'चार दिवस सासूचे'छाप मालिकांवर बंदी हवी

'चार दिवस सासूचे'छाप मालिकांवर बंदी आणायला हवी असे मला मनापासून वाटते. ह्या मालिका सामाजिक आणि कौटुंबिक स्वास्थ्यासाठी अत्यंत धोकादायक आहेत. म्हणून सरकारने काही कडक पावले उचलायला हवीत.

वाहिन्यांनी केवळ सोज्ज्वळ मालिकाच दाखवायला हव्यात.

स्त्रीपात्रांच्या मेकअपवर महिला आणि समाजकल्याण विभागाचे नियंत्रण असावे. निळ्या किंवा रंगीबेरंगी रंगाचे कुंकू, टिकली, डोळ्यांवर चमचम चमकी आदी भडक प्रकार संपवायला हवेत.

अशा मालिकांमुळे घरोघरी होणाऱ्या ध्वनिप्रदूषणाचा अभ्यास हवा. महाराष्ट्र प्रदूषण नियंत्रण मंडळाने चाचण्या करून आवाजाची योग्य ती पातळी ठरवावी. संगीतकाराला पार्श्वसंगीत वरील मंडळाकडून संमत करून घ्यावे लागेल.

सरकारने एक कपटनियंत्रण मंडळही स्थापन करावे. जेणेकरून खुनशी, कपटी कटाक्ष आणि संवाद ह्यांच्यावर नियंत्रण आणता येईल.

स्वयंपाक घर असो वा कार्यालय, ह्या अशा मालिकांच्या चर्चांवर बंदी आणावी.  तो दखलपात्र गुन्हा ठरावा. प्रत्येक पोलिस ठाण्यात अशा मालिकांमुळे हवालदिल झालेल्या नागरिकांच्या -- विशेषतः पुरुषांच्या -- तक्रारींची लगेच दखल घेण्यासाठी विशेष सेल स्थापन करण्यात यावा.

तसेच ह्या मालिकांच्या आहारी गेलेल्यांसाठी समाजकल्याण विभागाने प्रत्येक गावात एक व्यसनमुक्ती केंद्र स्थापन करावे. ह्या व्यसनमुक्ती केंद्रात  बीबीसी, डिस्कवरी,  हिस्ट्री आणि  नॅशनल जिओग्राफिक आदी वाहिन्यांचे कार्यक्रम पुन्हा पुन्हा दाखवून 'डी-टॉक्सिफिकेशन करता येईल, अशी सोय असावी.

आपणांस काय वाटते, जरूर सांगावे. हा प्रश्न गंभीर असल्याने सर्वांनी पोटतिडिकेने आपले मत द्यावे.