उडत्या छबकड्या

अर्थातच हवाई सुंदरी!

लहानपणी प्रत्येकाला विमानाविषयी प्रचंड कुतुहल असते. किती मौज दिसे ही पाहा तरी, हे विमान उडते अधांतरी' असे म्हणताना प्रत्येकाला त्या विमानात बसायची उत्सुकता असते. पुढे मोठेपणी जेव्हा सर्रास विमानप्रवास घडू लागतो तेव्हा 'दूरून डोंगर साजरे' याचा प्रत्यय येतो. साध्या अंतर्गत उडडाणापूर्वी एक तास तरी अगोदर विमानतळ गाठावा लागतो. त्यासाठी त्या वेळेच्या दीड तास आधी (मुंबईची वाहतूक हो!)घरुन निघावे लागते. विमानतळावरची गर्दी. कोलाहल, ते गचाळ व्यवस्थापन, उडाणपत्रासाठीच्या लांबलचक रांगा, पुन्हा तपासणी व मग आपल्या उड्डाणाच्या उद्घोषणेची वाट पाहत ते ताटकळणे मग उतरल्यावर आपले सामान ताब्यात घेण्यासाठी ढकलगाडीची शर्यत व शेवटी सरकपट्ट्यावरची पकडापकडी .....एकूण नको तो विमान प्रवास असे वाटते.

या सर्वात जर काही विरंगुळा असेल तर त्या स्मितसख्या! विमानतळावर असेपर्यंत वरमाई सारख्या तोऱ्यात वावरणाऱ्या या सुंदऱ्या विमानाच्या प्रवेशद्वारात मात्र आपल्या घरचे कार्य असल्याच्या थाटात अगत्याने हात जोडून स्वागताला उभ्या असतात. आत शिरताच आपले उड्डाणपत्र पाहून आपल्याला आसनस्थ करणारी दुसरी फळी सज्ज असते. प्रवासी कितीही आणि कसेही असले तरी प्रवासी आसनांत आणि सामान खणात असे गणित या गोड मुली बरोब्बर जमवितात. अर्थात काम इथे संपत नसते तर सुरू झालेले असते. कुणाला वर्तमानपत्र, कुणाला पाणी, माझ्यासारख्याला उशी अशी धावपळ आणि तीही तत्परतेने व हसतमुखाने. देवळात कीर्तन झाल्यावर तबक फिरविले जाते, विमानात ते नमनाला फिरते. गोळ्या, कापूस यांची प्राथमिक फेरी संपताच स्वागतपेयाचे वाटप. मग ताजेतवाने होण्यासाठी वाफाळलेले वा थंडगार सुगंधी रुमाल! जरा कुठे निवांत होतंय असे वाटते तोवर अल्पोपाहाराची वेळ होते. मग अंगावर पुढचा भाग झाकणारा खाटीक-झगा घालून या स्मितसख्या अन्नपूर्णावतारात प्रकट होतात. कुणाला शाकाहारी, कुणाला मांसाहारी, कुणाची फळांची मागणी तर कुणाला नुसती चहा/ कॉफी अशी व्यवधाने सांभाळत आणि 'उतणार नाही, मातणार नाही, स्मिताचा वसा सोडणार नाही' अशा निग्रहाने या 'मधुमक्षिका' विहरत असतात.

व्यक्ती तितक्या प्रकृती या म्हणीला अनुसरून जितक्या विमान कंपन्या तितक्या प्रकारच्या स्मितसख्या. एअर फ्रान्सच्या काहीश्या परिटघडीच्या खडूस सेविका, एमिरेट्सच्या चंट पण अगत्यशील सेविका, सिंगापूर एअर च्या प्रसन्न व चुणचुणीत बाहुल्या, थाई एअर च्या लडिवाळ सेविका, चायना सदर्न च्या इंग्रजी येणाऱ्या छोकऱ्या, एअर शांघाय च्या तत्पर सेविका, चायना ईस्टर्न च्या लगबगीने वावरणाऱ्या बाहुल्या, एअर चायना च्या लाल पऱ्या, व्हांग यान ते शांघाय या अल्प उड्डाणात चाळीस आसनी कॅनडेर जेट एक हाती सांभाळणारी हुइनान एअर ची एकमेव चपला, जेट च्या काहीश्या औपचारिक पण प्रसन्न सेविका, किंगफिशर च्या कर्तव्यतत्पर चुणचुणीत सेविका.....सर्वांमध्ये साधर्म्य एकच, आणि ते म्हणजे चेहऱ्यावरील स्मितहास्य. अर्थात याला इंडियन एअरलाईन्स सारखे सन्माननिय अपवाद असतात, पण असो. शारीरिक शिक्षणाच्या शिक्षिकेला जर चित्रकलेचा तास दिला तर तिची काय चूक?

