निवद-एक ग्रामीण कथा

    रंगानं बोंब मारली तसा गाव जागा झाला. हा हा म्हणता बातमी गावभर पसरली. श्यामा म्हातारा गेला. सोना म्हातारी म्हणाली,
    "चांगला होता बिचारा, काल माझ्यासंगं घटकाभर बोलला अन् असं अचानक काय झालं गा?"
    "झोपेतच कवा मरुन पडलाय म्हणत्यात."
    "पोराचं कसं व्हायचं गं तारा?"
    "त्यास्नी काय हुतया? चांगली दोन हजार पेन्शन मिळलं म्हातारीला."
    "व्हय बाई, पैसा काय थोडा साठविलाय तेनं. बिचार्‍यानं चैन कवा केलीया? धडूतं सुद्धा कवा चांगलं घातलं नाही."
    पारी म्हातारी म्हणाली, "एकादशीचं मराण आलं, स्वर्गाची दारं उघडी असत्यात, नशीबवान हाय."
    मनात मी म्हटलं,
    "दार उघड असत्यात ते बघाय गेलतीस की काय? काय देवानं तुलाच नेमलीया ह्यो स्वर्गात ह्यो नरकात हे बघायला?"
    तुळसा आपल्या धन्याजवळ गेली. "अवं ऊठा की. श्यामू मामा गेलंत."
    तसा शिरपानाना म्हणाला,
    "थंडी मरणाची पडलीया, त्यातच हे सकाळी सकाळी मेलं." अंगावरचं कांबरुन त्यानं बाजूला केलं. तसं त्याला जास्तच थंड वाजाय लागली. मनातल्या मनात शाम्या म्हातार्‍याला शिव्या देतच तो बाहेर पडला.
    एवढ्यात श्यामाची पोरगी तिकडून बाबा गाss ये माझ्या बाबा, येsयेss रडत आली. मी मनात म्हटलं,
    'तो खरचं आला  तर ठो ठो बोंबलत पळशील गप रड.' रडारड जोरात वाढली होती.
    शिरपानाना म्हणाला, "भावकी कुठं गेली, शेणकुटं, लाकडं, टायरं आणा जावा की. काय मढं इथंच ठेवता?"
    एवढ्यात हिंदूराव म्हणाला,
    "जन्मात कधी चांगलं धडूतं घातलं नाही, सदान् कदा फाटलेलं आन् मळकटलेलं. आज मेल्यावरच त्याला नवं कापड मिळालं."
    सगळी तयारी झाली पण अजून एका पाव्हणीची लोक वाट पाहत होती, पण तिचा पत्ता नव्हता.
    श्यामाच्या भावकीत परवा दिवशी एक लग्न होतं. ज्या पठ्ठ्याचं लग्न होतं त्याचं वय चाळीस झालतं. अनेक कारणांनी त्याचं लग्न मोडलंतं. त्याचं लग्न ठरल्यानं ते हारकलतं. ते सद्याला म्हणालं, "शामू तात्यानं चार दिस कड काढायचा नाही, आता लगीन पुढं ढकलाय पाहिजे, काय तरी विघ्न आलं तर?"
    पाव्हणी आली. प्रेत स्मशानात आणलं. पोरग्यानं प्रेताला अग्नी दिला. शिरपानाना म्हटला,
    "मार बोंब."
    तशी त्यानं शेवटची बोंब मारली. लोकांनी हाराटीची पात गोळा केली. शिरपानाना म्हटला,
    "झाडा झाडा संसार सोडा, पाप पुन्याचा केला निवाडा. शामराव कडवे बसव्याची शेपूट धरून कैलासाला गेला." मघाशी स्वर्गात गेला, आता कैलासात गेला. आता श्याम्यालाच माहीत तो नेमका कुठ गेला? लोकांनी हाराळीची पाती अग्नीत टाकून परतीचा मार्ग धरला.
