चित्रपट 'पाहावा' तर असा!

आज काही खरे नव्हते. मित्रमंडळींनी आज पुरता घेऱ्यात घ्यायचे ठरवलेले असावे. मी दुचाकी वरून पाय उतार होऊन दुचाकीला कुलूप लावताच झाडाखाली बसलेल्या कंपूने एका सुरात जोरदार आवाजात त्यांच्या पुढ्यात हजर होण्याचा हुकूम सोडला. ’हे बघ, चिकार टेपा लावून झाल्या. एकतर तारीख सांग नाहीतर खुल्ला सांगून टाक की भापवायला फेकली होती म्हणून." जितूचा निर्वाणीचा सवाल. " म्हणे याचा काका यंव आहे नी हा म्हणे चित्रपट याने म्हणे हेमामालिनी बरोबर पाहिला आणि तमका तो चित्रपट धर्मेंद्र बरोबर कोक पीत पाहिला!कधी काय तर म्हणे राजेश-शर्मिला शेजारी बसून ’आराधना’ बघितला. थापा तरी किती माराव्यात? हे फार झालं हां, एकतर घेऊन चल नाहीतर सरळ कान पकड आणि कबूल कर मी सगळ्यांना मूर्ख बनवलं. आता त्याची सजा आम्ही ठरवू." हा कण्याचा थेट प्रश्न. तिकडे पांड्याचे स्वगत सुरू ’ काय पण हकिकती, काय ती वर्णनं, अरे आतापर्यंत लय जळवलाय आपल्याला बेट्यानं. ह्याचा नाद सोडा, येत्या शनिवारचा दुपारचा खेळ टाकू आपले आपण. याच्या भरवशावर राहाल तर आपण खुळे ठरू". "अरे हो हो, बिचारा उन्हातून पायटी हाणत आलाय, जरा दम घेऊ द्या त्याला, का उगाच पंचायत भरवता?" एकदम माझा कैवारी होत बदकाचा सामंजस्याचा सूर. आता उपद्व्याप केला होता, निस्तरणे भाग होते. वाटले, झक मारली आणि काकाचा रुबाब सांगायला गेलो.

माझे थोरले काका एका प्रख्यात चित्र-रसायन शाळेत वरिष्ठ प्रक्रिया सल्लागार होते. चित्रपट पुरा झाला की सगळ्यात प्रथम रिळे प्रक्रियेसाठी येणार. धुऊन, प्रक्रिया करून, दुरुस्त्या वगैरे झाल्या की मग त्या निर्जीव गुंडाळ्यांमधुन गुलाबी सृष्टी साकार व्हायची. अर्थातच प्रक्रिया संपून चित्रपट प्रदर्शनास योग्य झाला रे झाला की एक खेळ पाहणी साठी, मग लगोलग निर्माते, दिग्दर्शक, छायालेखक, कथा-पटकथाकार, नायक-नायिका, समस्त कलाकार यांचा राबता सुरू व्हायचा. काय कापायचे, कुठे जोडायचे, कोण कडक कोण फर्मास हे सगळे सुरू व्हायचे. वितरक मंडळी येणार आणि चित्रपट घ्यायचा की नाही आणि घ्यायचा तर किती पर्यंत ही सगळी गणिते सुरू व्हायची. आपल्या सोयीने हवा तसा, हवा तेव्हा चित्रपट बघता यावा यासाठी दोन मजल्यांवर दोन वेगवेगळी सुसज्ज पण छोटीशी प्रेक्षागृहे होती, एक असेल २५-३० आसनी तर दुसरे अगदीच १२-१५ आसनी. हे प्रकरण होते वरळीला, मी ठाण्याला त्यामुळे कधी दादरला आजीकडे राहायला गेलो की एखददा काका घेऊन जायचा. चित्रपट कुठला हे महत्त्वाचे नाही, तसा मला चित्रपटाचा फारसा शौकही नव्हता; पण प्रदर्शित न झालेला चित्रपट पाहिला की वर्गातल्या मुलांना सांगायला मजा यायची आणि मग भाव खाता यायचा. पुढे मोठे होऊन महाविद्यालयात गेल्यावर मला साक्षात्कार झाला की काका ही अनन्यसाधारण महत्त्वाची चीज आहे. मी चित्रपट प्रदर्शित होण्या आधी कसे पाहायचो, कधी कधी चित्रपट तारे-तारकांच्या बरोबर कसा पाहायला मिळायचा ह्याची रसभरित वर्णने ऐकून मुले भलतीच प्रभावित झाली होती. शिवाय चित्रणानंतर फिती थेट रसायनशाळेत येणार मग तिथे प्रक्रियेने त्याचे रुपांतर चलचित्रात होणार व मगच चित्रपट निर्बंध मंडळाला दाखवला जाणार याचा अर्थ तिथे तो चित्रपट ’अनिर्बंध’ पाहता येणार हे आमच्यातल्या एका चाणाक्ष मित्राने ओळखले आणि त्याने त्याला लागलेला शोध सगळ्यांना सांगताच मंडळींचे डोळे विस्फारले; सीताफळ आणि टकल्याच्या डोळ्याची बुबुळे खाचांबाहेर यायची बाकी होती - मॅकवुल्फ सारखी. अरे आपला दोस्त ना तू, मग काहीही करून जमव असा लकडा अधून मधून सगळे लावत असत.

