पुलंच्या साहित्यावरील प्रश्नमंजुषा

पुलंच्या सातव्या स्मृतिदिनानिमित्त ही छोटीशी प्रश्नमंजुषा. केवळ विरंगुळा हाच यामागचा उद्देश आहे. कृपया उत्तरे लेखाला प्रतिसाद म्हणूनच द्यावीत, परंतु प्रतिसादाच्या विषयात उत्तर/रे लिहिण्याचे टाळावे - जेणेकरून इतरांचा रसभंग होणार नाही. 

बऱ्याच मनोगतींचे वाचन, त्यातूनही पुलंच्या पुस्तकांचे, दांडगे असल्याने प्रश्नांत थोडा अवघडपणा आणण्याचा प्रयत्न केला आहे. [उदा. पहिल्या प्रश्नातील गाळलेल्या जागेचे उत्तर ध्वनिमुद्रिकेत सापडणार नाही, फक्त मूळ लेखातच सापडेल :)]

गाळलेल्या शब्दात जितकी अक्षरे आहेत तितकीच अक्षरे मोकळी सोडली आहेत. या प्रश्नांव्यतिरिक्त कुणाच्या स्मरणात पुलंची अशीच थोडी आव्हानात्मक वाक्यं असतील, तर प्रतिसादाच्या विषयात 'अधिक प्रश्न - १/२...' असे लिहून ही साखळी पुढे वाढवता येईल. साधारण दोन दिवसांनी मी याची उत्तरे प्रतिसादात देईन. धन्यवाद.

१. अस्सल मुंबईकराचा जीव ताजमहाल हॉटेलात हल्ली __सुद्धा मिळते हे ऐकून तडफडतो. [खिल्ली]

२. पण राजहंस जमून गेला. असल्या हंसाची हिंसा करू पाहणाऱ्या नळाला अजिबात _______ नसावा. [पाळीव प्राणी]

३. ___ म्हणजे वानर! इंग्रजीत ह्याला मंकी डान्स असेच म्हणतात. पण ही वानरे साधीसुधी नव्हेत. अशोकवनातल्या सीतेच्या सुटकेसाठी धडपडणारी, श्रीरामप्रभूंच्या वानरसेनेतली ही वानरे. [पूर्वरंग]

४. अजून गुणांची टक्केवारी कळली नाही. कळल्यावर सांगेन. पण निदान ___ प्रतिशत तरी मिळावेत. [व्यक्ती आणि वल्ली]

५. "बापूशेठ, पाव्हणे लेखक आहेत हो. आमच्या __ __सारखी नाटकं लिहिलं आहेत. फार बोलू नका. नाहीतर तुमच्यावर लिहितील एखादा फर्मास फार्सं." [व्यक्ती आणि वल्ली]

६. मी निमूटपणाने सगळ्यांना घेऊन बाहेर गेलो. त्यांची तहान भागवली. शंकऱ्याला ____ची तहान लागली होती. शरीला ऑरेंजची. [असा मी असामी]

७. 'स्त्री' म्हणजे मधल्या सुट्टीत सागरगोटे खेळणारी आणि अधूनमधून 'ए, माला दे ना चिंच' म्हणून आमच्यासमोर तोंडे वेंगाडणारी वस्तू येथपासून तो छबू लोखंडेला 'मिस लोखंडे' म्हणण्यापर्यंतचा आमचा मानसिक विकासही सोबतीसोबतीनेच झाला होता. तोच अंतू आठ दिवसांपूर्वी मला '__ ___ आहे' हे सौंदर्यवाचक विधान आहे म्हणून सांगू लागला. [गोळाबेरीज]

८. कृष्ण चालले वैकुंठाला। राधा विनवी पकडुनि बाही। इथे ___ खाऊनि घे रे। तिथे कन्हैय्या ___ नाही॥ [पानवाला]

९. अजूनही पुण्यात 'शाळूकर बोळ' म्हणण्याऐवजी 'शाळूकराचा बोळ' म्हणणारी माणसं भेटली - शिवाजीनगरला ___ म्हणणारे भेटले किंवा मुंबईच्या पाली हिलला, 'मोतमावली' म्हटलेलं आढळलं आणि सायनाला 'शीव' म्हणणारा माणूस दिसला की, माणूस माझ्या गोत्रातला वाटतो. [पुरचुंडी]

१०. कॉलेजच्या पोर्चमध्ये नायकाची वाट पाहत उभी असणारी नायिका ही फक्त फडक्यांच्याच कादंबरीत असते हे आमच्या सगळ्या गँगने ओळखले होते. शेवटी सगळे ___-तुकारामच! [दाद]