अविरत कार्यरत असणाऱ्या या सुस्मिता खरोखरच चतुरस्र व्यवधान सांभाळून असतात. कागदपत्रातल्या नोंदी, खाणे-पिणे, प्रवासींना कौशल्याने सांभाळणे, न दुखावता नाठाळ प्रवासींना नियमाची जाणीव करून देणे, सर्वांना हवे नको ते पाहणे, विशेषतः: आंतरदेशीय उड्डाणांमध्ये लांबच्या प्रवासात अथकपणे लक्ष ठेवणे, लहान मुलांना रिझविणे; अस्वस्थ होऊन रडणाऱ्या बाळांना शांत करण्यात त्या बाळांच्या मातांना मदत करणे, उतरण्या आधी प्रवेशपत्रांचे वाटप, विमानात जंतुघ्नाचे नियमानुसार फवारे,असे एक की अनेक. चेहऱ्यावर त्रासिक भाव न आणता हे सगळे त्या एखाद्या गृहिणीच्या सहजतेने करत असतात. तेही परक्यासाठी. कुणी म्हणेल की त्यांना रग्गड पगार मिळतो, कुटुंबासह फुकट जग फिरायला मिळते वगैरे. पण तरीही मिळालेल्या पगाराचे पुरेपूर माप देणे कितीजण अनुसरतात? जे चांगले आहे  ते चांगलेच म्हटले पाहिजे. आपले काम सगळेच करतात, काहीजण ते उत्कृष्ट करतात, कारण त्यांच्या दृष्टीने ते काम नसते तर तो त्यांचा छंद असतो जणू.

छोट्याश्या प्रवासात अचानक कधी कधी यांच्याशी गट्टी जमते. पैचिंग - सिंगापूर उड्डाणातली गोष्ट. अचानक पैचिंग विमानतळावर माझ्याच उड्डाणात एक मराठी सहप्रवासी लाभल्याने आम्ही दोघेही खुशीत होतो. दहा-बारा दिवसांनी आपल्या भाषेत गप्पा मारायला मिळत होत्या. सिंगापूर एअरलाईन्सच्या विमानात शिरलो तर स्वागताला चक्क हिंदुस्थानी चेहरा! वा रे वा. आज योग भलताच जोरदार असावा. 'हिंदुस्थानी चेहरा पाहून खूप आनंद होतोय' असे आम्ही सांगताच ती दिलखुलासपणे हसली. उड्डाण होऊन जरा स्थिरस्थावर होताच ती अगत्याने भेटायला आली व मस्त पैकी गप्पा झाल्या. आलेच हं, असे म्हणत ती गेली आणि येताना तबकात घेऊन आली ती कुरमा आणि गरमागरम बिर्याणी! असा योग जुळून यावा लागतो. बॅंकॉक - ग्वांगझौ प्रवासात अशीच गंमत झाली. मद्य फेरी सुरू होती. बाई मोठ्या रंगात आल्या होत्या. लहान बाळाला उजवा हात मानेखाली आणि डावा हात खालच्या अंगाला घेऊन उभे धरतात तद्वत बाईसाहेब हातात बाटली घेऊन रसिकांना आवाहन करीत होत्या, 'मार्टिनी कोण कोण पिणार?". मग बराच वेळ 'कुणी गोविंद घ्या, कुणी गोपाळ घ्या' च्या धर्तीवर 'कुणी कोनॅक घ्या, कुणी मार्टिनी घ्या' सुरू होते. मला हसताना पाहून ती माझ्याजवळ आली. काय घेणार बरे? असे विचारत होती तरी प्रत्यक्षात तिला मी हसतोय का हे जाणून घ्यायचे होते हे मला समजले होते. मग मी तिला सांगितले की  तिची लहान बाळाला घेतल्यागत बाटली धरायची लकब मला आवडली. तिही खूश झाली. तिचे नाव ऍनी. गप्पा रंगल्या. चार क्षण आनंदात गेले. उतरताना ऍनीने निरोप देताना परतीचे उड्डाण विचारून घेतले, जमले तर पुन्हा भेट! नाहीतर कोण कुणाला भेटतोय?

