मराठी चित्रपट: का नेहमीच केविलवाणे!

परवा टाईम्स ऑफ इंडिया या इंग्रजी दैनिकात कोल्हापूरमध्ये मराठी चित्रपटांची होत असलेली ससेहोलपट यावर एक बातमीवजा लेख आला होता. फक्त 'जाऊ तिथं खाऊ' हा एक मराठी चित्रपट वगळता सगळे मराठी चित्रपट तिथे साफ आपटले आहेत. याउलट दाक्षिणात्य चित्रपट, उदाहरणार्थ शिवाजी - द बॉस, जगडम वगैरे चित्रपट अफाट गर्दी खेचत आहेत आणि कितीतरी चित्रपटगृहांनी मराठी ऐवजी दाक्षिणात्य चित्रपटांना प्राधान्य देण्यास सुरुवात केली आहे. कारण सरळ आहे. चित्रपटगृहचालकांना ज्यात जास्त फायदा आहे तेच चित्रपट ते दाखविणार. एकेकाळी मराठी चित्रपटसृष्टीची पंढरी समजली जाणारी कोल्हापूर नगरी आता आपल्याच चित्रपटांकडे पाठ फिरवू लागली आहे. जयप्रभा स्टुडिओज, भालजी पेंढारकर, सूर्यकांत मांढरे, चंद्रकांत मांढरे अशी दिग्गज नावे ज्या भूमीशी जोडली गेली आहेत, एकेकाळी जी भूमी मराठी चित्रपटांचा श्वास होती तिथेच मायमराठीची उपेक्षा होत आहे. मराठी चित्रपटसृष्टीसाठी याहून लाजिरवाणी गोष्ट ती काय असावी? निर्माते आणि दिग्दर्शक सांगतात की मराठी चित्रपटांना चित्रपटगृहे मिळत नाहीत; मराठी माणूस चित्रपटगृहात जाऊन मराठी चित्रपट बघत नाही; मराठी चित्रपटाचे वितरण खूप त्रासदायक असते वगैरे वगैरे... अशी ओरड मी लहान असल्यापासून ऐकत आलो आहे.