त्या दिवशी बोलता बोलता पटकन घाण्याला बोलून गेलो "काका सध्या ’क्रांती’मध्ये व्यस्त आहे.  " झालं! घाण्याच्या तोंडात तीळ भिजेल तर शपथ. दुपारपर्यंत सगळ्या कंपूत बातमी पसरली - बळ्या आपल्याला क्रांती दाखवणार, फुकट आणि तोही वट्मध्ये, अगदी कुणीही पाहायच्या आधी! इकडे काका तर दाद लागू देत नव्हता. त्याचेही बरोबर होते, चित्रपटाच्या चोरून प्रती निघतात, धडाधड चित्रपट गावांगावांतून व्हिडिओ तंबूत दाखवले जातात आणि मग चित्रपट निर्माता बुडतो. तिच गत परदेशची. जर का एक प्रत दुबईला पोचली तर रातोरात आखातात प्रती पोचतात, युरोपातही जातात मग निर्माता साफ बुडतो. म्हणून मनोज कुमारने स्वतः: गळ घातली होती की चित्रपट वितरीत होईपर्यंत अगदी कर्मचाऱ्यांना सुद्धा दाखवायचा नाही. काका रोजचे काम झाले की रिळे तिजोरीत टाकून चाव्या घेऊन घरी जायचा. मला हे समजत होते, पण मुलांना काय समजावणार?  मुलांना धीर धरवत नव्हता. सगळे वैतागले होते. त्या दिवशी घेरावात आब्या बोलला, " अरे गणेश झाला आता क्रांती. गणेश दाखवला यानी, आता क्रांती दाखवतोय. तो सांगतो, आपण ऐकतो".

 गणेश हा एक काकाकुवा. आमच्या तळमजल्यावरच्या गृहस्थांच्या भावाकडे गणेश नामक काकाकुवा होता, त्यांना सगळ्या कुटुंबाला बाहेर गावी जायचे असले तर गणेश भावाकडे म्हणजे आमच्या इमारतीत राहायला यायचा. बेटा ’आई’, ’अच्छा’, वगैरे शब्द बोलायचा. एकदा तर त्याने त्याचा मालक दुचाकीला लाथ मारत असताना ’कर्र्र्र्र’ असा हुबेहूब कर्ण्यासारखा आवाज काढून आमची दांडी उडवली होती. तर गणेशच्या गप्पा ऐकून मुलांनी आग्रह धरला होता की जर या थापा नसतील तर एक तर आम्हाला गणेश असेल तेव्हा तुझ्या घरी घेऊन चल नाहीतर त्याला इकडे आण. आम्हाला त्याला पाहायचाय, बघू कसा बोलतो ते. आता हे कर्म कठिण! त्या मुलांना घरी नेणे कठीण नव्हते, त्याला खरेच बोलता येत होते, काही प्रश्न नव्हता; पण माझी अडचण वेगळी होती. तो बोलका पक्षी जर आमच्या प्रतिभासंपन्न शब्दप्रभू मित्रांच्या सहवासात काही काळ राहिला असता तर तो पुन्हा मालकाकडे परत जायच्या लायकीचा राहिला नसता. त्याचा मालक बिचारा सज्जन आणि धार्मिक वृत्तीचा, त्यांच्या घरात कुणाला वावगा शब्द माहीत नव्हता. सबब या निमित्ताने मी फेकतो असे जाहीर केले गेले होते.

