हवं आहे एक आभाळ!

हवं आहे एक आभाळ
  क्षेत्रफळाची अट नाही.
  अगदी वीतभर किंवा चतकोर असलं तरी चालेल!

हवं आहे एक आभाळ
  निळ्या रंगाची अट नाही.
  अगदी एकदाही इंद्रधनुष्य दिसलं नाही वीतभर तरी चालेल!

हवं आहे एक आभाळ
  अट फक्त एवढीच.
  ते बरसणाऱं असावं!
  अगदी वर्षभरातून एखादी सर पडली तरी चालेल!
  त्या पाण्याने
  कुणाच्याही शेतात
  अगदी एखादही कणीस उगवलं तरी चालेल!

कारण इतरांची विश्वव्यापक,निळीभोर,इंद्रधनुष्यी आभाळं फिरून
थकलेल्या पंखानी उतरलेल्या
भुकेल्या पाखराच्या चोचीत
त्या कणसाचा
एखादा दाणा पडावा एवढीच इच्छा!

हवं आहे असं एक आभाळ
तातडीने!
अगदी माझ्या सर्वस्वाइतकी किंमत मोजावी लागली तरी चालेल!

(जयन्ता५२)