एका पदवीदान समारंभाची गोष्ट

एका पदवीदान समारंभाची गोष्ट

साधारण नऊदहा महिन्यांपूर्वी माझ्या मुलाला पीएच. डी. मिळाली. त्याआधीच माझ्या अमेरिकेतील बहिणीने व मेहुण्यांनी माझ्या डोक्यात एक किडा सोडला होता की मुलाच्या ग्रॅज्युएशनला इकडे या आणि आलात की आमच्याकडेही थोडे दिवस रहा. ते लक्षात ठेवून मुलाने नोव्हेंबरमध्ये होणाऱ्या समारंभात पदवी न घेता मे मध्ये होणाऱ्या समारंभात घ्यायची असे ठरवले. म्हणजे मला अमेरिकेतील थंडीचा त्रास होणार नाही.

मग मीही इकडे चक्रं फिरवायला सुरुवात केली. रजेची मंजुरी, व्हीसा, इंशुरन्स वगैरे सर्व सोपस्कार उरकले. खरेदी, इतर तयारी इत्यादी करून मी आणि माझी मोठी बहीण अमेरिकेला जायला सिद्ध झालो.

मे महिन्याच्या सुरुवातीला आम्ही दोघी धाकट्या बहिणीकडे अटलांटाला पोहोचलो. तिथे थोडे दिवस राहून बहिणीचे चौकोनी कुटुंब व आम्ही दोघी पदवीदान समारंभासाठी मिनियापोलिसला जायचे अशी योजना होती. मुलगा त्याच्या नोकरीच्या गावाहून परस्पर मिनियापोलिसला पोहोचणार होता. बहीण, मेहुणे आणि मुलगा यांनी व्यवस्थित नियोजन करुन दोन्ही विमाने साधारण एकाच वेळेला मिनियापोलिसला पोहोचतील अशी तिकिटे काढली होती.

पदवीदान समारंभ शुक्रवारी होता. आम्ही ठरल्याप्रमाणे गुरुवारी संध्याकाळी/ रात्री ८च्या विमानाने जायला निघालो. बहिणीचं घर विमानतळापासून बरंच लांब. शिवाय ट्रॅफिकचा मुद्दा होताच. तेव्हा सर्व विचार करून आम्ही घरातून पाचलाच निघालो. थोडा वेळ बरं चाललं होतं. पण पुढे पुढे ट्रॅफिक जास्त व्हायला लागला आणि काही वेळानंतर तर ’इंच इंच लढवायची’ वेळ आली. बहीण आणि मेहुणे यांची चर्चा. "पुढे एखादा अपघात वगैरे झाला असेल. नाहीतर एवढा ट्रॅफिक जॅम व्हायचे कारण नाही." आता वाट बघत बसणे एवढेच आमच्या हातात होते. मेहुण्यांची सारी भिस्त  HOV lane वर होती.  HOV lane  म्हणजे High Occupancy Vehicle lane.  ही लेन दोनाहून जास्त माणसे ज्या वाहनांमध्ये असतात त्यांच्यासाठी  राखून ठेवलेली असते. पण सर्व रस्त्यांवर ती असतेच असे नाही. असो. आम्हाला ती लेन मिळाली. नॉर्मल वेगाने आमची गाडी धावू लागली. सगळ्यांच्या आशा उंचावल्या आणि जिवण्या रुंदावल्या! पण काही वेळानंतर ती लेन संपली! पुन्हा इंच इंच लढवणे सुरु झाले. वातावरणात नसला तरी आमच्या गाडीत विलक्षण तणाव होता. कोणी कुणाशी बोलत नव्हते. विमान चुकणार अशी माझी जवळजवळ खात्रीच झाली आणि मी मनात खट्टू झाले की ज्यासाठी आलो तेच हुकणार बहुतेक! इंच इंच लढवतच आम्ही विमानतळावर पोहोचलो तेव्हा साडेसात वाजले होते. आता सगळ्यांची धडधड आणखी वाढली होती. कारण आता इतक्या जवळ आलोय तरी विमान मिळण्याची खात्री नाही.

रस्त्याच्या कडेलाच जिथे चेक-इन करता येते तिथे सामानाला व आम्हाला बाहेर काढून मेहुणे गाडी पार्क करण्यासाठी गेले. चेक-इन करतानाही थोडी अडचण होती. बहिणीच्या संपूर्ण कुटुंबाचे एकत्र इ-तिकीट होते. त्यामुळे मेहुणे तिथे हजर नसताना त्यांचा बोर्डिंग पास मिळेल की नाही शंका होती. पण एकूण परिस्थिती पाहून असेल कदाचित,  पण आम्हाला सर्वांचे बोर्डींग पासेस मिळाले खरे.

