माझी दुचाकी आणि कंसातलं विंग्रजी.

माझ्यासारखीच तुमच्या डोक्यात "खुळं" येतात का? मला तर हमखास अशी खुळं पछाडतात. आणि एकदा का मला अशा भुतांनी पछाडलं, की त्यांचा पुरेपूर वीट येईपर्यंत, त्या भुतांना माझ्या मानगुटीवर धरून ठेवतो. जातील कुठे पठ्ठी?

तर सांगायचा मुद्दा हा की सालाबादप्रमाणे यंदाही उन्हाळ्यात (ज्याला परदेशात समर म्हणतात तो) मला कचेरीला दुचाकीने (ज्याला विंग्रजीमध्ये पुश बाइक म्हणतात ती) जाण्याच्या खुळाने पछाडलं. तसं हे खूळ जुनं नाही. लहानपणापासूनचं आहे. अगदी तिचाकी चालवत होतो तेव्हापासूनचं आहे. आता फक्त त्याने उचल खाल्ली एवढंच.

आणि त्याला कारणंही तसंच मिळालं. आमच्या कचेरीमध्ये अमुक एक दिवस "कचेरीला दुचाकीने दिन" (नाही कळलं ना? ज्याला आमच्या ऑफिस मध्ये "राइड टू वर्क डे" म्हणतात तो) म्हणून घोषित झाला. पूर्वी दुसरीकडे काम करत असताना, मी कचेरीला दुचाकीने जायचो, ही गोष्ट मी उगाचच सर्वांना सांगून ठेवली होती, प्रभाव (ज्याला युवा मराठीत "इम्प" म्हणतात तो) पाडायला. त्यामुळे दुचाकीने कचेरीला जाण्याची नैतिक जबाबदारी (जिला लोकसभेत राजीनामा मागताना "मॉरल रिस्पॉन्सिबिलिटी" म्हणतात ती) सर्वाधिक माझ्यावर येऊन पडली.

जुनी सायकल फडताळातून बाहेर काढली. तिला तेल-पाणी, वेणी-फणी करून, हवा-बिवा भरून ती कचेरीपर्यंत न डगमगता, न भिरभिरता चालेल ह्याची खात्री करून घेतली. प्रातःकाळी अर्धा तास लवकरंच निघालो. सुरवातीचा प्रवासही झकास झाला. नदीकडून वार्‍याची झुळूक अंगावर घेऊन जाताना फार बरं वाटत होतं. आता नदी बाजूचा रस्ता संपून मुख्य रस्त्याला लागायचं होतं. खडा चढ होता, जोरजोरांत दुचाकीपाद (ज्याला मी सोडून बाकी अख्खं जग "पेडल" म्हणतं ते) मारायला सुरवात केली. पण हाय दैवा, निम्म्या रस्त्यावरच दुचाकी ढिम्म. अर्थातच थोडक्या विचारांती, उरलेला चढ, तिने आणि मी, आपापल्या पायांवर चढावा, असा निर्णय मी घेतला. चतुरपणे दुचाकीला काहीतरी झाल्यामुळे मी अर्ध्या अंतरातून उतरून चालतो आहे, अशा आशयाचा अभिनय मी तिथे उपस्थित लोकांना करून दाखवला. हाच प्रसंग पुढे येत असलेल्या तीनही टेकड्या चढताना आला. अभिनेता तोच होता, प्रेक्षक फक्त वेगळे होते.

"पुन्हा पुन्हा करा आणि परिपूर्ण व्हा" (मी केलेलं "प्रॅक्टिस मेक्स मॅन परफेक्ट" चे दुर्दैवी भाषांतर), त्यामुळे मी तिसर्‍या वेळी केलेला अभिनय एवढा सुंदर होता, की तिसरी टेकडी चढताना (ती तिच्या पाय़ांनी आणि मी माझ्या पायांनी) खरंच माझ्या दुचाकीला काहीतरी झालंय असं वाटून, मला एका माणसाने काय झालं असं विचारलं. दिलं काहीतरी ठोकून.

सांगायचं तात्पर्य काय? तर "कचेरीला दुचाकीने दिन" चा मला फार काही आल्हाददायक अनुभव आला नाही. मी मनाशीच ठरवलं, दुचाकी जुनी झाली, नवी घेतली पाहिजे. तत्परतेने मी के मार्ट (ह्याला काय बरं मराठी प्रतिशब्द असेल?) मध्ये जाऊन नवी दुचाकी घेऊन आलो. आता इथे तयार दुचाकी महागात पडते म्हणून "जोडणीसाठी तैय्यार" (जिला के मार्टमधील कर्मचारी "रेडी टू असेंबल" म्हणतात ती) दुचाकी घेऊन आलो. ती जोडता जोडता माझी स्वतःचीच जोडणी परत करून घ्यावी लागते की काय? अशी शंका मला चाटून गेली. कधी सुकाणू (हा कोणता जिवाणू किंवा विषाणू नव्हे. दुचाकी चालवताना, आपले हात ज्या "हँडल" वर असतात ते) बैठकीच्या (दंड बैठकातली बैठक नव्हे. जर तुम्ही बर्‍याच दिवसांनी दुचाकी चालवलीत, आणि एकच दिवस नव्हे तर पुन्हा दुसर्‍या दिवशीही चालवलीत, तर सर्वात आधी जीची जाणीव व्हायला नको, तिथे हमखास होते ती ही "सीट") जागी, तर कधी बैठक सुकाणूच्या जागी. कधी पुढच्या चाकाच्या जागी मागचं चाक, तर कधी मागच्या चाकाच्या जागी काहीच नाही. ह्यापेक्षा पळत कचेरीत जाणं परवडलं. पण नाही. एकदा मानगुटीवर भूत बसलं म्हणजे मग याचिका (ज्याला न्यायालयात "अपील" म्हणतात ते) नाही. सुकाणू बैठक करता करता एकदाची दुचाकी तयार झाली.

