शिवाजी

सौजन्य:(सकाळ पेपर )

शिवाजी द बॉस! 
दक्षिण भारताला सध्या ज्वर चढला आहे तो "शिवाजी'चा! तमिळनाडू, केरळ, कर्नाटक व आंध्र प्रदेश ही चारही राज्ये "शिवाजी' अवतीर्ण होण्याची आतुरतेने वाट पाहत आहेत. सुपरहिरो रजनीकांत याचा "शिवाजी' हा चित्रपट या आठवड्यात प्रदर्शित होत असून, दक्षिण भारतात हा "मेगा इव्हेंट' ठरणार आहे. लोकप्रियता आणि यश याचा आपला मापदंड म्हणजे अमिताभ बच्चन. बच्चन यांच्या चित्रपट क्षेत्रातील असामान्य कामगिरीबद्दल कसलीच शंका नाही; परंतु अमिताभपेक्षा सहा-सात वर्षांनीच लहान असलेल्या रजनीकांत ऊर्फ शिवाजी गायकवाड या अभिनेत्याने गाठलेले यशाचे उच्चांक अनेकांना दिग्मूढ करतात. तमिळनाडूवर जणू काही राज्य करणारा हा मराठी माणूस आशियातील क्रमांक दोनचा महागडा नायक समजला जातो. काहींच्या मते फक्त जॅकी चेन हा एकमेव नट रजनीकांतपेक्षा अधिक बिदागी घेत असेल. शिवाजी चित्रपटासाठी त्याला २५ कोटींहून अधिक रक्कम मिळेल, असे म्हटले जाते. चित्रपट पहिल्या दोन-तीन आठवड्यांतच साठ कोटींहून अधिक कमाई करणार असल्याचा निर्मात्यांचा अंदाज असल्याने त्यांच्या मते ही रक्कम फारशी जास्त नाही. रजनीकांतची कमाई वा त्याची अफाट (अफाट हा शब्दही कमी पडावा) लोकप्रियता या गोष्टी बाजूला ठेवल्या, तरी दक्षिण भारतातील प्रादेशिक चित्रपटांचे बजेट ३०-४० कोटींच्या घरात जाऊ लागले. प्रादेशिक भाषा मरत चालल्याचा बोभाटा सर्वत्र होत असताना दक्षिण भारतात प्रादेशिक चित्रपटांना उत्तम व्यावसायिक यश मिळताना दिसते. या बजेटचे आकडे पाहून फक्त बॉलीवूडचा विचार करणाऱ्या प्रसारमाध्यमांचे लक्ष "शिवाजी'कडे वळले. या निमित्ताने बच्चन आणि रजनीकांत यांच्यात तुलना सुरू झाली आहे. मात्र, रजनीकांत व अमिताभ यांच्या अभिनयाची जातकुळीच वेगळी आहे. अमिताभच्या चित्रपटांचे रीमेक करीतच रजनीकांत लोकप्रियतेच्या पायऱ्या चढला. प्रेक्षकांना मोह
िनी घालण्याचे रजनीकांतचे कसब विलक्षण असले, तरी त्याच्या अभिनयात सूक्ष्मता कमी व भडकपणा अधिक असतो. प्रेक्षकांना जे हवे तेच देण्याकडे निर्माता-दिग्दर्शकांचा कल असल्याने रजनीकांतचाही त्याला नाइलाज असावा. व्यवस्थेविरोधात लढणारा नायक हाच रजनीकांतच्या चित्रपटांचा स्थायीभाव असतो. "शिवाजी'मध्येही तोच धागा चालविला असावा, असे अंदाज व्यक्त होत आहेत. मात्र, दिग्दर्शक शंकरन यांनी कथेबाबत गुप्तता पाळली आहे. बॉलीवूडच्या तोडीस तोड असा व्यवसाय दक्षिण भारतातील चित्रपट करून दाखवितात; पण असे यश अन्य भाषांना का मिळत नाही, असा प्रश्‍न पडतो. तमीळ चित्रपट पन्नास- साठ कोटींचे गड सर करीत असताना मराठी चित्रपटाचे प्रथमच लंडनला चित्रीकरण झाल्याचे आपल्याला कोण कौतुक वाटते. दक्षिण भारतातील जनतेशी तेथील चित्रपटांनी जसा भावबंध निर्माण केला तसा तो करण्यास मराठी चित्रपट अपयशी ठरले हे याचे कारण आहे, की मराठी भाषेची हिंदीशी असणारी जवळीक मराठी चित्रपटांना मारक ठरली याचा शोध घेतला पाहिजे. सध्या तरी तमिळनाडूला भुरळ पाडणाऱ्या मराठी शिवाजीला शुभेच्छा देणे आणि त्याच्या "रीमेक' वा "डब' आवृत्तीची वाट पाहणे, इतकेच आपल्या हाती आहे.

ता.क (ढापले आहे.)