देशांतर्गत उड्डाणात यांच्याशी गाठ पडते ती १४ अ/फ मुळे. अरे हो! हे १४ वे प्रकरण असे की हिंदुस्थानातील सर्व विमानसेवांच्या ताफ्यातील प्रचलित विमानांपैकी ७३७/ ७४७-३००/४००/७००/८०० वा एअरबस ३२० या तमाम प्रकारात १४ व्या ओळीअखेर संकटमोचन दरवाजे असतात. साहजिकच पुढील ओळीत बरे अंतर सोडलेले असते जेणेकरून आपत्कालीन परिस्थितीत प्रवासी विनासायास दरवाजाकडॆ कुच करू शकतील. अर्थातच १४ व्या ओळीतील खिडकी म्हणजे चैनीची परमावधी. आता वाहतूक समस्या लक्षात घेता आपण वेळेआधी आलेले असतोच, मग तत्परतेने प्रथम १४ वी ओळ काबीज करायची. सकाळचे उड्डाण (मुंबईहून) दक्षिणेकडे असेल तर १४फ आणि उत्तरेकडे असेल तर १४अ! सकाळी लवकर उठून आपण पकलेले असतो. एकदा १४अ/फ पदरी पडली की उशी व पांघरूण मागवायचे व 'खानपान नको' असे आगाऊच सांगून जी ताणून द्यायची ते उतरताना बसलेल्या धक्क्याने उठायचे. आता कितीही सुखाचे व सोयीचे असले तरी हे मोक्याचे आसन. ज्या प्रमाणे मरणाच्या उकाड्यात देखिल कलाकाराला शाल घेणे अगत्याचे असते, तद्वतं प्रवासी कितीही सराईत असला तरी त्याला 'संकट्मोचन दरवाज्याची कहाणी' ऐकविणे हे सेवकवर्गाला अत्यावश्यक असते. मग आपण साम्राज्य मिळाल्याच्या थाटात पाय पसरणार तोच ठकी पुढ्यात येऊन ठाकते. 'सर, आपले आसन हे संकट्मोचन द्वारात असल्याने मी आपल्याला तद्सम्बंधी माहिती देऊ इच्छिते; आपल्याला इथे बसणे सोयीचे आहे का?' वगैरे वगैरे. सगळे काही गंभीर चेहऱ्याने ऐकून घेतल्यावर मग गंभीर चेहऱ्याने आज्ञाधारकपणे सांगायचे, 'बाई, तुम्ही काही काळजी करू नका. मी वचन देतो की तुम्ही सांगेपर्यंत मी या दाराला अजिबात हात लावणार नाही, मात्र आपला हुकूम होताच क्षणाचाही विलंब न करता झटक्यात दरवाजा उखडून काढीन" पुढच्याच क्षणी आम्ही खळाळून हसतो. काही खडूस चेहरे आपल्याला काय करायचाय असा आविर्भाव वरकरणी आणत तोंडापुढे इंग्रजी वर्तमानपत्र धरत एकदा हळूच डोळ्याच्या कोपऱ्यातून असूयेचा नजरेने बघून घेतात. एकदा किंगफिशरच्या बंगलोर उड्डाणात धमाल झाली. ती सुस्मिता बहुधा नव्यानेच रुजू झालेली असावी. नेहमीप्रमाणे 'दरवाजा आख्ख्यानं' झाले. तिला अचानक काहीतरी आठवल्यागत परत फिरली व माझ्या देहयष्टीकडे कटाक्ष टाकीत म्हणाली, 'पण तुम्हाला दरवाजा उचलायला नक्की जमेल ना? काही त्रास तर नाही होणार?. आणि नकळत मी बोलून गेलो, 'दरवाजाच काय, वेळ पडली तर..' मी पटकन जीभ चावली. ती मात्र चक्क लाजली आणि धूम पळाली.

तर अशा या 'उडत्या छबकड्या'. यांना पाहूनच तर कवीला शब्द सुचले असावेत - 'सखी शेजारिणी, तू हसत राहा'