पुन्हा दुसर्‍या दिवशी सकाळी स्वारी निघाली. पहिला चढ पार झाला, अंगावर मूठभर मांस चढलं (हाय दैवा, ते कमी व्हावं म्हणून ना दुचाकीने जायचं?). दुसरा चढ सुरू होणार एवढ्यात सुकाणूने असहकार पुकारला. दुचाकीपाद तेवढे गोल गोल फिरणार मग आम्ही का नाही? असं म्हणून ते चक्क उलटं झालं. मनात आणलं असतं तर ते देखील मी गोल गोल फिरवू शकलो असतो इतकं ते ढिलं झालं. ह्या प्रसंगी माझी हुशारी कामी आली. मी पकड बरोबर ठेवलीच होती. जोडणी माझी होती ना? अर्थात दुरुस्तीही मीच केली असल्याने शेवटापर्यंत सुकाणू आपला हट्ट करीतच राहिलं. फिरलं सुकाणू हातात की काढ पकड, असं करत करत शेवटच्या टेकडीपर्यंत पोचलो. पण म्हणतात ना "दैव जाणिले कुणी" (मुद्दाम मराठीच म्हण घेतली, उगाच भाषांतराचा लफडा नको, काय?). टेकडी पार होता होताच, नव्या दुचाकीची नवी कोरी साखळी (दुचाकीच्या दुकानात जिला "चेन" म्हणतात ती) करकचून ताणली गेली आणि कचाकचा तुटली. झालं पुन्हा के मार्ट मध्ये जाऊन ती परत करून तिचे पैसे परत मिळवण्याची कामगिरी नशिबात आली.

दरम्यानच्या काळात माझ्या मित्रांनी मला दुचाकीचं वंगणीकरण ( वांग्याचा इथे काहीही संबंध नाही, मी "ऑइलिंग" बद्दल लिहितोय) करण्याचा सल्ला दिला. सगळे उपाय केले (उपास तापास नवस सायास सोडून) पण सापाला पाहून थबकणार्‍या घोड्यासारखी, चढ आला की माझी दुचाकी थांबलीच म्हणून समजा. मला हळूहळू पटायला लागलं की चूक सायकलची नाहीये. बहुदा माझीच शक्ती कमी पडत असावी. उगाच आपल्या नसलेल्या शक्तीचं प्रदर्शन कशाला? म्हणून दुचाकी आली तशी फडताळात परत गेली.

मध्ये एक मित्र घरी आला होता. तेव्हा त्याला ती बिचारी धूळ खात पडलेली दिसली. तो मला म्हणाल की ती जुनी असली तरी चांगल्या स्थितीत आहे, तेव्हा मी ती विकू बिकू नये. मी त्याला मागची सगळी कहाणी सांगितली. म्हटलं ती काही मला उपयोगी पडेल असं वाटत नाही. तो म्हणाल की मग खालच्या गतीअनुकूलकात (माझ्यासह सगळे लोकं ज्याला "गियर" म्हणतात तो. तो कसा गतिअनुकूलक म्हणेल, हे आपलं मी आता म्हणतोय) चालव. मी म्हटलं, खालच्या गतीअनुकूलकात पण ती वर चढत नाही. तो म्हणाला की मी कधी गतिअनुकूलअक बदलतो का दुचाकी चालवताना. मी म्हटलं की मी कष्ट नको चालवताना म्हणून आधीच सर्वाधिक खालच्या गतिअनुकूलकामधे टाकून ठेवलेय. तो म्हणाला मूर्खा हा सगळ्यात खालचा नव्हे, सगळ्यात वरचा आहे, दुचाकी चढ चढेलच कशी?

झालं. पुन्हा माझ्या मानगुटीवरचं दुचाकीचं भूत कार्यरत झालं. पुन्हा तेल-पाणी, वेणी-फणी, हवा-बिवा करून मी सकाळी निघालो. पहिला चढ आणि उरलेल्या तीनही टेकड्या आरामात गेल्या. माझा दुचाकी वरचा आणि स्वतःवरचा विश्वास द्विगुणित झाला. आता खरंतर ह्यांपुढे अँड दे लिव्ह्ड हॅपिली एव्हर आफ्टर असं मराठीत लिहून (आणि त्याचं विंग्रजी भाषांतर कंसात लिहून) हा लेख संपायला हवा होता. पण असं काही असतं का?

दोन आठवड्यापूर्वीच मी आणि ती (पण आता मी माझ्या पायावर आणि ती तिच्या पायावर नाही. आता दोघंही तिच्याच पायांवर) संध्याकाळी घरी परतत असताना ट्रॅमचा (ह्याला मराठी प्रतिशब्द माहीत असेल तर कळवा. अपनी उतनी पहुच नही) रुळावरून घसरून पडलो. पडली ती आणि लागलं मला (असं मी लग्नाआधी बायकोबद्दल म्हणायचो. काय समीकरणं बदलतात नाही काळाबरोबर). त्यामुळे ती बसलेय घरी आणि मी माझा खांदा सांभाळत फिरतोय. पण काय आहे, इतक्या जोरात पडूनसुद्धा मानेवरचं भूत आहे तिथे आहे. त्यामुळे आम्ही कधी पुन्हा एकत्र आनंदाने विहरतो ह्या प्रश्नाचं उत्तर काळंच देऊ शकेल. (मला "इट्स मॅटर ऑफ टाइम" म्हणायचं होतं. भलतंच काहीतरी वाटेल म्हणून हा खुलासा).