ही कारणे खरी आहेत? जरा खोलात विचार केला तर ही कारणे तकलादू आहेत. आपले निर्माते आणि दिग्दर्शक कुठल्या प्रकारचा चित्रपट काढत आहेत हे ही बघितले पाहिजे. 'काय द्याचं बोला', 'बिनधास्त', 'जाऊ तिथं खाऊ', 'यंदा कर्तव्य आहे' हे चित्रपट यशस्वी झालेत कारण त्यात भरपूर मनोरंजन होते. प्रेक्षकांना दोन घटका बाहेरचे जग विसरायला लावणारे असे हे मनोरंजन होते. मी स्वतः 'काय द्याचं बोला' हा चित्रपट सिटी प्राईड मध्ये तीन वेळा बघितला आणि खूप चांगला वाटला म्हणून माझ्या आई-वडिलांना देखील घेऊन गेलो. मी 'बघ हात दाखवून' हा ही चित्रपट दोन वेळा बघितला कारण त्यात मनोरंजन ठासून भरले होते. आता एकदा बाकीच्या चित्रपटांकडे नजर टाका. 'आनंदाचे झाड', 'सावली', 'नितळ', 'आम्ही असू लाडके', 'रेस्टॉरंट', 'एव्हढंसं आभाळ'... हे चित्रपट कोण पैसे खर्चून चित्रपटगृहात बघायला जाईल?? आपले दिग्दर्शक आशयगर्भ, वेगळा वगैरे असा चित्रपट बनविल्याचा दावा करतात पण तसे करताना ते प्रेक्षकांचा विचार करतात का? माझ्या गावाकडे कुणीही 'नितळ', 'सावली' या चित्रपटांची नावे ही ऐकली नाहीत. केवळ पुण्या-मुंबईचे मूठभर प्रेक्षक चित्रपटाचं आर्थिक गणित सोडवू शकत नाहीत. केवळ पारितोषिकांसाठी आणि पुरस्कारांसाठी जर चित्रपट बनवायचे असतील तर लोकाश्रयाला आणि चित्रपटीय समृद्धीला मुकावे लागेल हे सत्य या निर्मात्यांच्या आणि दिग्दर्शकांच्या लक्षात कसे येत नाही. आज कोल्हापूरचे लोकं दाक्षिणात्य चित्रपटांकडे का वळत आहेत? कारण त्यांना त्यात भरपूर मनोरंजन मिळत आहे. दोन घटका मस्त गाणी, संगीत, विलोभनीय दृश्ये, डोळ्याचे पारणे फेडणारी मारामारीची दृश्ये, सुंदर नायिका, दिलखेचक नृत्ये, दमदार नायक आणि त्यांचे दमदार संवाद... हे सगळे त्यांना दाक्षिणात्य चित्रपटांमध्ये मुबलक प्रमाणात मिळत आहे तर मग ते प्रेक्षक कशासाठी 'नितळ' आणि 'सावली' सारखे आशयगर्भ चित्रपट बघून मेंदूला विकतचा वात आणतील?? अगदी सरळ गणित आहे. मनोरंजन द्या; प्रेक्षक येतील; जसे ते 'काय द्याचं बोला' किंवा 'बिनधास्त' किंवा 'धूमधडाका' किंवा 'अशी ही बनवाबनवी' किंवा 'माझा पती करोडपती' ला आले. माझ्या मते उलट असे भरपूर मनोरंजन करणारा मसालेदार चित्रपट बनवणं हे सगळ्यात कठीण काम आहे. सगळा मसाला योग्य प्रमाणात घालून मस्त चटपटीत चित्रपट सादर करणं हे येरागबाळ्याचं काम नोहे! एका चित्रपटाच्या पटकथेमध्ये वेगवेगळ्या पद्धतीच्या रसांचा समावेश अत्यंत हुशारीने करून त्यातून एकसंध असा मनोरंजनात्मक चित्रपट काढणे इथे दिग्दर्शकाचे आणि लेखकाचे खरे कसब आहे. १०-१० मिनिटे एक-एक रडके आणि गंभीर दृश्य दाखवून उगाच त्याला आशयगर्भ, दर्जेदार चित्रपट म्हणून दोन-पाच हजाराची एक-दोन थातूर-मातूर बक्षिसे पटकावणे आणि नंतर प्रेक्षक चित्रपटगृहात येऊन मराठी चित्रपट बघत नाहीत किंवा मराठी चित्रपटांना चित्रपटगृहे मिळत नाहीत असे म्हणून गळे काढणे आणि काहीतरी अर्थहीन आणि दळभद्री चर्चासत्रे घडवून आणणे यातून मराठी चित्रपटांची साडेसाती कशी संपणार आहे हे त्या जगंनियंत्यालाच  ठाऊक!!

