जेहत्ते कालाचे ठायी

काय द्यावा हात हल्ली माणसांना
स्वार्थ दिसतो यात हल्ली माणसांना

राक्षसांची गरज नाही कलियुगाला
माणसे खातात हल्ली माणसांना

सहज केसाने गळा कापून जाती
सहज जमतो घात हल्ली माणसांना

पाहती दिड्‍.मूढ सारे साप-अजगर
टाकताना कात हल्ली माणसांना

पाहिजे सारेच ताबडतोब आणिक
पाहिजे फुकटात हल्ली माणसांना

भेट होते जालनावांचीच केवळ
चेहरे नसतात हल्ली माणसांना

'भृंग', देवांचे कसे होणार आता
माणसे भजतात हल्ली माणसांना