आम्ही फ्याशनेबल होतो

आम्ही विद्वानांच्या नजरेतून घसरलो आहोत अशी बातमी आल्यापासून आम्हाला रात्री झोप नव्हती. घेतलेला घास घशाखाली उतरत नव्हता. जुन्या चित्रपटातील हिंदी नायकाप्रमाणे "ओ दुनिया के रखवाले" म्हणत गावेसे वाटत होते. कसेही करून आम्हालाही फ्याशनेबल व्हायचे होते. विद्वानांच्या बोटाला बोटे लावून कळफलक बडवत साहित्यसमीक्षा टंकित करायची होती. अशा कठीण परिस्थितीत एकच मार्ग होता. थेट गुरूदेवांनाच साकडे घालायचे.

गुरूदेवांच्या अंधारलेल्या खोलीत आम्ही शिरलो. गुरूदेवांचे डोळे समीक्षा करून करून तांबारले होते. आमचा इंटरव्ह्यू सुरू झाला.

"ह्म्म, काय वाचलयस आत्तापर्यंत?"

"सार्त्र थोडाफार.."

"काय?" गुरूदेव गरजले. "नामाकूल, नामुरव्वत, ..."

गुरूदेवांच्या अरबी भाषांवरच्या प्रभुत्वाबद्दल ऐकून होतो. तब्बल एक मिनिट आणि पंधरा सेकंदांनंतर अरबी भाषेतील न चे शब्द संपले. आपले पहिलेच दैवत असे नेस्तनाबूत झालेले पाहून आमचे धाबे दणाणले होते.

"अजून काय?"

सचिनचा पहिल्या बॉलवर त्रिफळा गेल्यावर आता कुणाला पाठवायचे याची आम्हाला धास्ती पडली. तरीही कुलदैवताचे स्मरण करून पुढे गेलो.

"हॅम्लेट वाचले आहे, शेक्सपिअरचे"

"शेक्सपिअर इज अ ह्म्बग. हॅम्लेट म्हणजे तरी काय, ग्रीक नाटकावरून उचलले आहे झालं. त्यापेक्षा अरबी साहित्यिक हिमाम अर्र्‍र्दुल रेहमान यांचे जलसा-ए-कबाब वाच. अरे शेक्सपिअरच्या सात पिढ्या पाणी भरायला ठेवल्या असत्या."

सात पिढ्यांनी भरण्याइतके पाणी अरबी वाळवंटात कुठून आले असते हा प्रश्न आम्ही आमच्या आवंढ्याबरोबर गिळून टाकला.

"अजून काय?"

"क.. क..क" कामू, काफ्का अशी नावे आठवत होती पण धैर्याने साथ न दिल्याने आमचा डरमधील शाहरुख झाला होता.

तेवढ्यात गुरूदेवांचा पेला रिकामा झाल्याचे आमच्या चाणाक्ष नजरेत आले. आम्ही लगबगीने त्यांच्या उर्जेचा स्त्रोत शोधू लागलो. घाईघाईत चुकीचा खण उघडला आणि तिथे सिडनी शेल्डन, आयर्विंग वॉलेस अशी मंडळी दृष्टीला पडली. आम्ही गडबडून खण बंद केला आणि गुरूदेवांकडे पाहिले. त्यांचे डोळे शून्यात स्थिर होते.

आम्ही गुरूदेवांचा पेला रिफिल केला आणि त्यांना आमच्या अस्तित्वाची जाणिव झाली.

"हम्म, तुला फॅशनेबल व्हायचे आहे तर."

"अं म्हणजे हो.." आम्ही चाचरलो.

"अरे इतके सोपे आहे का ते? वर्षानुवर्षे इतर लोक काय वाचतात त्याचा अभ्यास करावा लागतो. मग ते सर्व टाळून किंवा टाळल्याचे दाखवून काही जास्त प्रसिद्ध नसलेले लेखक निवडावे लागतात. मग इतर मंडळी जेव्हा प्रसिद्ध लोकांची नावे तोंडावर फेकतात, तेव्हा आपण ही नावे फेकायची. म्हणजे सगळे गप्प होतात."

आम्ही भराभर नोट्स घेत होतो.

 "लक्षात ठेव, जे जे प्रसिद्ध आहे ते सर्व वर्ज्य."

गुरूदेवांच्या उर्जास्त्रोताची बाटली बरीच प्रसिद्ध होती पण आम्ही तिकडे कानाडोळा केला.

"इर्फ फाक दुम, दिहीले अनिहास दुम अर्थात ऑल दॅट ग्लिटर्स इज नॉट गोल्ड." ऊर्जास्त्रोताच्या प्रमाणाबरोबर गुरूदेवांचे भाषाप्रभुत्व वाढत होते.

"गालिबबद्दल आपले काय मत आहे?" निदान हा  ब्याटसमन तरी भरवशाचा निघायला हरकत नाही.

"गालिब? अरे त्याला काही अर्थ आहे का? दिवसभर दारू पिऊन वाट्टेल ते बरळायचं, त्याला काय काव्य म्हणतात?" आमची नजर उगीचच उर्जास्त्रोताच्या बाटलीकडे गेली.

"त्यापेक्षा हमीद अल रशीद वाच. आयुष्य कारणी लागेल." आयुष्यात पहिल्यांदाच हे नाव ऐकले होते, त्यावरून आयुष्य कारणी कसे लागेल हे लक्षात यायचे कारण नव्हते.

असेच दिवस गेले, दिवसांचे महिने झाले. आम्ही एकलव्याच्या निष्ठेने गुरूदेवांची सेवा करत होतो. त्यांच्या मुखातून सांडणारे ज्ञानकण अधाशासारखे वेचीत होतो. अखेर तो दिवस आला. एका संकेतस्थळावरील चर्चेत आम्ही सर्व मान्यवर लेखक, तत्त्वज्ञांना नामोहरम केले. आमची तपस्या सफल झाली होती. आम्ही फ्याशनेबल झालो होतो.