जुलै २००७

गोंधळात गोंधळ

सकाळी मित्रमैत्रिणींचा निरोप घेऊन आम्ही निघालो डॅलस विमानतळावर. आमचे दोन मित्र आम्हाला विमानतळावर सोडणार होते. सामान बरेच असल्याने दोन कार कराव्या लागल्या. अर्धा संसार usps तर्फे पाठवला व अर्धा आमच्या चार बॅगांमधे.

निघण्याच्या वेळी रविने जाळ्यावर विमान कोणत्या गेटवरून सुटणार आहे ते बघून त्याने तसे श्रीनिवासला सांगितले. श्रीनिवास अवाजवी आत्मविश्वासात म्हणाला,
" हो हो. मला माहित आहे सर्व. मी आत्तापर्यंत बऱ्याच जणांना विमानतळावर सोडले आहे."

आमच्या कार निघाल्या. एका कारमधे मी व श्रीनिवास व दुसऱ्या कारमधे रवि व विनायक. विमान दुपारी साडेबाराचे होते म्हणून २ तास आधी निघालो. एक तास जाण्यामधे व एक तास सामानाची क्ष किरण तपासणी याकरता. श्रीनिवास व मी ११ ला विमानतळावर पोहोचलो व रवि-विनायकची वाट पाहू लागलो. साडेअकरा व्हायला आले तरी ह्यांचा पत्ता नव्हता. श्रीनिवास ३-४ वेळा शोधायला गेला त्यांना. तसे रवि-विनायक पण वेळेवर पोहोचले होते विमानतळावर, ते पण आम्हाला शोधत होते. शोधता शोधता भेटले एकमेकांना त्या अवाढव्य विमानतळावर. कोणाकडेही जागोजागी भटकणारे दूरध्वनीयंत्र  नव्हते .

गंमत काय झाली होती की रवि ज्या गेटवरून विमान सुटणार त्या गेटवर उभे होते. श्रीनिवास व मी चुकीच्या गेटवर उभे होतो. श्रीनिवासच्या अवाजवी आत्मविश्वासामुळे सगळा गोंधळ उडाला होता.

आम्ही दोघे काउंटरवर गेलो तेव्हा तेथील बाई म्हणाली, " आता १२ वाजले आहेत. तुमच्या सामानाची क्ष किरण तपासणी होईपर्यंत एक तास जाईल. तुमचे विमान चुकले आहे. पण मी तुमच्याकरता एक काम करू शकते. जास्तीचे पैसे न घेता तुम्हाला शिकागोतर्फे ग्रीनवीलचे बुकींग करून देते." आता परत सगळा उलटा प्रवास करण्यापेक्षा वेळ जास्त लागला तरी चालेल म्हणून आम्ही लांबचा पल्ला पत्करून जाण्याचा निर्णय घेतला.

श्रीनिवास रविला टाटा बाय बाय केले आणि परत काउंटरपाशी येऊन उभे राहिलो सामानाची क्ष किरण तपासणी करायला. एक गोंधळ संपल्यावर दुसरा गोंधळ सुरू झाला. त्यावेळी ११ सप्टेंबरच्या अमेरिकेवरील अतिरेकी हल्यामुळे एकूणच विमानतळावरची तपासणी व्यवस्था खूपच कडक झाली होती. चार बॅगांमधला भरलेला संसार उलथापालथा केला गेला.

आमचे विमान उड्डाण असे काहीसे होते. ३ ते ५ डॅलस-शिकागो, शिकागोला ३ तासांच्या अवधीनंतर ८ ते १० शिकागो ते ग्रीनवील असे दुसरे उड्डाण. विमानतळावरील धावपळ संपल्यावर आम्ही थोडे खाऊन घेतले आणि प्राध्यापकांना दूरध्वनी करून आन्सरिंग मशीनवर निरोप ठेवला की " आमचे विमान चुकले आहे, त्यामुळे दुपारी ३ च्या ऐवजी रात्री ११ च्या सुमारास आम्ही ग्रीनवीलला पोहोचत आहोत." आणि डॅलस-शिकागो विमानात प्रवेश केला.

शिकागो विमानतळावर पहिल्याप्रथमच आम्हाला अमेरिकेतील विविध माणसांची गर्दी दिसली. आता विमानतळावर तीन तास थांबावे लागणार होते. मला गर्दी पाहून खूप आनंद झाला. त्या गजबजलेल्या विमानतळावर तीन तास कसे गेले ते कळलेच नाही. विनायकला सामानापाशी बसवून मी मनसोक्त हिंडून घेतले विमानतळावर. सरकती पायवाट  व सरकते जीने यावरून फिरले. प्रत्येक विमान आले की गर्दीचा लोंढा इकडून तिकडे जात होता. बरीच विमाने जमिनीवरून आकाशाकडे व आकाशातून जमिनीकडे झेपावताना पाहिली. काचेच्या तावदानातून विमानतळाच्या बाहेरील दृश्य सहज दिसत होते की जेथून विमाने प्रत्यक्षात उडतात. बरीच वर्दळ असते तिथे. वर्दळीचे निरिक्षण करताना लक्षात आले की तेथील कर्मचारी खूपच व्यग्र असतात. 