अटलांटाच्या विमानतळाचं एक वैशिष्ठ्य आहे. तिथे सर्व उड्डाणांची सुरक्षा तपासणीची रांग एकच असते. त्यामुळे तिची लांबी काय वर्णावी! डिस्नी वर्ल्ड मधल्या रांगासुद्धा त्यापेक्षा बऱ्या! तर अशा त्या रांगेत जाऊन आम्ही उभे ठाकलो. एकूणच ताण कमी करण्यासाठी धाकटी बहीण मुलांना म्हणाली, "बाबा वेळेत नाही आले तर तुम्ही दोघेजण  मावश्यांना घेऊन जाल का?" मुले वय वर्षे सुमारे आठ आणि बारा! आईचा प्रश्न ऐकून बिचारी कावरीबावरी झाली. ’नाही’ म्हणावं तर मावश्यांना वाईट वाटेल. ’हो’ म्हणावं तर ते आपल्याला जमणार नाही हे माहिती होतं. त्यांना ह्या संकटातून सोडवायला देवच-नव्हे त्यांचा बाबाच- धावून आला. खरचंच मेहुणे धावत धावत येत होते. दोन ढांगातच ते आम्ही रांगेत जिथे उभे होतो तिथे येऊन उभे राहिले आणि आम्हा सर्वांचे चेहरे उजळले!

रांग हळूहळू पुढे सरकत होती आणि घड्याळाचा काटा मात्र भराभर पुढे सरकत होता. विमान चुकण्याची मूलभूत भीती अजूनही कायम होती. मध्येच माझ्या अर्धवट माहितीवर आधारित आशावाद प्रकट करत मी बहिणीला म्हटलं, "आता आपल्याला बोर्डिंग पासेस दिलेले आहेत, म्हणजे आपल्याला घेतल्याशिवाय काही विमान उडणार नाही." त्यावर माझ्या आशेला सुरुंग लावत ती म्हणाली, "असंच काही नाही. आपल्याला फार उशीर झाला तर आपलं चेक-इन केलेलं सामान बाहेर काढून विमान उडवण्याची शक्यता नाकारता येणार नाही." आपल्या म्हणण्याच्या पुष्ट्यर्थ तिने तिच्या माहितीतलं अशा प्रकारचं एक उदाहरणही सांगितलं. तेव्हा पुन्हा मी चिंताक्रांत!

सरकत सरकत अखेर शेवटी आम्ही प्रत्यक्ष सुरक्षा तपासणीच्या तिथे पोहोचलो. माझ्या बांगड्यांना सुद्धा एका वाडग्यात बसून क्ष-किरण दिव्यातून जावं लागलं. हे मला नवीनच होतं पण आता त्यावर विचार करायला फुरसत नव्हती कारण घड्याळ आता सात वाजून बावन्न मिनिटे दाखवत होतं. तिथून सरकत्या जिन्याने भुयारात गेलो. मग भुयारी रेल्वेतून काही स्टेशने जाऊन पुन्हा सरकत्या जिन्याने वर आलो आणि मग गेटच्या दिशेने धावायला सुरुवात! पुढे मेहुणे आणि दोन मुले, त्याच्यामागे काही फुटांवर मी आणि माझ्यामागे काही फुटांवर मोठी बहीण आणि धाकटी बहीण अशी आमची वरात चालली होती. मी मोठ्या बहिणीहून चार वर्षांनी लहान, शिवाय मुंबईत बरीच वर्षे काढली असल्याने मला धावपळीची थोडी सवय. ह्या सर्वांमुळे मी तिच्यापुढे चार पावले इतकंच! मध्येच मेहुणे मागे वळून ओरडले, "मीराताई, मी पुढे गेटवर जाऊन बघतो काही करता येतंय का. तुम्ही लवकर या." आणि ते मुलांना घेऊन पळत सुटले.

एकदाचे आम्ही गेटवर पोहोचलो. मेहुण्यांचा धावपळीला यश आलं आणि आम्ही विमानात जाऊन बसलो. दुसऱ्याच क्षणाला विमानाचं दार बंद झालं!  आपल्याला खूप ताप आलेला असताना एखाद्या जबरदस्त गोळीनं तो एकदम खाली आला की कसं ’हल्लक’ वाटतं तसं मला झालं.

