रोमकहाणी

युरोपमध्ये 'रोम'ला एक वेगळेच महत्त्व आहे,आपल्या इतिहासाचे संगमरवरी अवशेष दिमाखाने जपत असलेलं रोम पाहण्यात एक वेगळीच मजा आहे,म्हणूनच या वेळी आईबाबा आल्यावर रोमला जायचंच हे आम्ही मनाशी अगदी ठरवूनच टाकले होते.मागच्या वेळी तेथे गेलो होतो ते इस्टरच्या सुटीत! श्रावणी सोमवारी त्र्यंबकेश्वरी किवा आषाढी,कार्तिकीला पंढरीला जशी गर्दी असते तशीच गर्दी त्या वेळी तिथे उसळली होती.त्यामुळे व्हॅटिकन सिटी शांतपणे पाहण्याचा या वेळी विचार होता.उन्हाळा असूनही लुफ्तहानसाच्या कृपेने आम्हाला स्वस्त तिकिटे मिळाली त्यामुळे १.५ तासात फ्रांकफुर्टहून रोममध्ये पोहोचलो.उन मी म्हणत होते.तापमापी ३५अंश सेंटीग्रेडच्या पुढे धावत होता.रोम विमानतळावरून 'रोमा टर्मिनी' या मुख्य स्थानकात यायला साधारण ३५ ते ४० मिनिटे लागतात. रोमन रोमला 'रोमा' म्हणतात!'लिओनार्डो एक्स्प्रेस' ही शटल गाडी विमानतळ ते रोमा टर्मिनी दर अर्ध्या तासाने धावते,त्या गाडीतून रोमा टर्मिनीला पोहोचलो आणि  रामराया जन्मला त्या टळटळीत दुपारच्या वेळी आम्ही आरक्षित केलेले हॉटेल शोधण्याचे दिव्य एकदाचे पार पाडले.पाचव्या मजल्यावरील दोन खोल्यांमध्ये आमचे सामान आणि देह टाकून विश्राम केला आणि बाहेर पडण्यासाठी थोड्या वेळाने उन्हं कलल्याचे आम्हीच ठरवून टाकले तेव्हा तापमापी ३७ अंश दाखवत होता. डोक्यावरच्या टोपीने आणि डोळ्यांवरच्या गॉगलने त्याला वाकुल्या दाखवून उन्हाळयाचे आणि उन्हाचे आपल्याला काय विशेष? असे एकमेकांशी बोलत आम्ही व्हॅटिकन सिटीत गेलो.समस्त कॅथलिक ख्रिश्चनांची काशी,पंढरी असलेली व्हॅटिकन सिटी जिचे वर्णन 'अ सिटी इन अ सिटी,अ नेशन विदिन नेशन' करतात तिथे गेलो. अतिभव्य दगडी पटांगणे,त्या दगडांत कोरलेल्या भव्य मूर्ती,संगमरवराचा सढळ वापर, छतापर्यंतचे कोरीव काम, जागोजागीची कारंजी,तिथे असलेली पिण्याच्या थंड पाण्याची सोय.. पाय दुखेपर्यंत पाहत होतो.
इटालिअन जेवणाचा आस्वाद घेऊन रात्री उशिरा हॉटेलवर आलो. हवेत गारवा कसा तो नव्हताच, पण खोलीच्या खिडक्या चांगल्या मोठ्ठ्या होत्या त्या उघड्या टाकून ,पंखा लावून झोपलो.पहाटे ४.३० /५ चा सुमार असेल,साखरझोपेची वेळ! दिनेशचा एकदम आरडाओरडा ऐकू आला मला.मला वाटले याला काहीतरी स्वप्न पडले आहे.दिनेश खिडकीत उभा राहून ओरडत होता.पाचव्या मजल्यावर खिडकी समोरचा पत्रा आणि तारा असतानाही सहाव्या मजल्यावरील गच्चीतून एकजण आत आला आणि आमची रकसॅक खिडकीतून चोरली आणि एक वेस्ट पाऊचही.. दिनेशने त्याला पकडण्याचा प्रयत्न केला पण पाचव्या मजल्याच्या खिडकीलगत असलेल्या एक दिड फुटी पत्र्यावरून त्याचा पाठलाग करणे अशक्यच होते! ब्रह्मांडच आठवले! त्या पोटपिशवीमध्ये माझा आणि आईचा पासपोर्ट,घराच्या किल्ल्या,इनशुरन्स कार्ड ,बँकेचे डेबिटकार्ड,उत्तम प्रतीचा गॉगल,पैसे सारेच होते! आमच्या जवळची दुसरी पोटपिशवी सुदैवाने चोरली गेली नाही त्यात दिनेश आणि बाबांचा पासपोर्ट,पैसे आणि अशाच सर्व महत्त्वाच्या वस्तू होत्या.तो वेस्ट पाऊच, रात्रीचे अंगावरचे कपडे आणि बूट सोडले तर सगळेच चोरी झाले होते.आम्ही आईबाबांना ही घटना सांगितली.त्यांच्या खोलीतल्या सामानाला धक्का लागला नव्हता‌. पण आम्हाला बसलेला हा धक्का मात्र मोठा होता.स्वागतकक्षात घडलेली घटना सांगितली,थंड प्रतिसाद! इथे हॉटेलात पोलिस येत नाहीत. या उत्तराने बोळवण!
