शब्दकोशाला तरी प्रमाण मानायचे का?

गेले काही दिवस आणि एकंदरीतच मनोगतावर मराठी शब्द/ प्रतिशब्द यांचा शोध घेण्याच्या दृष्टीने जे काही लेखन होते आहे. त्याचा परिणाम म्हणून मी माझ्याकडे असणाऱ्या( किंबहुना कित्येक मनोगती आणि मनोगताबाहेरील मराठीप्रेमींनी सुचवलेल्या) प्र. न. जोशी यांच्या  'आदर्श शब्दकोशावर' एक नजर फिरवली.शब्दकोशात जे शब्द आहेत ते शब्द त्या भाषेने स्वीकारलेले आहेत असे आपण समजतो. निदान माझा तरी समज असाच आहे. इंग्रजी शब्दाचा अर्थ बघायचा असेल तर ऑक्सफर्ड अथवा वेबस्टर शब्दकोश आपण बघतो त्या प्रमाणे मराठीकरता हा शब्दकोश उत्तम आहे असे अनेकजणांकडून समजल्याने मी पुण्यातून हे मोठे बाड उचलून घेऊन आले.   हा शब्द मराठी आहे आणि हा शब्द मराठी नाही याचा साधा निकष शब्दकोश पाहून कळेल अशा माझ्या धारणेला   अनेक इंग्रजी शब्द मान्यताप्राप्त म्हणून या शब्दकोशात दिसताच खोलवर धक्का पोहोचला आहे.

  या शब्दकोशाच्या संपादकीय लेखात प्र. न जोशी यांनी टेबल, पेन, पेन्सिल, कोर्ट,स्टेशन, कोट हे शब्द जसे जुन्या काळी मराठीला मानवले त्याच कारणासाठी स्कर्ट, स्कुटर, फ्रीज, आईस्क्रीम, सूटकेस, बँक, ब्रश , स्टेनलेस स्टील असे अनेक शब्द मराठीने स्वीकारावे, खळखळ करून चालणार नाही असे प्रतिपादन केले आहे.  प्रतिशब्द नाहीत अथवा करता येणार नाहीत असे नसून कित्येकदा ते प्रतिशब्द हास्यास्पद ठरतील असे त्यांचे म्हणणे आहे.  अशा स्वीकार केलेल्या इंग्रजी व इतर भाषेतील  नवीन शब्दांची दखल या शब्दकोशाने घेतली आहे असे त्यांनी लिहिले आहे.

प्राकृत, संस्कृत, अरबी, फारशी आणि इंग्रजी इत्यादी भाषामधून मराठीत आलेल्या सर्व शब्दांसमोर मूळ शब्द कोणत्या भाषेतील आहे त्याची नोंद आहे. 

मी केवळ इंग्रजी शब्द शोधण्याचा प्रयत्न करत होते-

अकाऊन्ट
ऍक्चुअरी
ऍक्ट
ऍक्टर
ऍक्टींग
ऍक्शन
ऍक्सिडेंट
अटोमॅटिक
अटेन्शन
ऍडमिनिस्ट्रेशन
ऍडमिरल
ऍडव्हान्स
ऍडव्होकेट
ऍनालिसिस

हे सर्व शब्द मराठी म्हणून त्यात आहेत.  माझा संयम इथेच संपला, हा शब्दकोश मराठी आहे की इंग्रजी तेच कळेना. यापैकी ९०% शब्दांना सोपे मराठी शब्द मला माहिती आहेत.

  • या इंग्रजी शब्दांचा स्वीकार मराठीने केला आहे असे तुम्हाला वाटते का?
  • इंग्रजी शब्दांचा स्वीकार करायचा नाही तर मग संस्कृत, हिंदी, फारशी, उर्दू, अथवा दक्षिणेकडील राज्यातून आलेले शब्द का स्वीकारायचे याला मुद्देसूद कारणे काय देता येतील? 
  • सुमारे ऐंशी हजार शब्द असणाऱ्या या मराठी शब्दकोशाला तरी प्रमाण मानायचे की नाही ?
  • इतर शब्दकोशात परभाषेतले शब्द मराठी शब्द म्हणून आहेत का?असतील तर प्रमाण काय आहे? शब्दकोशाचे नाव सांगितले तर अधिक चांगले.
  • जेवढे शब्द संस्कृत वा इतर भाषातले आहेत तेवढेच शब्द मराठी प्रतिशब्द असतांना इंग्रजीतून मराठीत आले असे शब्दकोशावरून वाटते.  इंग्रज गेले तरी त्या काळातील विद्वानांवर इंग्रजांचा जबरदस्त पगडा कायम होता म्हणून असे घडले की इंग्रजीच्या वाढत्या प्रभावाला शरण जाऊन त्यांनी दूरदृष्टीने असे शब्द मराठी कोशात घेतले?

या सर्व मुद्द्यावर चर्चा व्हावी अशी अपेक्षा आहे. निदान या चर्चेतून योग्य शब्दकोशाचे नाव तरी कळेल:)