ठरलेल्या वेळी मिनियापोलिसच्या विमानतळावर पोहोचलो. आता मुलाची वाट पहाणे. दर्शकावर त्याच्या विमानाची येण्याची वेळ १०:०४ अशी दाखवली होती म्हणजे आम्हाला फार वेळ वाट बघायला लागणार नव्हती. पण साडेदहा, पावणेअकरा झाले तरी मुलाचा पत्ता नाही. मग धाकट्या बहिणीला काय बुद्धी झाली कुणास ठाऊक? तिने तिचा भ्रमणध्वनी पर्समधून बाहेर काढला. त्यावर मुलाचा निरोप केव्हाच आलेला होता, "इथे पाऊस पडत आहे आणि जोराचे वारे सुटले आहेत. तेव्हा आमचं विमान केव्हा सुटेल काही सांगता येत नाही. मला पोहोचायला बारा तर नक्कीच वाजून जातील."

मग आम्ही सगळे उठलो. आम्हाला भाड्याच्या दोन गाड्या घ्यायच्या होत्या. त्या दिशेने आम्ही निघालो. बरेच उभे-आडवे अंतर लिफ्ट, ट्रेन आणि चालून काटल्यावर आम्ही भाड्याच्या गाड्यांसाठी जिथे कार्रवाई करायची असते तिथे पोहोचलो. मेहुण्यांनी सर्व सोपस्कार पुरे केले. दोन गाड्यांपैकी एक गाडी मुलगा घेऊन येणार होता. तर तसेही तिथे सांगून ठेवले आणि आम्ही गाडी घ्यायला निघालो.

रात्रीचा साडेअकराचा सुमार. विमानतळावर सामसूम. ड्यूटीवरचे तुरळक  कर्मचारी सोडले तर आणखी माणसं कोणी नाहीत. अश्यावेळी एक मध्यमवयीन दांपत्य, दोन कंटाळलेली, पेंगुळलेली मुले, दोन थकलेल्या ’ज्येष्ठ’ महिला आणि अनेक, आणि अनेक आकाराच्या बॅगा (आम्ही तिथे तीन दिवस राहून पुढे आणखी दोन ठिकाणी जाणार होतो. त्यामुळे आमचं सामान बरंच होतं.) असा आमचा तो जथा प्रेक्षणीय किंवा खरं तर दयनीय दिसत असावा. आम्ही गाड्यांचे वाटप जिथे होते तिथे पोहोचलो. वाटप करणाऱ्याने एकदा आमच्या लबेद्यावरून नजर फिरवली आणि कागदपत्रात आम्हाला देऊ केलेल्या गाडीपेक्षा मोठ्या गाडीकडे बोट दाखवून म्हणाला. "टेक दॅट! आय ऍम गिविंग यू फ़्री अपग्रेड."

त्या मोठ्या गाडीतून आम्ही आमच्या हॉटेलवर गेलो. सगळेच झोपेला आले होते. बहिणीची मुले तर केव्हाच झोपली. रात्री एकच्या सुमारास लेक आला. थोडा वेळ सगळे त्याच्याशी बोललो. मी जरा जास्त वेळ! मी त्याला केव्हातरी म्हटलं होतं की तुझ्या मार्गदर्शकांना भेटायला मला आवडेल. तर तो मला म्हणाला की आपण दोघे बाकीच्यांच्यापेक्षा जरा लवकर निघू म्हणजे तुझी ऍडवाइजरशी ओळख करून देईन. कितीला निघायचं ते ठरवून आम्ही दोघेही झोपून गेलो.

दुसऱ्या दिवशी सकाळी दहाच्या सुमाराला आम्ही दोघे त्याच्या विद्यापीठात गेलो. मला विद्यापीठं बघायला नेहमीच आवडतं. तिथे एक प्रकारचं चैतन्य, टवटवीतपणा असतो. हे तर माझ्या मुलाचं विद्यापीठ! मला तिथे हिंडताना खूप छान वाटत होतं. मग मुलानं त्याच्या मार्गदर्शकांकडे नेलं. त्यांनी हसतमुखानं स्वागत केलं आणि गप्पाही मारल्या. विशेष म्हणजे मुलाचं मनापासून कौतुक केलं!

खरं तर अनेक नामांकित विद्यापीठातून दरवर्षी अनेक विद्यार्थी पदव्या, अगदी डॉक्टरेट सुद्धा घेतात. माझा मुलगाही त्यातलाच एक. तरीही आईला मुलाच्या पदवीचं विशेष वाटतंच! त्यानुसार काही तासांनंतर भव्य सभागृहात, प्रशस्त व्यासपीठावर पदवी घेताना मुलाला पाहिलं आणि अभिमान आणि आनंद वाटला पण जास्त आनंद तर लेकाचं कौतुक त्याच्या मार्गदर्शकाच्या तोंडून ऐकताना झाला होता! काहीही असो, ’हुकणार, हुकणार’ असं वाटणारा सोहळा अखेर पहायला मिळाला आणि साता समुद्रापलीकडून उड्डाण करूण आल्याचं सार्थक झालं असं वाटलं.
------------------------------------