... कसे? (गजल)

पुन: पुन: मी तेच गुन्हे करणार कसे?
पुन: तुला अन माझे मी म्हणणार कसे?...

झोपेमधुनी जागा झालो मधेच मी
अर्धे-अपुरे स्वप्न पुन: बघणार कसे?...

तुझ्याच गावी लपून, चोरुन असतो मी
कुशल तुझे पण कुणास मी पुसणार कसे?...

आठवणींच्या वादळात मी विस्कटतो
पुन: नव्याने स्वतःस सावरणार कसे?...

श्वास, स्पंदने एकच झाली दोघांची
तुझ्या मिठीतुन आता मी सुटणार कसे?...

बेचैनीतच इतका असतो 'अजब', मला-
कवितेखेरिज काही मग सुचणार कसे?...