रुद्र मल्हार

झपाटलेले कभिन्न आभाळ सांजवेळी
तशात होत्या पिशाचलेल्या दिशा दहाही
उरास बडवीत गडगडे ढग जराजर्जरा
कडाडणाऱ्या विजेस धरणी थिजून पाही
करीत सर्वेश्वरापरी थेंब थेंब तांडव
समीप विध्वंस ठाकल्याची नृशंस ग्वाही
समुद्रपृष्ठी छड्या उमटतात पावसाच्या
करीत लाटा किनारपट्टीवरी चढाई
कवेत घेई वसुंधरेला अधीर वादळ
फिरून माती निमूट त्याचा प्रमाद साही
फिरून आला ऋतू धरेच्या समर्पणाचा
पतिव्रतेचा टिळा कपाळी उगाच नाही