हल्ले - चुकवण्यास अवघड

       काही हल्ले इतक्या अनपेक्षित दिशेतून आणि अचानक आपल्यावर होतात की त्यातून वाचावे कसे हा मोठाच प्रश्न माझ्यासारख्याला पडतो.म्हणजे असे पहा तुम्ही तुमच्या मित्राकडे अगदी त्याला पूर्वकल्पना देऊन गेलात पण अचानक त्याचे काही काम निघाल्यामुळे तुम्ही जाता  तेव्हां तो तुम्हाला बसायला सांगून आताच परत येतो असे सांगून शेजारीच त्याच्या छोट्या गोड मुलाला राजूला "अरे काकाशी गप्पा मार बरका " असे बजावून जातो. अशा वेळी मित्रपत्नी पण आपले कर्तव्य पार पडण्याच्या उद्देशाने तेथे येते आणि इथेच सगळा मामला बिघडतो.कारण आपल्या मनोरंजनासाठी राजूचा उपयोग करायचा तिने ठरवलेले असते ( किंवा राजूच्या मनोरंजनासाठी माझा ?) आपण पेपर वाचण्याचा बहाणा केला तरी ती राजूला अगदी पलीकडल्या फ्लॅटमधील व्यक्तीसही ऐकू जाईल अशा आवाजात विचारते," राजू तुझ नाव नाही का सांगणार काकाना ?"(किंवा तुज्य नाव नाही का छांगनाल काकाना लाजुड्या " अस राजूपेक्षाही बोबड्या भाषेत) अर्थात आपणही इतके काही माणुसघाणे नसतो की अशा आवाहनाकडे दुर्लक्ष्य करावे ( आणि असलोच तरी राजूमाता थोडीच बसलीय आपल्याला ते स्वातंत्र्य द्यायला।) अर्थातच आपल्याला खोटे खोटे का होईना मार्दव  सुरात आणून व तोंडावर उसने अवसान आणून विचारावच लागत," अरे वा ,बाळ कायरे नाव तुझ सांग बर "पण राजूच्या आईला अशा जुनाट पद्धतीने नाव विचारणे मुळीच मंजूर नसते.ती माझ्याकडे एकाद्या बावळट प्राण्याकडे पहावे तसा केविलवाणा दृष्टिक्षेप टाकून मला म्हणते "अहो तो इंग्लिश मीडियममध्ये जातो ना त्यामुळ त्याला तसेच विचाराव लागत," राजू, व्हॉट इज युवर नेम ?" खरतर दोन मिनिटापूर्वीच तिन मराठीतच नाव विचारलेल असत हे तिच्या निदर्शनाला आणावे अस मला वाटत पण आपला मान आपणच राखावा असे म्हणतात ना म्हणून मी गप्प बसणे पसंत करतो.
       राजू बाळ जर शहाण असेल आणि त्याचा मूड असेल तर ते आपले ,आपल्या वडिलांचे( त्याच्या आईला त्याचे आजोबा ,पणजोबा, खापरपणजोबा यांची नावे माहीत नसल्याबद्दल मी येथे देवाचे आभार मानतो) नाव ,आडनाव वगैरे माहिती पटापट सांगून मोकळा होतो व आग्र्याहून सुटका झाल्याचा शिवरायाना जेवढा आनंद ज्गाला नसेल तेवढ्या आनंदाने मी त्याच्या पाठीवर शाबासकीची ( आणि सुटकेची पण ) थाप मारतो.पण काही राजूमंडळी अशी बिलंदर असतात की शत्रूच्या ताब्यात सापडलेला गुप्त हेरसुद्धा आपली माहिती शत्रूस मिळू नये म्हणून जेवढी प्रयत्नांची पराकाष्ठा करणार नाही तेवढी ती करतात; ‌सामदामाची कसलीच मात्रा त्यांच्यावर चालत नाही हे पाहून आता आपल्यावरचे संकट टळले या आनंदात मला त्याचे फारच कौतुक वाटते व मी " राहू द्याहो,मी पुढच्या वेळी येईन तेव्हा सांगेल तो होय की नाही राजू?" ( या वेळी पुढच्या वेळी न येण्याची प्रतिज्ञा मी करतो) अस म्हणण्याचा प्रयत्न करतो,पण राजूची आई (खरोखरच)राजूचे बारसे जेवलेली असते (ती माझाही बारस जेवली होती की काय अशी शंका मला येते) त्यामुळे  या मुलाच्या तोंडून नाव वदवले नाही तर तो आपलाच पराभव आहे असे तिला वाटत असते.