    तिसर्‍या दिवशी रक्षा विसर्जनाचा कार्यक्रम. हळूहळू गाव जमलं पै-पाव्हणं जमलं. प्रत्येक पाव्हण्याच्या हातात निवदाच्या पिशव्या होत्याच. सकाळी दहा वाजता लो़क राखंच्या ठिकाणी आली. राख एकत्र केली. पिंड केला. त्याला पाणी पाजलं. पाणी पाजून झाल्यावर शिरपानाना म्हंटलाच,
    "ज्यानं ज्यानं निवद आणल्यात त्यांनी ठेवावं." तसं पै-पाव्हणं पुढं सरकलं. एका परीस एक पदार्थ निवदावर होतं. शामरावाच्या बापजाद्यांनी सुद्धा असलं पदार्थ खाल्लं नसतील. एका पाव्हण्यानं तर कमालच केलती. त्यानं बाटलीतून दारू ठेवलीती. हे बघून एक म्हातारा पाव्हणा म्हणाला, "पिता व्हय गा ह्यो, आम्हाला कधी कळलंच नाही, नाहीतर..."
    "ते कुठलं प्यालं असंल चाऊन चिकाट होतंनी. चोरुन पितं काय कुणास ठाऊक." अशा गप्पा चालल्या होत्या. उन्हामूळं लोकांची थंड जरा कमी व्हाय लागलीती पण कार्यक्रमाचा मुख्य पाव्हणा एक बी हजर नव्हता. प्रत्येकाच्या नजरा त्याला आंब्याच्या झाडावर शोधत होत्या. त्याचा काय बी पत्ता नव्हता. घटकाभर असाच गेला. ऊन लोकांना आता सोसवंना. ती सावली शोधाय निघाली. एवढ्यात गावचं पाटील म्हणाले,
    "शामूदानं कुणाला हाक मारली तर लोक थांबत नव्हती, त्याचं काय मत हाय जाणून घेत नव्हती. म्हणूनच डाव काढलाय त्येनं." असा नवा शोध त्यांनी लावला. ताटकाळलेली माणसं खाली बसली. तानबा हळूच आपल्या दोस्ताला म्हणाला, "माझी आज शेताला पाणी पाजायची पाळी होती, आज जर पाणी नाही घेतलं तर पुढल्या आठवड्यातच मिळणार, मी काय गा म्हणून इकडं आलो अन् अडकून बसलो?" तशीच गत नोकर वर्गाची झालती. लोकांची चुळबूळ सुरु झाली. अचानक एक कावळा आंब्याच्या झाडावर आला. एखादा कार्यक्रमाचा मंत्री आल्यावर जेवढा आनंद होतो त्याच्याही पेक्षा जास्त आनंद लोकांना झाला. शिरपानाना म्हणाला,
    "मागं व्हा, कावळा बुझंल."
    लोक सारसार मागं सरकली. पण कावळा काय हालंना. घटकाभर असाच गेला. कोणीतरी म्हणालं,
    "पोराला पाया पड म्हणावं."
    पोरगा पाया पडला. जावई पाया पडला. कदाचित जावाई असं म्हणाला असंल,
    "मामा, पोरगीला अजिबात त्रास देत नाही. निवद तेवढा शिवा. शिवला नाहीसा तर मात्र....."
    भाऊ, भाचा, पुतणे पाया पडले. पण काही उपयोग होईना. शिरपानाना म्हणाला,
    "मोटरपंप चालविता. त्येचा जीव त्यात अडकला असंल. तवा व्यवस्थित चालवताव म्हणारं पोरांनो."
    पण काही उपयोग झाला नाही. गणा म्हणाला, "त्याचा नातवावर लई जीव हुता. त्येला आणा जावा."
    तसं एक कॉलेज कुमार गाडीवरनं त्याला आणाय गेलं. ते पोरांच्या बरोबर गोट्यानं खेळंतं. त्याला गाडीवर घेतलं नि घेऊन आलं. ते त्याला असं घेऊन येत होतं की जणू हिमालयाचं शिखरच त्यानं पार केलंय. पण त्याचा बी काय उपयोग झाला नाही. गाईला आणाय पोरं निघाली, तवर दुसरा कावळा आला. सिनेमातली नटी आल्यावर जेवढा आनंद लोकांना झाला असता तितका आनंद लोकांना त्या कावळ्याला पाहून झाला. तो आला. त्यानं इकडं तिकडं मान फिरवली अन् बाटली असल्याला निवदावर चोच मारली. त्या पाव्हण्याला आनंद झाला. छाती पुढं काढून ते म्हणालं,
    "मामानं माझा निवद शिवला."
    'ह्यो अन् कुठला भाचा?' विचार कराय लोकांना वेळ नव्हता. त्यातनंबी पोलीस पाटील म्हणाले,
    "त्याची प्यायची इच्छा मागं राहिली असलं, म्हणूनच त्यानं लांबच्या भाच्याचा निवद शिवला." लोक लगबगीनं घराच्या वाटंला लागली.
