एक वात्रटणाचा किस्सा

मी विद्यापीठामधे शिकत असतानाची गोष्ट आहे. तेंव्हा आताच्या सारखे मेसेंजर्स/चॅट नव्ह्ते. अहो मेसेंजर्स काय तर तेंव्हा आमच्या लॅबमधे इंटरनेट पण नव्हते. त्यामुळे लॅबमधे एक्मेकाशी चाट करता येत नसे. ही अडचण सोडविण्यासाठी मग मी स्वत:च एक साधे सॉफ्टवेअर डेव्हलप केले ज्याने लॅन वरील दोन संगणकांमध्ये चाट सारखे संभाषण करता येऊ शकत होते. आता ह्या सॉफ्टवेअर विषयी सर्वाना सांगण्यापुर्वी मला एक गम्मत करायची सुचली. त्यानुसार मी माझ्या महेश नावाच्या एका मित्राला पलिकडच्या एका संगणकावर बसविले आणि काही मुलांना बोलवून सांगितले की मी आर्टिफिशिअल इंटेलिजन्स (AI) वापरून हे सॉफ्टवेअर तयार केले आहे. तुम्ही काहीही प्रश्न विचारा, माझे सॉफ्टवेअर त्याचे उत्तर देईल. झाले! मुलानी प्रश्न विचारले आणि महेशने तिकडून उत्तरे दिली. अर्थात, त्यावेळी एआय बेस्ड असे दुसरे एक सॉफ्टवेअर आमच्या वर्गात फ़ार गाजत होते त्यामुळे माझे हे सॉफ्टवेअर पण तसेच काही असेल असे वाटल्याने कुणाला काही शंका पण आली नाही. सर्वाना वाटत होते की माझे सॉफ्टवेअरच उत्तरे देत आहे.

मग माझ्या संगणकाभोवती रोज गर्दी होऊ लागली. वेगवेगळ्या प्रश्नांची उत्तरे हे "सॉफ्टवेअर" देत असे ते पाहून सर्वाना फार आश्चर्य वाटे. अर्थात, महेशचे सुद्धा ह्यात कौशल्य होते. तो अशा तर्‍हेने उत्तरे देत असे की कोणी मनुष्य उत्तरे देत आहे अशी शंका पण कुणाला येत नसे. मग काय बघता बघता ही बातमी सर्वत्र पसरली की अतुलने एआय बेस्ड सॉफ्टवेअर डेव्हलप केले असून त्या प्रसिद्ध सॉफ्टवेअर पेक्षा सुद्धा त्याचे सॉफ्टवेअर छान उत्तरे देते. त्यातल्या त्यात मुली तर फार इम्प्रेस झाल्या होत्या. आपल्या वर्गमित्राने असे सॉफ्टवेअर बनविले आहे ह्याचे त्याना कोण कौतुक. वा रे वा!

हां हां म्हणता ही बातमी आमच्या आदरणीय गुरुवर्यांपर्यंत पोहोचली. झाले. इकडे आमची हवा टाईट झाली. वाटले सराना/मॅडम ना खरे काय ते सांगावे. पण लगेचच आम्ही लढेल तेवढा किल्ला लढवायचे ठरविले.. आणि आमच्या AI च्या मॅडम च्या उपस्थितीत एक डेमो झाला. इतके इंटेलिजंट सॉफ्टवेअर याची देही याची डोळा पहायला मिळाल्याने मॅडम पण अगदी भाराऊन गेल्या. त्यानी वर्गात सर्वांसमोर कौतुक केले. मी पण सार्‍या वर्गाकडे बघून तोंड वेंगाडून निर्लज्जा सारखा हसलो. महेश हळूच तिरक्या नजरेने माझ्याकडे पाहत होता. पुढे तर मॅडमनी अहो कमालच केली. त्यानी चक्क डिपार्टमेंट च्या हेडना ही बातमी सांगितली.

मग HOD ना पण फसवणे बरोबर आहे का ह्यावर रात्रभर होस्टेल वर आम्ही चर्चा केली.. आणि दुसर्‍या दिवशी HOD च्या उपस्थितीत एक डेमो झाला!!

व्यक्तीची बुद्धिमता कशी असेल त्यानुसार महेश उत्तरे देत असे. कारण हुषार व्यक्तीला जास्तीत जास्त यांत्रिक उत्तरे द्यावी लागत तर जास्त विचार न करणार्‍याची थोडी गम्मत केली तरी चालत असे. एक दिवस एकदा वर्गातल्या एका ढ मुलाने सॉफ्टवेअर समोर उभे राहुन प्रश्न विचारला, व्हॉट इज माय नेम ऍण्ड हू ऍम आय? आणि तिकडून उत्त्तर आले युवर नेम इज अजय ऍण्ड यू आर इडियट. तो बिचारा जास्त विचार न करता एवढेसे तोंड करून निघून गेला. निर्लज्जपणाची हद्द झाली होती, तरीही आम्ही उजळ माथ्याने फिरत होतो.

मग एक दिवस आम्हीच ठरविले.. झाले इतके बस्स झाले. आणि समारंभपूर्वक एका मुलीला बोलविले. तिचे नाव उमा. ती आपल्या रश्मी नावाच्या मैत्रिणीला बरोबर घेवून आलि. तिने विचारले व्हॉट इज माय नेम. पलिकडून उत्तर आले युवर नेम इज उमा ऍण्ड रश्मी इज स्टॅण्डिंग़ बिहाइंड यू. ते वाचून उमाला जवळ जवळ चक्करच आली. "ऑऽऽऽ, ह्याला कसे कळले माझे नाव उमा आणि रश्मी माझ्या मागे उभी आहे ते?" मग आम्ही सांगितले. खरा प्रकार कळाल्यावर प्रत्येकाची तोंडे पाहण्यासारखी झाली होती. शेवटी मॅडम म्हणल्या जे काही केले आहे ते सुद्धा वाखाणण्याजोगे आहे. आणि अशा रीतीने शेवट गोड झाला!