        पण ही नाव न सांगणारी मुल बरेच वेळा परवडतात कारण कसेबसे त्याच्या तोंडून नाव वदवण्यात यशस्वी झाल्यावर ती बिचारी आई थकून शो बंद करते .उलट मूल जर स्मार्ट असेल तर मात्र केवळ नावावर आपली सुटका न होता त्यानंतर आपल्याला  ए ,बी . सी, डी, संडे मंडे चैत्र वैशाख,-- जानेवारी फेब्रुवारी ---एक, दोन , तीन , वन , टू, थ्री ,  एवढे सगळे मला ऐकून घ्यावे लागते आणि तेसुद्धा त्या पोरानच या सगळ्या गोष्टींचा शोध लावला आहे असा भाव मुद्रेवर आणून !
          कधी कधी (दुर्दैवाने) हे पोरग चित्रकार आहे असा त्याच्या आईचा गैरसमज झालेला असतो.मग एकदम राजूची आई पवित्रा बदलून कागद पेन्सिल त्याच्या हातात खुपसते व " आता आमचा लाजू चित्ल कालतो बलका " अस जाहीर करते अशा वेळी खरोखर राजूच चित्र काढणार असेल तर ठीक कारण तो निदान चित्र काढण्यापूर्वी "आता मी घोला कालतो आँ " अशी घोषणा करून चित्र ओळखण्याच्या कठिण प्रसंगातून माझी सुटका करतो,पण कधीकधी राजूचा हात हातात धरून राजूची आईच चित्र काढते व ते चित्र मला दाखवून ," आता काका सांगा बर राजून काय काढल ते ?" ही पृच्छा करून माझी परिस्थिती इकड आड तिकडे विहीर अशी करून टाकते.कारण स्पष्ट ओळखत नाही म्हणावे तर मी बावळट ठरतो व ओळखायला जाऊन भलतच सांगितल तर राजूची आई मीच राजू असल्याच्या आविर्भावात माझ्याकडे खाऊ की गिळू असा दृष्टिक्षेप टाकते. एकदा राजून ( म्हणजे त्याच्या आईने) काढलेल्या घोड्यास गाय म्हणण्याचे पातक माझ्या हातून घडले .त्यावर अविंधाच्या हातून गाय मारण्याचे पातक झाल्यावर शिवरायानी त्याचा नि: पात करावा तसा राजूची आई आता माझा करणार की काय अशी भीती मला पडली आणि माझ्या मित्राची त्याच्या प्रेयसीनेसुद्धा ज्या उत्कंठेने वाट पाहिली नसेल तितक्या उत्कंठेने मी वाट पाहू लागलो.माझ्या त्या घोर अपराधामुळे इतकावेळ केलेली खोटी स्तुती व परिश्रम यांच्या मोबदल्यात मिळणाऱ्या चहाला तर मला मुकावे लागलेच शिवाय मी अगदीच बिनडोक आहे अशी माझी प्रसिद्धी मित्रपत्नीच्या मैत्रिणींमध्ये झाली ते वेगळेच.
        एकाद्याच्या घरी लहान मुले नसली तर तुम्ही सुटलात असे समजू नका बरका,त्यावेळी त्यांच्याकडे नुकतेच कुणाचे लग्न वगैरे झाले नाहीना याची खात्री केलेली बरी असते.एकदा मी तसे न करण्याचा बावळटपणा केला आणि  एक बाहेरून अतिशय सुदर दिसणारी ( पण अंतरंग मात्र काळेकुट्ट असणारी) चीज हातात घेऊन वहिनींचे आगमन झाले आणि त्यानी केलेल्या उद्घोषणेमुळे पांडवांच्या शंखध्वनीमुळे कौरवसेनेची जी अवस्था झाली तीच माझी झाली कारण ती वस्तु अतिशय पेमळपणे माझ्या हातात देत वहिनी म्हणाल्या  " बरका भावजी ,हा आमच्या मंदावन्संच्या लग्नाचा अल्बम !".आता वहिनीना जितका वेळ असेल त्यानुसार मला चित्रप्रदर्शनासह त्यांच त्यावरील भाष्य ऐकण्याची मानसिक तयारी करावी लागली
" बरका भावजी ,हा होमाच्या वेळचा फोटो"वहिनीनी सुरवात केली अशावेळी तो अल्बम आणि भाष्यकार दोघानाही होमात का टाकू नये असा विचार मनात तरळतो.