    या रक्षाविसर्जनासाठी आलेला दिलीप घरात पोहोचला. आईनं विचारलं,
    "एवढा वकूत का रं?"
    "काय सांगतीस निवद शिवला नाही तात्यानं लवकर."
    "लोक अशी वैतागलीती म्हणतीस काय सांगू."
    "आंघोळीला पाणी काढलंय. आंघोळ करुन घे आगोदर."
    "आंघोळ नगं, जेवाय वाढ आगोदर. भूक लागलीया."
    "आंघोळ केल्या बिगार काय खायचं नसतंया."
    "आगोदर आंघोळ कर मग वाढतो."
    "आय, मी खाल्ली बर्फी. खिशात हुती, सकाळी घेतल्याली."
    "कुठं खाल्लीस रं?"
    "तिथच की राखं जवळ चोरुन."
    "काय तुझ्या मानंवर भूत बसलतं, काय आग पडलीती. थोडावेळ कड काढता आली नाही व्हय?"
    "काय होईल गं आय?"
    "काय हुईल तुझा मेंदूच तपासून आणाय पाहिजे. असं राखंला गेल्यावर खात्यात व्हय? परमेसरा, आमच्या मागं काय इगनं लावतुयास?"
    त्याच्या मनाला लागलं. कशीतरी आंघोळ करुन चार घास खाल्लं. शेजारच्या गणपानानाकडं गेलं. त्याला सगळा वॄत्तांत त्यानं सांगितला. ते बी हुत बेंडल. ते म्हणालं,
    "दिल्या आता बस लेका, तुझ्या अंगावर श्याम्या बसणार!"
    तसं तेचं काळीज धडकाय लागलं. काय करावं त्येला कळंना. 'आता माझं काय हुणार? त्यो माझ्या पाठी लागला तर?' करतच ते घरात गेलं. चिन-बिन कराय लागलं. श्याम्या, श्याम्या आला म्हणत वरडाय लागलं. दिलप्याला श्याम्यानं धरलं ही बातमी गावभर झाली. लो़क दिल्या कसा करतोय ते बघाय यायला लागली. देवाच्या बायकांची पर्वणीच. त्या अशावेळी न चुकता आल्या. त्यातल्या एकीनं चुलीतला अंगारा लावला नि म्हणाली, "तुझा काय असंल त्यो दानापानी टाकताव, खरं झाडाला सोड, त्याचं हाल करू नगंस."
    जटवाली बाईनं सांगितलं,
    "तीन शिरंचा लिंबू घे, उभा कापून त्याच्यावरनं उतरुन उगवत्या बाजूला टाक, तसंच दोन वाटी भात, रस्सा, मटण ते बी त्येच्यावरनं उतरून उगवत्या दिशेला वताडात ठेव. ठेवल्यावर मागं बघू नगसं." मी मनात म्हणालो, "मागं वळून कसं बघून चालंल? तू दिसणार ना खात्याली." उतारा उतरला पण दिल्याच्यात काही फरक पडला नाही, दुसर्‍या दिवशी सकाळी उठलं ते नदीकडच पळालं. नदीत उडीच मारली. पोरांनी बाहेर काढलं.
    कॉलेजची पोरं जमा झाली. एका पोरानं उसाचा बुडका हातात घेऊन त्याला माईक केला नी सुरवात केली,
    "आपण कब-तक या वाहिनीवरून सिधे प्रसारण पाहत आहात. सर्व प्रथम आम्हीच इथे पोहोचलो. हा जो समोर मनुष्य दिसतो आहे तो दिलीप आहे. त्याला म्हणे भूतानं झपाटलं आहे. अशी इथल्या भोळ्या भाबड्या ग्रामस्थांची समजूत आहे, जर तुम्हाला वाटत असेल दिलीपला खरच भूतानं झपाटलंय तर १२००५६७८०१ या क्रमांकावर डायल करा. तुम्ही एसएमएस सुद्धा करू शकता, ६६६६ होय साठी, नाही साठी ५५५५. पुन्हा आपण भेटणार आहोत थोड्याश्या विश्रांतीनंतर. दिलीप काय खातो, कसा राहतो, त्याच्या आवडी निवडी, त्याच्या आईला विचारणार आहोत तेव्हा कुठेही जाऊ नका. सनसनी बातम्यासाठी पहात रहा कबतक.."
