होतं
रूपाचं देखणेपण अमृत म्हणून प्यायलं होतं

नव्हतं कोणी जवळपास, होता फक्त रानवारा
धुंदावल्या मधुगंधाने धुंदावला आसमंत सारा

निसर्गाचा सुवर्णशृंगार आकाश निरखीत होतं
आंब्याचं झाड मात्र देखणेपणा मिरवीत होतं

- मंजुश्री.