आंघोळ : एक करणे

"मनुष्य म्हणजे स्वत: आंघोळ करणारा व इतरांना सक्तीने आंघोळ करायला लावणारा प्राणी" अशी व्याख्या माझ्या बालमनात अंगावर गरम पाण्याचा पहिला तांब्या पडला तेव्हाच तयार झाली. लोकं रोज आंघोळ का करतात हा प्रश्न, ते चार-चौघात दात का कोरतात, या प्रश्नाइतकाच ठाण मांडून बसला आहे.

आंघोळ करण्याबद्दल आक्षेप नाही तर ती रोज एक कर्तव्य म्हणून करण्याबद्दल आहे. भर ऊन्हात चार तास क्रिकेट खेळून घरी आल्यावर शॉवर खाली उभं राहिल्यावर जी घडते ती खरी आंघोळ!

आंघोळीबद्दल तिटकारा निर्माण होण्यामागे आमच्या मासाहेबांचा फ़ार हात आहे. बाकी मुलांच्या आया कशा आम्ही काही मित्र गप्पा मारत बसलेलो असलो की छान छान खायला वगैरे आणून द्यायच्या. आमच्या घरी... मस्त रविवार असावा, मी माझ्या मित्रांसोबत गप्पा मारत बसलेलो असावा, आणि आईची हाक: "अरे गौतम, पाणी काढलंय. जा आता."

अर्ध्या तासानंतरही माझ्याकडून काही हालचाल झाली नाही की, ती यायची आणि म्हणायची, " चार दिवस झाले तू आंघोळ केल्याला... आज तरी कर की रे बाबा.."

आता मला सांगा, झाले असतील खरोखर चार दिवस... पण हे गुपीत असं चार चौघात सांगायची काय गरज? माझे मित्र मग माझ्याकडे आपण  चिखलात लोळणाऱ्या एखाद्या वराहाकडे पहातो तस्सं पहायला लागायचे, आणि मला मग चरफडत उठून जाण्याशिवाय गत्यंतरच नसायचं.

इतरांच्या "वाईट" संगतीपासून माझा बचाव व्हावा म्हणून ती हे करायची की माझ्या वाईट गुणांपासून इतर निरागस पोरं वाचावीत यासाठी, हे मला माहीत नाही.

मध्यंतरी नॉर्वेला जाण्याचा योग आला. तिथे जाऊन आठ दिवस झाले असतील... घरी फोन केला; तर मी काय खातोय, काय जेवतोय, ( आणि काय "पितोय" ) याआधी मातोश्रींचा सवाल: "तिथे खूप थंडी असेल.. आंघोळ वगैरे करतोस की नाही?"

आंघोळ करण्याबद्दल वस्तुत: कंटाळा नाही, पण त्याआधी जी तयारी करावी लागते त्याबद्दल आहे. कुणी जर मला गरम पाणी काढून देत असेल, टॉवेल-कपडे आणून ठेवत असेल, आणि मग आपल्या (कोमल वगैरे) हातांनी साबण लावून पाणी घालणार असेल तर मी दिवसातून दहा वेळा आंघोळ करायला तयार आहे...

देवा सिद्धिविनायका...तो योग कधी येईल?