जरी तुला मी... (गजल)

जरी तुला मी सांभाळूही शकलो नाही
कधी तुला मी हेटाळूही शकलो नाही...

तुला न बघणे, तुला न दिसणे, तुला विसरणे
नियम तुझे हे मी पाळूही शकलो नाही...

तुझ्याचबाबत, कुणा न कळता बोलत होतो
नाव तुझे मी पण गाळूही शकलो नाही...

तुला भेटण्यासाठी आलो तुझ्या अंगणी
फार वेळ पण रेंगाळूही शकलो नाही...

दु:ख जगाचे 'माझे' म्हटले इतके की मी
दु:ख स्वतःचे कुरवाळूही शकलो नाही...

जीवन मजला जगता आले असा न दावा
मृत्यूला मी कवटाळूही शकलो नाही...

नकार होता मजकुरात त्या 'अजब' शेवटी
पत्र तुझे मी पण जाळूही शकलो नाही...