माझ्या चारोळ्या

प्रेमात 'पडलं' तरी
स्वतःला सावरता आलं पाहिजे
किती ही बेलगाम झालं तरी
मनाला आवरता आलं पाहिजे

हल्ली का कुणास ठाऊक
पण मी वेड्या सारखी वागते
आकाशातल्या चांदण्या निरखत
उगीचच रात्रभर जागते

आता सवयीचं झालंय मला
मी निघताना तुझं माझ्या डोळ्यात पाहणं
आणि त्या नजरेनं जखडून
माझं सवयीनं काही क्षण रेंगाळणं

तू असाच समोर बसून रहा
मला तुला डोळे भरून पहायचंय
या अबोल, शांत क्षणाला
क्षणभर अनुभवून पहायचंय

तुझ्यावर किती ही राग आला तरी
मला रागावता येत नाही
तुझ्याच बाबतीत असं का होतं
मला सांगता येत नाही

तुला भेटायला येताना
चुकून छत्री विसरले
ढग तरी किती चावट
नेमके तेव्हाच बरसले

जवळिकी पेक्षा दुरावाच
मला अधिक आवडतो
कारण आपल्या प्रेमाची वीण
तोच अधिक घट्ट करतो

मी रोज खिडकीत उभी असते
तु येतोस का ते पाहण्या साठी
ये ना कधी तरी असाच
माझं मन राखण्या साठी