" आणि हा सासरी जाण्याच्या कल्पनेन दु: खी झालेल्या मंदावन्संचा चेहरा !  ते पहा त्यांच्या डोळ्यातून ओघळणाऱ्या अश्रूंचे मोती." इकडे वहिनींच्या बोलण्यात काव्यात्मकता डोकावू लागते आणि त्या आता ' जा मुली जा' असं गाण म्हंआयला सुरवात करतात की काय या कल्पनेने माझ्या डोळ्यातून अश्रू डोकावू लागतात.त्यामुळे गैरसमज होऊन " हे काय भावजी , तुम्ही काय लावून घेताय मनाला एवढ ?" अस विचारून त्या माझी आणखीच पंचाईत करतात. खर तर मला मंदावन्संची चर्या कजाग वहिनीच्या तडाख्यातून सुटल्याच्या आनंदात जरा उजळल्यासारखीच वाटत होती. पण ही शंका व तिची कारणमीमांसा बोलून दाखवली असती तर माझ्या मित्राच्या घराचा दरवाजा माझ्यासाठी कायमचा बंद होण्याची शक्यता होती.त्यामुळे त्या बहाण्यान काही काळ डोळे बंद ठेवून काही फोटो बघण्याचे टाळणे एवढेच माझ्या हातात असते.
      प्रत्यक्षात फोटो पाहिला असो वा नसो तरी तो पाहिल्याची वहिनींची खात्री पटावी म्हणून प्रत्येक फोटोवर वा, सुंदर, फारच छान असे अभिप्राय देणे माझ्यावर बंधनकारक असते, नाहीतर अल्बमचे पुढले पान उलटलेच जात नाही.त्या गडबडीत शेवटच्या पानावर अल्बम संपल्याच्या  आनंदात " वा फारच आनंदाची गोष्ट " असा यावेळी मात्र खरोखरीचा अभिप्राय देताच वहिनी एकदम माझ्याकडे एकदम टवकारून बघू लागल्यावर आपली काहीतरी चूक झाल्याच मला जाणवल तेव्हा परत शेवटच्या फोटोकडे पाहिल्यावर माझी चूक माझ्या ध्यानात आली.कारण त्या फोटोत खरोखरच मंदावन्स दु: खावेगाने आईचा निरोप घेत होती. मग " एकदम कण्व आणि शकुंतलेची आठवण झाली" अशी चुकीची दुरुस्ती करावी लागली,पण त्या दुरुस्तीतही एक चूक झालीच होती पण ती वहिनींच्या लक्षात आलेली नसावी. किंवा त्यानी उदार मनाने माफ केली असावी.
        परदेश पर्यटन करून आलेल्या मिंत्रांचा एक वेगळाच वर्ग असतो.तेही तिकडे काढलेले फोटो, तिकडून आणलेल्या व त्यांच्या मते इकडे न मिळणाऱ्या वस्तु यांचे दर्शन घडवून आपल्या जन्माचे सार्थक करण्याच्या उच्च हेतूने आपली वाटच पहात असतात.
        माझ्या एका मित्राला कुष्ठमित्र  पुरस्काराचा मानकरी झाल्यामुळे त्याचे अभिनंदन करण्याकरता त्याच्या घरी जायला निघालो तेव्हा त्या मित्राकडे जाऊन आलेल्या माझ्या भावाने त्यासाठी निदान एक तासभर तरी काढून जावे असे सुचवले कारण आतापर्यंत मिळालेली  सगळी मानपत्रे,त्याचे अनेक मान्यवरांबरोबर काढलेले फोटो ,वृत्तपत्रातून आलेल्या त्याच्या कौतुकाच्या अभिप्रायाची कात्रणे हे सर्व पहाण्यासाठी आणखी त्यावरील मित्राचे भाष्य ऐकण्यासाठी किमान एक तास तरी काढून जावे लागते.
     थोडक्यात काय तर आजकाल कोणाला कोणी आपल्या घरी यावे असे वाटत नाही असे म्हणतात मात्र या मित्रांच्या बाबतीत हे खोटे ठरते उलट त्यांच्या  हल्ल्यातून वाचावे कसे हाच मला नेहमी पडणारा प्रश्न आहे.