अखेर माझ्या सततच्या विनंतीला फळ आले. मी कधी नव्हे तो मागे लागलो आहे म्हणताना काकाने सांगितले की ९ मार्चला परदेशच्या प्रती रवाना होतील, तुम्ही १० ला या. मी महाविद्यालयात घोषणा करताच एकदम जल्लोष उडाला! कुणी तोंडाने धत्तड्तत्तड असा ताशाचा आवाज काढत नाचायला सुरुवात केली तर दोघा तिघांनी मला उचलून घेतला व गोल फिरवायला लागले. हा काय प्रकार असावा याचा अंदाज आजूबाजुची इतर मुले घेऊ लागली. जरा चौकसपणे विचारायला आलेल्या घासू शेखरला ’ए ढापण्या फूट, तुझ्या काही कामाचे नाही’ अशा वाटण्याच्या अक्षता लावण्यात आल्या. सगळी मिरवणूक वर्गाबाहेरच्या सूचनाफलका पर्यंत आली आणि सगळेच चित्र पालटले. विद्यापीठाचा परीक्षा अर्ज भरायला १० मार्चला सर्वांनी सकाळी वर्गात हजर राहायची सूचना फलकावर लागली होती. आता? कधी अर्ज भरणार, कधी ते कचेरीत जमा करणार मग कधी गाडी पकडणार आणि कधी सिनेमाला पोचणार? उत्साहाच्या भरात आमल्या उपप्राचार्यांना भेटायलाही गेला की आमच्या अर्जाची तारीख बदलून देता का? त्याला अर्थातच हाकलून दिला गेला. आता माघार नाही. जायचं म्हणजे जायचं. सगळ्यांच्या अंगात चित्रपट संचारला होता. कुणाला न्यायच, कुणाला कटवायचा याच्या याद्या होत होत्या.

१० मार्च उजाडला. नाईलाजाने सगळे वर्गात बसले. अर्ज आले. प्राध्यापक महाशयांनी क्रमवार वाटप केले, सूचना दिल्या, मुलांच्या वेंधळेपणाचा उद्धार केला. एकदाचे अर्ज भरून झाले. मग पुन्हा ते गोळा करणे, क्रमवार लावणे, मग त्याची रांगेत उभे राहून पोचपावती घेणे करता करता साडे अकरा वाजले. कुणाचे लक्ष लागत नव्हते. एकदाचे ते सोपस्कार संपले आणि आमचा कंपू ठाणे स्थानकाकडे धावत सुटला. सुदैवाने तिकिटाला रांगा नव्हत्या. त्या दिवशी कुणीही चालूगिरी न करता स्वयंस्फूर्तीने आपापले पैसे काढून दिले व बांबूने मोजून सर्वांची तिकिटे ताब्यात घेतली. तो पर्यंत पप्याने गाडी कुठल्या फलाटावर येते ते विचारून घेतले होते. सगळे भरधाव सुटले ते थेट दोन क्रमांकावरून सुटू पाहणाऱ्या गाडीत घुसले. गाडीच्या पुढे उत्सुकता धावत होती. कुर्ला येताच गाडीने अचानक वाट वाकडी केली आणि भलत्याच फलाटाकडे कुच केले. तिथे घोषणा झाली ’गाडीचा प्रवास संपला, गाडी कारखान्यात जाईल, कृपया कुणी गाडीत बसू नये. झाला लोचा! ती  कुर्ला गाडी हे समजले. मग पप्याला शिव्यांची लाखोली. शाहीर रामजोशी लाजेल असे सवाल-जवाब झडले. अखेर शहाणपणा सुचला - आधीच उशीर झालाय, काका १२ ला खेळ सुरू करणार असे म्हणाला होता, इथेच सव्वाबारा झाले होते. अखेर गाडी बदलून माटुंगं, तिथे बाहेर पडून राणी लक्ष्मीबाई चौकात ८५ मर्यादित वर स्वारी असे मजल दरमजल करत अखेर आम्ही आठजण वरळी नाक्यावर उतरलो. गावाकडून प्रथमच मुंबईत आल्यागत सगळे सुसाट रस्त्यापार धावत सुटले आणि पलीकडे पोचता पोचता एका टॅक्सीने करकचत आमचा उद्धार केला पण आमची भांडायची मनस्थिती नव्हती. त्याला उदार अंत:करणाने माफ करत आम्ही थेट काकाचे कार्यस्थळ गाठले.

