चिकन कबाब पुलाव

  • चिकन कबाब तयार पाकीट (वेंकीजचे किंवा तत्सम) २५० ग्रॅम
  • चार मध्यम कांदे
  • एक वाटी तांदळाचा भात
  • हिरव्या मिरच्या, कोथिंबीर (आवडीप्रमाणे)
  • हळद
  • तेल
दीड तास
दोन जणांना पोटभर

हल्ली भारतात वेंकीजचे (किंवा तत्सम) गोठवलेले चिकन कबाब सहजपणे मिळतात. एक पाकीट साधारणपणे २५० ग्रॅमचे असते. ते आणून त्यातील कबाब एक तास बाहेर ठेवावेत. म्हणजे ते नैसर्गिक तापमानाला येतील.

दरम्यान एक (मोठी) वाटी तांदळाचा भात करून घ्यावा. झाल्यावर कुकर उघडून थंड करून (नैसर्गिक तापमानाला आणून; शीतकपाटात ठेवून नव्हे) घ्यावा.

कांदे उभे बारीक (पुलावासाठी कापतो तसे) कापून घ्यावे.

हिरव्या मिरच्या बारीक कापून घ्याव्यात.

भात परतायला जेवढे तेल लागेल (अती तेलकट खाण्याची सवय नसेल तर एक डाव) त्यात एक डाव आणखी (कबाबांसाठी) घालून कढईत गरम करायला ठेवावे.

तेल धुरावल्यावर ज्योत बारीक करावी आणि हिरव्या मिरच्या घालाव्या (याचा दणदणीत खाट उठतो, तेव्हा जरा जपून). लगेच कापलेला कांदा घालावा, अन्यथा मिरच्या जळतात. कांदा गुलाबी झाल्यावर त्यावर चिमटीभर हळद सोडावी.

आता त्यात नैसर्गिक तापमानाला आलेले कबाब टाकावेत आणि  (ज्योत मोठी करून) उलथण्याने चांगले ठेचून एकजीव करून घ्यावेत. परत ज्योत बारीक करून ते पाच मिनिटे झाकण ठेवून शिजवावेत. झाकण काढून हलवावे आणि परत पाच मिनिटे झाकण ठेवून शिजवावे .

आता त्यात तयार (नैसर्गिक तापमानाला आलेला) भात घालून चांगले परतावे. झाकण ठेवून एक वाफ आणावी (साधारण पाच मिनिटे).

झाकण उघडून बारीक चिरलेली कोथिंबीर घालून एकत्र करावे.

* सोबत पातीचा कांदा, मुळा हे बारीक चकत्या करून द्यावेत.

* आवडत असल्यास वरून लिंबू पिळावे.

* हिरव्या मिरच्यांऐवजी लाल मिरच्या अथवा लाल तिखट वापरता येईल. फक्त तळणीचा वेळ (आणी खाट) संभाळावा.

स्वानुभव