पी. एम. टी. प्रवासाचे फ़ायदे

मित्रहो,
पुण्यातल्या पी. एम. टी.  बसेस बद्दल भरपूर बोलले, लिहिले जाते... थोडेसे चांगले, बरेचसे वाईट. तरीही लोकं पी. एम. टी.  ने प्रवास करणं काही सोडत नाहीत. आतापर्यंत मला वाटायचे कि ते नाईलाजापोटी असावे. परंतु काही क्षणांपुर्वीच मला पी. एम. टी. प्रवासाचे फ़ायदे ऊमगले आणि. 'जे जे आपणांसी ठावे...’ या ऊक्तीनुसार मी ते आपल्याला सांगत आहे.

  1. पी. एम. टी. चे चालक आपली गाडी प्रकाश वेगाने हाकायचा आटोकाट प्रयत्न करत असतात. आईन्स्टाईनच्या सापेक्षता सिध्दांतानुसार, प्रकाश वेगाने जाणाऱ्या वस्तुसाठी कालगणना थांबते. याचाच अर्थ - तुम्ही पी. एम. टी. ने जितका प्रवास कराल तेवढे तुमचे आयुष्य वाढेल. 
  2. पुण्यात पी. एम. टी. शिवाय प्रवासाचे दुसरे साधन म्हणजे रिक्षा अथवा स्वत:ची बाईक. समजा तुम्ही यापैकी एकाने चालला आहात आणि (देव करो, असे न होवो, पण) पी. एम. टी. ने धडकले. जास्त मार कोणाला बसेल?
    ( या कूट-प्रश्नाचे ऊत्तर पडताळून पहाण्यासाठीच पी. एम. टी. चालक वारंवार प्रयोग करत असतात).
    बहुसंख्य जन्तेच्या असे ध्यानात आले आहे की आपण पी. एम. टी. च्या आतच जास्त सुरक्षित राहु.
  3. पी. एम. टी. जीवन-शिक्षण देते. काही कारण नसताना भांडण कसे ऊकरून काढावे, चालत्या गाडीत मारामारी कशी करावी, हे रोजच्या जीवनात ऊपयोगी पडणारे शिक्षण पी. एम. टी. त मिळते.
  4. पी. एम .टी. भाषा-शिक्षण देते. कमीत कमी शब्दांत दुसऱ्याचा अपमान कसा करावा, नव-नवीन म्हणी व वाक्प्रचार आपल्याला पी. एम टी. त शिकायला मिळतात.
  5. पायाच्या एका बोटावर उभे राहू शकता? एका बोटाने वरच्या हॆन्डल-बारला लोंबकळु शकता? योगासनांचे हे नवीन प्रकार शिकण्यास पी. एम. टी. नेच प्रवास केला पाहिजे.
  6. गीतेत श्रीकृष्णांनी सांगितले आहे, " तू फ़क्त कर्म कर... फ़लाची अपेक्षा धरू नकोस.." त्याचप्रमाणे पी. एम. टी.त बसणे एवढेच आपल्या हातात असते. इच्छित स्थळी सुखरूप पोहोचू की नाही, पोहोचल्यास वेळेवर पोहोचू की नाही यासारख्या क्षुद्र प्रश्नांचा भार त्या "चक्र-धरा"वर टाकून निवांत व्हावे. दुसरे म्हणजे, पी. एम. टी. त बसलेला मनुष्य-प्राणी पुढील बरेच तास काहीच काम करु शकत नाही. एकुण काय तर, पी. एम. टी. "निष्काम कर्मयोग" आचरणात आणण्यास भाग पाडते.
  7. पी. एम. टी. त बसल्या-बसल्या तुम्हाला जगभरातील सर्व समस्यांची ऊत्तरे विनासायास मिळतात. अगदी... डासांपासून संरक्षण कसे करावे, इथपासून ते "नासा"त निवड व्हायला काय करावे, इथपर्यंत.
  8. पी. एम. टी. मधील सीट्सच्या मागे लिहिलेला मजकूर आपले सामान्य-ज्ञान वाढवितो. अन्यथा, रामाचे रेणुकावर कसे आणि किती प्रेम आहे, अमर नावाचा कुणीतरी "बैल" आहे, ही माहिती आपल्याला कुठल्या पुस्तकात भेटली असती?
  9. पी. एम. टी. त बसून खाच-खळग्यांनी भरलेल्या कर्वे रोडवरून अंगचे एकही हाड खिळखिळे न होता प्रवास करू शकणे, ही डब्ल्यु. डब्ल्यु. एफ़. कुस्ती-स्पर्धेत भाग घेण्यासाठीची पात्रता फ़ेरी मानली जाते ( किंवा मानली जायला हरकत नाही).
  10. पी. एम. टी. त अगदी घरगुती वातावरण असते. चालक-वाहक-प्यासिंजर आपुलकीने एकमेकांच्या तीर्थरूपांची चौकशी करतात. प्रेमात येऊन गालांवर चापट मारणे वगैरे प्रकार अगदी खेळीमेळीत चालू असतात.

तर, वाचकहो! अशी ही आमची पी. एम. टी..... आम्ही पुणेकर त्यातून प्रवास करतो, कारण कुणीच नाही प्रवास केला तर पी. एम. टी. चालणार कशी? पी. एम. टी. नाही चालली तर अपघात होणार कसे? अपघातच नाही झाले तर पेपरवाले रोज उठून छापणार तरी काय? आम्ही चहा पिता-पिता वाचणार काय? आणि तावातावाने चर्चा करणार तरी कशावर??