आमचे पासपोर्ट चोरीला गेल्यामुळे पोलिसतक्रार करणे भागच होते.पोलिस स्टेशनचा पत्ताही त्या मॅनेजराने  धड सांगितला नाही.तसेच बाहेर पडलो.कोपऱ्यावर गस्तीची पोलिसगाडी होती.त्यातील पोलिसांना हे सांगितले.त्यांनी आम्हाला पोलिस स्टेशनला कसे जायचे ते सांगितले.त्यांचे इटालिअन ,आमचे इंग्लिश आणि जर्मन अशी झटापट होऊन एकदाचा आम्हाला रस्ता समजला. तिथल्या पोलिसाने सांगितले पासपोर्टचा मामला आहे,तुम्ही मुख्य स्टेशनात जा.त्याने दिलेला पत्ता घेऊन पुन्हा आम्ही त्याच कोपऱ्यावर! गस्तीच्या पोलिसाने तिथे कसे जायचे ते ही सांगितले.आता वणवण करण्यापेक्षा टॅक्सीने जाऊ असा विचार केला.पहाटे सहाच्या सुमाराला टॅक्सीवाल्याला पोलिस स्टेशनला जायचे आहे सांगितल्यावर ,"चोरी झाली? काय गेलं?पासपोर्ट?कोण होते ते? कोणती भाषा बोलत होते?"असे नको वाटणारे प्रश्न जणू तो स्वतःच पोलिस अधिकारी असल्याच्या थाटात विचारायला लागला.आणि शेवटी ते रोमन नसतील,इस्ट युरोपमधील कोणी असतील अशी टिपण्णी केली!एकदाचे त्या पोलिसस्टेशनात आलो,तिथल्या पोलिसाला झालेला प्रकार कथन केला,पुन्हा एकदा इटालियन,इंग्रजी झटापट झाली आणि त्यातून असे समजले की त्या पोलिस स्टेशनाची 'ड्युटी' संपली आहे,आम्हाला दुसऱ्या पोलिसस्टेशनात जायला लागेल.एका कागदाच्या चिटोऱ्यावर त्याने CLOSED असे लिहून दाखवले.आणि आमच्यावर उपकार म्हणून दुसऱ्या पोलिसस्टेशनाचा पत्ता दिला.झाले! पुन्हा आमची वरात दुसऱ्या पोलिसस्टेशनात निघाली.आपल्या पाकिटात आता किती पैसे आहेत याचा अंदाज घ्यायला हवाच होता,तरीही परत टॅक्सीने जाऊन वेळ आणि वणवण वाचवू हा विचार केला.
या पोलिसस्टेशनात शिरल्यावर तिथल्या पोलिसाने  इटालिअन मधून प्रश्नांची सरबत्ती सुरू केली.इथे कोणाला इंग्रजी समजत का बाबांनो? असा हताश प्रश्न दिनेशने विचारला तर टेचात उत्तर आलं.." नो!" बरं, जर्मन तरी येतं का? परत त्याच टेचात "नो..."आता मराठीतूनच सांगू काय झालं आहे ते..मी रडकुंडीला येत दिनेशला बोलले.