एक ठराविक काळ दर्जा, आशय, वेगळेपण, स्वत्व, चौर्य या गोष्टी बाजूला ठेवून मराठी चित्रपट आर्थिकदृष्ट्या आधी समृद्ध तर होऊ द्या; दाक्षिणात्य किंवा हिंदी चित्रपटांसारखी चमक तर त्यात येऊ द्या; मराठी चित्रपटांचा आर्थिक व्यवहार दमड्या-कवड्यांपासून कोटींच्या घरात तर जाऊ द्या; राष्ट्रीय आणि आंतरराष्ट्रीय स्तरावर मराठी चित्रपटांचा दबदबा तर निर्माण होऊ द्या; मग एकदा सगळे स्थिरस्थावर झाल्यावर तुम्ही खुशाल काढा 'एक होती वादी', 'उत्तरायण' आणि 'दहावी फ'! 'शिवाजी-द बॉस' बघा. २८०० प्रिंटस जगभर प्रदर्शित झाल्यात; २५ भाषांमध्ये तो डब झाला; ८० कोटींचे त्याचे बजेट होते. का नाही मराठीला असे दिवस आणण्याचे स्वप्न आपले निर्माते-दिग्दर्शक बघत? का त्या थातूर-मातूर पारितोषिकांसाठी हे लोकं 'पैलतीर', 'गोजिरी' सारखे चित्रपट काढत बसतात? कोण बघायला जाणार आहे? माझी बायको मला म्हणाली की 'नितळ' खूप चांगला सिनेमा आहे; आपण बघायला जाऊ. मी म्हटलं 'मुक्काम पोस्ट लंडन' म्हणत असशील तर मी येतो पण नितळ-फितळ बघायला मी येणार नाही? कशासाठी जाऊ मी? मी तिला सांगितलं की तो जरा 'आशयगर्भ' चित्रपट आहे; जरा 'वेगळा' चित्रपट आहे; तुला 'काय द्याचं बोला' एवढा आवडला होता; असला 'आशयगर्भ' चित्रपट तुला आवडणार आहे का? शिवाय त्यावर २५० रुपये तिकिटाचे, ५ रुपये पार्किंगचे, ५० रुपये मधल्या खाण्याचे आणि २० रुपये पेट्रोलचे असे दणदणीत पाकीट रिकामे होणार आहे; एवढे करूनही घटकाभर मनोरंजन मिळेल याची गॅरंटी नाही; मला उद्या पुन्हा कार्यालयात जाऊन बराच वेळ न खाता पिता काथ्याकूट करावयाचा आहे, उगीच कशासाठी मी नाही तो किडा मेंदूत घेऊन रोजचे काम आणखी अवघड करून घेऊ? बरं, आज नाही उद्या टीव्हीवर येणारच आहे तो; तेव्हा बघू ते निखळ... सॉरी नितळ मनोरंजन! तिला पटले. पटणारच. कितीतरी मराठी तरुणांनी 'शिवाजी-द बॉस' पाहिला. अगदी गट आरक्षण करून मित्र, सहकारी अशा गटा-गटाने पाहिला. कुठल्या मराठी चित्रपटांच्या बाबतीत असे घडते? हा साधा विचार हे निर्माते-दिग्दर्शक नाही करू शकत का? मग उगीच चित्रपटगृहचालकांच्या आणि प्रेक्षकांच्या नावाने बोटे मोडण्यात काय हशील??

मला माहिती आहे की 'काय द्याचं बोला' हा एका इंग्रजी चित्रपटाची (माय कझिन विली की असेच काहीतरी नाव होते त्याचे) सही-सही नक्कल होता. असेल. नेवासा, शिरुर, भुसावळ, जळगाव, इस्लामपूर, फलटण, यवतमाळ, बुलडाणा, लोणंद, बीड, उस्मानाबाद, पावस, अजनी, देगलूर, कराड, जत, सटाणा, अमळनेर या व अशा हजारो गावातल्या लोकांना त्याच्याशी काहीही घेणे-देणे नाही. आम्हाला त्यात मनोरंजन मिळत आहे आणि आम्हाला तो आवडला आहे एवढाच काय तो चित्रपटांचा प्रेक्षकांशी संबंध! हिंदी चित्रपटांसारखी "केवळ मल्टीप्लेक्ससाठीचा चित्रपटही आम्हाला धोधो पैसा कमावून देतो" अशी ऐट मराठीला परवडणारी नाही. मराठी चित्रपटांना मायबाप प्रेक्षकांचा आणि तोही अगदी खेड्या-पाड्यातील प्रेक्षकांचा, पिटातल्या प्रेक्षकांचा भक्कम आधार असल्याशिवाय ऊर्जितावस्था येणे अशक्य आहे. अगदी हिंदी चित्रपटाला सुद्धा मासेस शिवाय पर्याय नाही हे २००७ च्या चित्रपटांच्या व्यवसायाने आणि 'पार्टनर' सारख्या अतिभिकार चित्रपटाच्या दणदणीत यशाने सिद्ध झाले आहे. दाक्षिणात्य चित्रपट निर्माते आणि दिग्दर्शक हुशार असतात. त्यांना माहीत आहे की जर सामन्यातला सामान्य प्रेक्षक जर खूश झाला तर चित्रपटाने जबरदस्त व्यवसाय केलाच म्हणून समजा. नेमकं हे सत्य आपल्या मराठीतल्या 'आशयगर्भ' चित्रपटांच्या निर्मितीमध्ये गुंतलेल्या लोकांच्या पचनी पडत नाही हे दुर्दैवच!

