...पोरी वयात आल्या !

`मनोगत`चे संचालक, प्रशासक, कायमस्वरूपी सदस्य, धावती भेट देणारे पाहुणे-सदस्य....सगळ्यांना सप्रेम नमस्कार...! 

               ........................................................


पोरी वयात आल्या...!

पोरी वयात आल्या, आल्या वयात पोरी !
घेऊन यौवनाची स्वप्ने मनात कोरी !

होत्या कळ्या कळ्या या आता फुलून आल्या
गंधात या स्वतःच्या बेहोश, धुंद झाल्या
या यौवना उद्याच्या, या कालच्या किशोरी....!

या लाजतात तेव्हा तेजाळतात तारे
या हासतात तेव्हा गंधाळतात वारे
आहेत या नभीच्या नाजूक चंद्रकोरी !

यांच्यामुळेच सारे वाटे हवेहवेसे...
यांच्यामुळे जुनेही होई नवेनवेसे...
जगण्यात प्राण येतो, येताच या समोरी !

ही हासरी जरा अन् ती लाजरीच थोडी
साऱ्याच विभ्रमांची न्यारी, मधाळ गोडी
ही मेघसावळी अन् ती चांदरंग गोरी !

                  ***

यांनी जपून आता वागायला नको का ?
स्वप्नातही जरासे जागायला नको का ?
...यांच्यापुढे उभी ही दुनिया नवी बिलोरी !

                  ***

...पोरी वयात आल्या...आल्या वयात पोरी !


- प्रदीप कुलकर्णी