काही लग्नानुभव !

"पुण्यात काय पहावं?" असा प्रश्न विचारला तर 'शनीवारवाडा', 'सारसबाग','पर्वती' वगैरे अनेक उत्तरं मिळतील. माझे काही पुणेरी मित्र तर 'फ़र्ग्युसन', ' गरवारे', ही नावं पण या यादीत जोडतात ( आणि स्वानुभवाने मला ते पटलंय पण!)

पण पुण्यातील न चुकविण्यासारखी एक गोष्ट म्हणजे इथे होणारी लग्नं!

आमच्या एका मित्राचं गेल्या वर्षी लग्न झालं. त्याने काही जिवलग व निवडक अश्या ५०-६० मित्रांनाच निमंत्रण दिल्यामुळे जाणं भाग होतं. मी व अमीत उर्फ़ अम्या जाणार होतो, पण आयत्यावेळी अम्यानं शेंडी लावल्यानं मला एकट्यालाच जावं लागलं.

मी हॉलवर पोहोचलो, आत शिरलो, एक मागचीशी खुर्ची पाहून बसलो, आणि परमेश्वरानं घडवलेल्या अनेक नयन्मनोहर कलाकृती पाहण्यात दंग झालो.

अचानक डाव्या बाजूनं आवाज आला: " कुणीकडून आलास?"

वळून पहातो तर एक आजोबा बसलेले. बहुदा त्यांचा नातू त्यांना वाऱ्यावर सोडून interpersonal relationships दृढ करण्यात गुंतला असावा.

"कोथऱूडहून आलो." म्या वदलो.

"अरे, कुणीकडून म्हणजे मुलाकडून की मुलीकडून?" आजोबा करवादले.

"मुलाकडून." मी, काहीसा ओशाळून.

"हं. " असं म्हणत ते मला वरपासून खालपर्यंत पहायला लागले. बहुदा ते मुलीकडचे अस्तील.

"नाव काय?"    ते.   

"गौतम." मी अनावश्यक माहिती देण्याच्या अगदी विरुद्ध आहे.

" आडनाव?" आजोबा बहुदा पत्रकार होते.

"सोमण."

"हं... कोथरूडला सोमण आहेत त्यांच्यापैकी का?"

"नाही."

"मग?" आजोबा.

"मग?" मी.

काही क्षण शांततेत गेले.

" नवऱ्यामुलाशी काय नातं?" आजोबा.

"आम्ही दोघे एकाच कंपनीत काम करतो."

"अस्सं! कोणत्या आस्थापनात काम करतोस तू?"

"नवऱा मुलगा काम करतो त्याच... म्म्म्म.. आस्थापनात."

"तू काय काम करतोस?"

"मी संगणक प्रोग्रामर आहे. " प्रोग्रामरला मराठीत काय म्हणतात ते आयत्यावेळी सुचेनाच.

"काम काय असतें?"

इथे माझा आटा ढिला झाला. मग मी Client कडून Software Requirements Specifification मिळण्यापासून सर्व Software Developement Life Cycle नीट समजावून सांगितली. त्यांचे समाधान झाले असावे, कारण नंतर काही त्यांनी पून्हा त्रास दिला नाही.

दुसऱ्या एका लग्नात एका गृहस्थांचं "अरे वा! आलात तुम्ही? वाटलं नव्हतं तुम्ही याल!" असं अगत्यपुर्वक स्वागत(??!!) करण्यात आलेलं मी पाहिलंय. हा म्हणजे घरी जेवायला बोलवून नंतर "तुम्ही एवढं जेवाल असं वाटलं नव्हतं!" असं म्हणण्यासारखा प्रकार झाला की! 

अजून एके ठिकाणी एका बाईंनी फ़ारशी काही ओळखदेख नसताना चार चौघात, "पगार कितीसा रे मिळतो तुला?" असं विचारलं होतंन. मी ही मग "तसा काही फ़ार नाही काकू, विडी-काडीचा परस्पर खर्च सुटतो, एवढंच.." असं सांगून त्यांची दातखिळी बसवली होती.

लोकं असा आगाऊपणा का करतात बुवा?