मराठी वर्तमानपत्रातील धेडहिंग्लीश मराठी भाषा

वरील विषयावर म.टा. च्या संपादकाना लिहिलेले पत्र व त्यांनी पाठवलेले उत्तर (त्याना पूर्व सूचना देऊन) मनोगतींच्या अभिप्रायासाठी सादर करीत आहे.

स. न. वि. वि.

महाशय,

इतके दिवस महाराष्ट्र टाइम्स मधील भाषेवर इंग्रजीचे आक्रमण होत होते. पण आता हळू हळू हिंदी भाषेचेही आक्रमण होऊ लागले आहे. कालच्या महाराष्ट्र टाइम्स मधील (दिनांक २८ एप्रिल २००७) पहिल्या पानावर 'कॅरेबियन करीला फायनल तडका' असे शीर्षक आहे. त्यातील 'ला' हा प्रत्यय सोडला तर एक अक्षरही मराठी नाही. 'तडका' म्हणजे काय? 'तडाखा' का? महाराष्ट्र टाइम्स वाचण्यासाठी आम्ही हिंदी शिकायचे का? त्याच अंकातील शेवटच्या पानावर 'आ देखे जरा किसमे कितना है दम !' असे तीन स्तंभी मोठ्या ठळक अक्षरातले शीर्षक आहे. दोन दिवसांपूर्वी तुमच्या क्रीडा प्रतिनिधीने आपल्या बातमीला 'गिरे तो भी टांग उपर' असे शीर्षक दिले होते. अशा कोणत्या भव्य, दिव्य आशयाची/अनुभवाची अभिव्यक्ती त्याना करायची होती की त्यासाठी 'पडलो तरी नाक वर' ही मराठी म्हण अपुरी पडत होती? यातून व्यक्त झालाच असेल तर तो तुमच्या बातमीदाराचा स्वत:विषयीचा व मराठी भाषेविषयीचा न्यूनगंड !!

आपला

शरद रामचंद्र गोखले.

संपादकांचे उत्तर

स.न.वि.वि.

आपले पत्र मिळाले. 'म.टा.' मधील भाषेविषयीची आपली मते समजली. मराठी भाषेविषयी आपल्या इतकेच प्रेम व अभिमान आम्हालाही आहे. पण वृत्तपत्रातील भाषा प्रवाही असावी असे वाटते. भाषेचा प्रवाह मोठा करायचा, तर अन्य भाषेतील शब्द प्रयोग येणारच. त्यामुळे भाषा समृद्धच होत राहते. 'तडका' हा शब्द असाच मराठीत रूढ झाला आहे. यावर सविस्तर चर्चा करता येईल. लोभ असावा.

कळावे,

आपला,

भारतकुमार राऊत

संपादक

भाषा प्रवाही असणे आणि भाषेचा प्रवाह मोठा करणे या वेगवेगळ्या गोष्टी आहेत. एकोणिसाव्या व विसाव्या शतकातील (साधारणत: १९८५ पर्यंत) व्रती/व्यावसायिक पत्रकारानी अनेक पारिभाषिक शब्दांची निर्मिती करून मराठी भाषा समृद्ध केली. क्रिकेट या खेळातील शब्द हे त्याचे उदाहरण आहे. स्वा. सावरकरानी चित्रपट सृष्टीतील आज वापरले जाणारे अनेक शब्द घडवले. नंतरच्या पत्रकारानी किती नवीन शब्दांची भाषेत भर घातली? सरकारी परिभाषाकोशातील शब्दांची टिंगल करण्यापलीकडे त्यानी काय केले? हे शब्द जनमानसात रुजवण्याचे फार मोठे काम वर्तमान पत्रे करू शकली असती. शेवटी भाषा हा सवयीचा भाग आहे.