मला आठवते माझ्या लहानपणी 'धूमधडाका', 'दे दणादण', 'थरथराट', 'अशी ही बनवाबनवी', 'माझा पती करोडपती', 'भुताचा भाऊ', 'गंमत जम्मत' हे व असे बरेच मराठी चित्रपट भुसावळ-जळगांच्या चित्रपटगृहांमध्ये लागायचे आणि तुफान गर्दी खेचायचे. आम्ही ही अगदी आवडीने बघायचो. तेव्हा हिंदी चित्रपटांची स्पर्धा नव्हती? मान्य आहे की तेव्हा उपग्रह वाहिन्यांची इतकी भाऊगर्दी नव्हती पण मग ती सगळ्याच भाषांतल्या चित्रपटांसाठी एक स्पर्धा आहे; केवळ मराठी चित्रपटांसाठी नाही! आता घोडं अडलं कुठे? घोडं उगीच स्वतःला जास्त शहाणं आणि अभिजात (अरे, हा शब्द राहूनच गेला आधीच्या यादीमध्ये, क्षमस्व!) दर्जाचं समजायला लागलं आहे. शेवटी चित्रपट हा एक व्यवसाय आहे. कला, प्रबोधन आणि व्यवसाय यांची देखील उत्तम सांगड घालता येते हे राजाभाऊ परांजपे, भालजी पेंढारकर, राजदत्त, दत्ता केशव, कमलाकर तोरणे, दिनकर द. पाटील, अनंत माने, व्ही. शांताराम, प्रभात सिनेमा यांनी यशस्वीपणे दाखवून दिले आहे. उगीच अभिजात कलाकृती, दर्जेदार कलाकृती, आशयगर्भ कलाकृती असल्या फुसक्या गोष्टींचा जास्त बाऊ करण्यात काही अर्थ नाही.

चांगल्या धमाकेदार कथा निवडा, त्यात करमणुकीचा मसाला ठासून भरा (यात काहीही वाईट नाही. उलट यात कौशल्य पणाला लागते. लाखो लोकांच्या पसंतीला उतरायचं म्हणजे 'गोजिरी'वाणी मेहनत नाही!) कला, दर्जा, आणि अफलातून कथाकथनकौशल्य यांची छान एकसंध बांधणी करा, चांगले उमदे, तगडे नायक, सुंदर नायिका निवडा, दमदार संवाद लिहा, जबरदस्त गाणी-नृत्ये टाका आणि मग प्रेक्षकांसमोर सादर करा. बघा, प्रेक्षक येतो की नाही चित्रपट बघायला! १० वर्षांनी आम्हालाही पाहू दे की मराठी चित्रपटाच्या ३००० प्रती वितरीत झाल्या; लोकांनी चित्रपटाची रिळे थांबवून चित्रपटाची आरती केली; गाण्याला वन्स मोअर मिळून चित्रपटाची रिळे मागे फिरवावी लागली. मग बघा, कुळकर्णी, देशपांडे, जाधव, शिंदे, पाटील, कामठे आणि गाडगीळ, आपटे, कांबळे, रासने आणि लेले आणि नेने, गायकवाड, पवार, देशमुख आणि चव्हाण, जोशी, भोसले, माने आणि देसले... सगळे कसे जथ्या-जथ्याने येतात चित्रपटगृहाकडे; तुमचा चित्रपट डोक्यावर घ्यायला!!!

--समीर