काका एका महत्त्वाच्या कामासाठी बाहेर गेला असल्याचे शुभवर्तमान एका शिपायाकडून समजले आणि कपाळावर हात मारून घेतला, "हेची फळ काय मम तपाला?". पण तितक्यात एका भस्मवाल्या मद्राशाने शुक शुक केले. ’तुम साबका थाना वाल रिलेटीव क्या?’ या वाक्याला उत्तर म्हणून मी पुढे सरसावलो. "हो, मी त्यांचा पुतण्या, आणि हे माझे.." वोक्के, पर तुम बहोत देर किया, साब बोला करके आम साडेबारा तक रुका पर क्या करेगा सेठ लोगोंका दो-तीन मेमान आया तो साडेबारा के बाद चालू किया, बट नो प्राब्लेम, आव आव, फालो मी". असे म्हणत आम्हाला दुसऱ्या मजल्यावर घेऊन गेला. दार उघडून त्याने आम्हाला आसनस्थ केले, ३० आसनी प्रक्षेपणगृहात अवघे दहा-बारा जण त्यामुळे जागा मुबलक, सगळे सरसावून बसलो. कुठेही गेले तरी सवय सोबत करतेच! सीताफळाने पुढच्या रांगेतल्या अमल्याला मागून पाय लावत इशारा दिला, ’आमल्या हे थेटर नाहीये, खुर्चीला चिंगम लावू नकोस’ सर्वत्र खसखस पिकली. आमल्याने उलट वार केला " *** आधी ते तू लक्षात ठेव नाहीतर पीटातल्या शेलक्या सुरू करशील" पुन्हा सगळे फिदी फिदी हसले. आत इतर दोन तीन माणसे असल्याने मी जरा संकोचून दबक्या आवाजात त्यांना हटकायचा प्रयत्न केला. पण इतक्या प्रतीक्षेनंतर चित्रपट पाहायला मिळाला, तोही बाहेर प्रदर्शित होण्या आधी आणि तोही विनाकाटछाट म्हणताना सगळे असे काही रंगात आले होते त्यात पुन्हा सगळे प्रक्षेपणगृह ऐसपैस मोकळे; मग काय विचारता. राहता राहिली ती दोन-तीन जण, पण एकूण त्यांनाही मस्ती आवडली असावी. चित्रपट पाहायचा तो गुपचुप खुर्चीला खिळून नाही, तर जीवंतपणे दंगामस्ती करत. शेरेबाजी, टाळ्या, शिट्ट्या कुठे नायिकेला हाक मार कुठे खलनायकाच्या सात पिढ्यांचा उद्धार कुठे नायकाच्या कुळाचा शोध.. याला म्हणतात चित्रपट पाहणे. असे कंपूने चित्रपट पाहण्यात जी मजा आहे ती कुठल्याही आलिशान बहुपटलगृहात देखिल नाही. सगळे भयंकर समरसून तो चित्रपट पाहत होते आणि क्षणाक्षणाला उत्स्फूर्त दाद देत होते. असे काही संवाद झडत होते की व्यावसायिक पटकथाकार/ संवाद लेखकही मान खाली घालेल.