विमानतळावर फिरताना एका गेटवर  एकीचे विमान अगदी थोडक्याकरता चुकले, तिने तिथल्या माणसाला खूप विनवले, पण तो म्हणाला, आता विमानाचा विमानतळावरचा संपर्क तुटला आहे. मी काहीही करू शकत नाही. दुसरीकडे  सर्व प्रवासी विमानात बसले होते पण विमानचालक गायब होता, शेवटी माईकवरून त्याचे नाव २-३ वेळा पुकारण्यात आले.

इकडे तिकडे फिरल्यावर बरीच भूक लागली म्हणून विमानतळावरच्या उपहारगृहात शिरलो. तिथे एक मद्रासी दिसला. त्याला पाहिल्यावर असे वाटले की आत्ता इथे गरम गरम इडली सांबार मिळाले तर किती छान होईल! उपहारगृहात पण विमानचालक त्यांच्या गणवेशात बसून त्यांचे जेवण घेत गप्पा मारताना दिसले.

फ्राईड राईस खाऊन घेतल्यावर परत एकदा प्राध्यापकांना दूरध्वनी करून आन्सरिंग मशीनवर निरोप ठेवला की " आम्ही शिकागोवरून निघालो आहोत, दोन तासात पोहोचू" ८ ला निघणारे विमान ९ वाजता गेटवर लागले. विमानात बसल्यावर पण विमान लवकर उडेना. विमानातील छोट्या खिडकीतून बाहेर पाहिले तर एकापाठोपाठ एक अशी विमाने लागली होती. धावपट्टीवरून हळूहळू विमान सरकत होते. विमानांचा वाहतुक मुरंबा झालेला पाहून खूप आश्चर्य वाटले. पाऊस व जोराचा वारा असल्याने विमाने उड्डाणाकरता हळूहळू सोडली जात होती. डेंटनच्या घरातील साफसफाई करण्याने व सामानाची बांधाबांध करण्याने आधीच जीव मेटाकुटीला आला होता, त्यातून हा दीर्घकाळ प्रवास!! पण काय करता?

शेवटी  एकदा पंखातील सर्व बळ एकवटून घेतली उडी आकाशात आमच्या विमानाने. थोड्याचवेळात हवाईसुंदरीने शीतपेय आणून दिले, त्यामुळे थोडे बरे वाटले. खिडकीतून खाली पाहिले तर एकदम नयनरम्य दृश्य दृष्टीस पडले. आकाशात जणू काही पिवळ्या रंगांच्या माळा पसरल्या आहेत. हवामान चांगले नसल्याने विमानाचा वेग कमी होता. रात्री सुमारे १२ ला आम्ही ग्रीनवील साऊथ कॅरोलिना विमानतळावर पोहोचलो. सरकत्या जिन्यावरून खाली उतरताच प्राध्यापकांना हस्तांदोलन केले. आमची छायाचित्रे त्यांना आधीच पाठवल्याने आम्हाला त्यांनी लगेचच ओळखले.

तिकडे प्राध्यापकांचाही थोडा गोंधळ उडाला होता. आन्सरिंग मशीनवर ठेवलेले ४-५ निरोप न ऐकताच ते आम्हाला दुपारी ३ ला ग्रीनवील विमानतळावर न्यायला आले होते. घरी परत गेल्यावर निरोप ऐकले व रात्री परत १२ ला आम्हाला घ्यायला आले. डेंटन ते ग्रीनवील साधारण १००० मैलाचा प्रवास. तीन तासाची थेट फ्लाईट बुक केली होती. पण या गोंधळामुळे  सकाळी ९ वाजता निघून तब्बल १५ तासांनी ग्रीनवीलला पोहोचलो.

ग्रीनवील ते क्लेम्सनचा तासभराचा प्रवास रात्री दिसणाऱ्या घनदाट झाडांनी सुखावून गेला. विनायक प्राध्यापकांशी बोलत होता. मी मात्र डोळे मिटून दिवसभर झालेल्या गोंधळाची उजळणी करत होते.

हे आमचे अमेरिकेतील येथे आल्यापासून वर्षाच्या आतले पहिले स्थलांतर. दुसऱ्या स्थलांतरात  A to Z सर्व सामान ups तर्फे पाठवले. फक्त आमचे पिटुकले दूरदर्शन यंत्र व संगणक आमच्याबरोबरच आमच्या कारमधे. अर्थात दुसरे स्थलांतर कारने जाण्याच्या टप्यात होते.

रोहिणी गोरे

Post to Feedखूप छान
वा!
हेच
वाहतुक मुरंबा !!
मस्त
निवेदनशैली चांगली आहे पण
मस्त
वर्णन आवडले.
चांगले वर्णन...
आभार

Typing help hide