गंध

दिवसाची ही तार जराशी सैलच झाली
सांज सुरंगी  मृदुल करांनी मग ओघळली
शिणल्या देही थकलेले मन होते रांगत
व्यथा वेदना कुरकुर सारी होते सांगत
वाट दिव्याची पहात हिरव्या ताटकळावे
नशिबाने मग निमूट सारे शापच घ्यावे
तोच कुठुनशी नाचत अल्लड झुळूक आली
गंध लाजरा मुठीत, हासू प्रसन्न गाली
गंध-मोगरा लावित गेला पंख मनाला
चंद्र अचानक स्वप्नप्रदेशी दिसू लागला
मार्ग मोकळा तोच जाहला, सुटली गर्दी
गर्दीमधला बिंदू इवला झाला मार्गी
मरगळ सगळी विसरुन गाणे स्फुरू लागले
मनात बिंदू आनंदाचे झरू लागले
क्षणात एका जणू मनाची तो-तो झाली
नितळ दर्पणी प्रतिमा कोणी हसरी आली
गंधाने त्या अशी कोणती जादू केली?
भकास नीरस वाटसुधा मग मजेत गेली!
 

--अदिती
(२५ जुलै २००७,
आषाढ शु. १०, शके १९२९)