    पोरं गंमत करत होती. इतक्यात तिथं राजू पोहचला. हा राजू अंधश्रद्धा निर्मूलन समितीत काम करत होता. या राजूनं देवांच्या बायकांची अनेक प्रकरणं उपटून काढली होती. त्या बायांनी याला हैराण केलं होतं. घरात लिंबू कापून टाक, अंगार्‍याच्या पुढ्या टाक, त्याच्या नावावरनं देवाला नारळ वाढव असे प्रकार केले. पण राजू डगमगला नाही. या राजूनं ओळखलं हे प्रकरण आपल्यानं सुटणार नाही. त्यासाठी आपल्या कमिटीतल्या शिरसाठ सरांना बोलवाय पाहिजे. हे शिरसाठ सर म्हणजे सुद्धा भन्नाटच होते. गरज असेल त्यावेळी अंगात सुद्धा खोटं काढायचे. लोकांना वाटायचं खरंच सरांच्या अंगात आलय. पण शेवटी लोकांना अंगात येणं, भूत बसणं हे कसं खोटं आहे हे समजवायचे. त्यांनी पहिल्यांदा दिलीपला आपलसं केलं नि मग म्हणाले,
    "दिलीपराव, भूतबित काय नसतंय, हा सगळा आपल्या मनाचा खेळ आहे, तुम्ही भिऊ नका."
    देवाच्या बाया पाय आपटतच आलेल्यांना शिव्या देत बाहेर पडल्या, त्यांचं गिर्‍हाईक जाणार होतं. दिलीपला खूप समजावलं तो ऐकेना, पण झटकन बोलून गेला, "तुम्ही तिथं चला अन् बर्फी खावा चला."
    शिरसाठ सर म्हणाले,
    "बर्फीच काय आम्ही चापाती भाजी सुद्धा खातो."
    दिलीपबरोबर पोरांचा घोळका निघाला. गल्लीतल्या म्हातार्‍या बायका दिलीपला बघून म्हणाल्या, "चार दिसांत पोराला पार पिळून काढलं, पाक बाद झालं पोरगं, कसं चांगलं हुतं."
    काही लोक हसत होती, लांबनच म्हणत होती,
    "तुम्हाला दिलीपराव म्हणायचं की शामराव?"
    स्मशान शेड आले. कमिटीनं खिशातलं हात रुमाल काढले. ते अंथरले त्यावर बसून चपाती भाजीसोबत बर्फी खाल्ली. ते पाहून दिल्याला आनंद झाला. त्या आनंदातच तो म्हणाला,
    "माझ्या अंगावरनं श्याम्या आता यांच्या अंगावर गेला." अन् त्यानं पोबारा केला.
    दुसर्‍या दिवशी तो राजूला भेटला. त्या कमिटीत सहभागी झाला. गेली दोन वर्ष राजू अन् दिलीप गावात अंधश्रद्धेविरोधात काम करतात.
    आज गावात माणसं आजारी पडूद्यात, नाहीतर जनावरं, लोक देवांच्या बायकांकडे न जाता डॉक्टरकडे जातात. रात्री अपरात्री बिनदिक्कत शेताकडं, नदीकडं जातात. कधी कधी लोक दिलीपराव आठवला कि काय शामराव म्हणतात.
    हास्याची लकेर उमटते आणि लोक कामाला जातात.

प्रमोद तौंदकर

कोल्हापूर


कोल्हापुरात असताना 'प्रमोद तौंदकर' स्थानिक तरुण लेखकाशी ओळख झाली. गप्पांच्या ओघात त्याने लिहीलेल्या काही कथांचा विषय निघाला. लेखक स्वत: ग्रामीण भागात रहात असल्या कारणाने त्याच्या लेखात साहजिकच ग्रामीण बाज होता. त्याच्या कथा या 'समाज प्रबोधन' या हेतूने लिहिलेल्या असल्या तरी त्यातील ग्रामीण भाषा मला फार भावली. या कथा मनोगतींपर्यंत पोहोचव्यात असं मला वाटलं, म्हणून हा उद्योग.

ता.क.: ही कथा इथे प्रसिद्ध करण्यासाठी लेखकाची परवानगी घेतलेली आहे.