ज्याचा सगळ्यांनी धोषा लावला होता तो चित्रपट पाहून झाला एकदाचा, थोडा गेला सुरुवातीचा अर्धा पाऊण तास, पण सगळे खूश होते. चित्रपट संपला, दिवे लागले. एव्हाना तीन वाजून गेले होते. आम्ही बाहेर आलो. मघाचा तो मद्राशी, मग कळले त्याचे नांव रामन होते; तो स्वागताला आला. ’इथे जेवण तर मिळत नाही पण समोसे, सॅंडविच, काही शीतपेय/ कॉफी काहीतरी घ्या’ असा आग्रह त्याने केला. खरेतर भूक सगळ्यांनाच जाणवत होती पण उगाच कुणाच्या तरी ओळखीने सिनेमा एक हौस म्हणून पाहिला, वर आता जेवायला म्हणजे जरा संकोच वाटत होता. इतक्यात काका आला. मग सगळी विचारपूस, आग्रह, नाही म्हणताना सगळे खाण्यापिण्यावर तुटून पडलो. सगळ्या मित्रांनी आभार मानले, काही शौकिन गाणे गुणगुणत होते.  काकाने ’चित्रपट कसा वाटला’ असे हसतच विचारले. आता मनोजकुमारचा तो नावाशी काही देणे घेणे नसलेला सुमार चित्रपट त्याला पुरता माहीत होता पण मुले मुद्दाम लांबून आली तर जरा चौकशी. मग त्याला बोलता बोलता म्हणालो की नेमका अर्ज भरायचा दिवस, त्यात गाडीचा घोळ झालेला, असे करता करता उशीर झाला व सुरुवात गेली, लगेच गेली तर गेली असा सूर सगळ्यांनी लावला. काका आश्चर्याने म्हणाला, "म्हणजे? अरे इतके मागे लागलागून चित्रपट पाहायला आलात आणि पुरता पाहिलाच नाहीत? हरकत नाही. तुम्ही आलात तेव्हा काय चालले होते चित्रपटात?" लग्गेच घाण्या साभिनय गाता झाला ’मारा ठुमका..." आणि आपण महाविद्यालयाच्या अंगणात नाही हे समजताच खजील होत गप्प झाला. सगळे दणदणून हसले. "अच्छा! म्हणजे तुम्ही त्या गाण्याला आलात तर. म्हणजे सहावे रीळ. काका त्यांच्या भाषेत बोलला. आता आधीचा पाहा" आम्ही फक्त वेडे व्हायचे बाकी होतो. काकांनी एका सहाय्यकाला बोलावून त्याला आम्हाला खालच्या मजल्यावर नेऊन चित्रपटाचा हुकलेला भाग दाखवायला सांगितले. मग काय. त्या छोटेखानी प्रक्षेपणगृहात फक्त आम्ही आणि आम्हीच होतो. दारे बंद होऊन चित्रपट सुरू होताच जो काही जल्लोष झाला......, की पुढचा एक परिच्छेद फक्त फुल्याच फुल्या.

हा एक वेगळाच अनुभव होता, आधी कळस मग पाया म्हणतात ना, तसा प्रकार. आधी सगळे कथानक, उत्तरार्ध आणि अखेरीस चित्रपटाचा आरंभ. चित्रपट भले रद्दड असेल, पण तो त्या क्षणी फक्त आम्हीच पाहिलेला होता, बाहेर प्रदर्शित व्हायला तब्बल एक आठवडा असताना. कधी एकदा महाविद्यालयात दाखल होतो असे झाले होते. दुसऱ्या दिवशी मी बघतो तो काय? टकल्या नारळाच्या झाडाखाली उभा होता आणि आजूबाजूला मुला-मुलींचा घोळका. "अरे हेमा मालिनी काय दिसल्ये सांगू? अहाहा! टकल्या रसभरित वर्णन पदरचे तिखट मीठ लावून करत होता आणि मुले त्याच्या कडे एखाद्या अवतारी पुरुषाकडे पाहावे तशी अविश्वासाच्या नजरेने बघत होती. मला पाहताच टकल्याला आणखी जोर आला. ये, या लोकांना सांग काल आपण कुठचा चित्रपट पाहिला ते, लेकाच्यांना खरं वाटत नाहीये. आता सांग जरा यांना ’ठुमका’ काय जबरदस्त होता. मग मी ताबा घेतला आणि टेचात सांगितले, बाळांनो, कथा नीट ऐका हं, आणि पुढच्या आठवड्यात तिकिट काढून बघा म्हणजे समजेल थापा की काय ते. मग अनेक दिवस आम्हाला तो चित्रपट पुरला.

मध्यंतरी आम्ही मित्रमंडळी जेवायला जमलो होतो. खाता खाता महाविद्यालयाच्या आठवणी निघाल्या. घाण्याला एकदम आठवण झाली, "अरे तुझे काका आत निवृत्त झाले असतील, पण त्यांची तिथे अजूनही चालत असेल ना? बघ एखाददा त्यांना विचारून, जाऊ सगळे जण पुन्हा एकदा" हास्याचा फवारा उडाला. मग बघता बघता काळाचे काटे उलट फिरले आणि सगळे जण त्या आठवणींमध्ये हरवून गेलो. सगळ्यांचे एकमत झाले. इतके चित्रपट पाहिले, पण असा चित्रपट कधी पाहिला नाही आणि कुणी पाहणारही नाही.