तेवढ्यात एक पोलिसिण उत्तम इंग्रजीत वदती झाली.तिला मग झालेला प्रकार सांगितला.तिने दुसऱ्या पोलिसिणीला तो इटालिअन मध्ये भाषांतरित केला.मग आम्हाला एका खोलीत बसायला सांगण्यात आले.थोड्या प्रतीक्षेनंतर दोन फॉर्म भरायला दिले.तुमचे नाव,पत्त्ता,काय काय चोरीला गेले इ. तपशील त्यात विचारला होता.थोडक्यात 'एफ आय  आर" नोंदवण्यासाठीचा फॉर्म होता तो.दोन प्रतीत तो भरून तिला दाखवून परत प्रतीक्षा! बऱ्याच वेळाने तिने आम्हाला आत बोलावले.तोपर्यंत ती 'सरकारी' फोनवर इटालिअन मध्ये हसत बोलत स्वतःचा जीव रमवत होती.आता आतील केबिन मध्ये गेलो,तिथे एका अधिकाऱ्याने परत आमच्याकडून हकिगत वदवून घेतली.आणि त्या दोन्ही प्रतींवर सही करून शिक्का मारला आणि एक प्रत आम्हाला दिली.या कागदावर पासपोर्ट नसतानाही तुम्ही फ्रांकफुर्ट ला जाऊ शकाल.एक मोठ्ठाच दिलासा मिळाला, पण तरीही प्रश्न अजून संपले नव्हते.पासपोर्ट नसेल तर बाकीची ठिकाणे कशी पहायची? आणि मुख्य, भारतात परत कसे जायचे? पोलिसबाई म्हणाली तुम्हाला परत पासपोर्ट काढावा लागेल.तो इटालीतील भारतीय वकिलातीत काढायचा की जर्मनीतल्या? हा आमच्यापुढचा मोठ्ठा प्रश्न तिने 'कुठेही काढा'या उत्तराने अगदीच उडवून लावला.मग तिच्याकडून रोममधील भारतीय वकिलातीचा पत्ता आणि फोन नं. घेतला.एक अडथळा तर पार पडला,पण पुढचा अडचणींचा डोंगर पार करताना किती पैसा,श्रम लागणार  आणि किती मनस्ताप होणार आहे याचा विचार मनात करत एकमेकांशी अक्षरही न बोलता चालायला सुरुवात केली‍.
"आईबाबांची ट्रिप वाया नको जायला.." एकदम दिनेश बोलायला लागला,"आज तर  रविवारच आहे. वकिलात बंदच असणार,तेव्हा आज ठरलं होतं तसं रोमन फोरम,कलोझिअम,वेनिस जिंकल्यावरचे स्मारक,मायकेल अँजेलोच्या पायऱ्या,स्पॅनिश स्टेप्स,ते सुप्रसिद्ध 'फोंटाना' अर्थात इच्छापूर्ती करणारे कारंजे... हे सगळे त्यांना दाखवूया,मग दुपारी वकिलातीचा पत्ता शोधू आणि उद्याचा दिवस तिथे पासपोर्ट संबंधीच्या हालचाली करू.."चालता चालता  दिनेश बोलत होता,मी ऐकत होते‍‍. जर्मनीतल्या भारतीय वकिलातीचा आमचा आणि आमच्या मित्रमंडळींचा अनुभव अजिबात चांगला नव्हता.सहकार्य तर मिळत नाहीच पण मनस्ताप,मेंदूला शीण आणि पैशाचा चुराडा होतो हे माहित होते.आणि इटलीतली तर  एंबसी शोधून काढण्यापासून तयारी होती.सगळाच अंधार, निराशा आणि असहाय्यता! त्याच अवस्थेत हॉटेलवर आलो तर स्वागतकक्षात आमची वाटच पाहत होता त्यांचा मॅनेजर..
ही घ्या तुमची पिशवी आणि वेस्ट पाऊच..पहा पासपोर्ट आणि बाकी सगळे कागदपत्र आहेत त्यात,तुमचे कपडेही आहेत.इथे बागेमध्ये हे टाकून पळाले चोरटे..आम्ही सारे उघडून तपासून पाहिले.पैसे आणि गॉगल सोडून सारे काही त्यात होते.एक सेंट सुद्धा पाकिटात नव्हता पण  पासपोर्ट,घराच्या किल्ल्या ,इनशुरन्स कार्डे इ‌. सर्व कागदपत्रे आमच्या रकसॅक आणि पाऊचसह परत मिळाली होती. आत्तापर्यंत आणलेले उसने अवसान आता गळाले आणि डोळ्यातून पाणी वहायला लागले.'त्याची' कृपा, आमचे सुदैव म्हणून चोरट्यांनी एवढी तरी इमानदारी दाखवली होती.हॉटेलवाले आणि चोरटे एकमेकांना सामिल असण्याची शक्यता आम्हा सर्वांनाच वाटत होती पण गेलेले पैसे तर मिळणार नव्हतेच..ते आता अक्कलखाती जमा! पुढचा पासपोर्टचा केवढा तरी मनस्ताप वाचला,आता ठरल्याप्रमाणे रोमदर्शन करायचे हे ठरवून आम्ही बाहेर पडलो.
अशी ही रोमची रामकहाणी!