लठ्ठंभारती

पॅंटची झिप् लावत तो वळला आणि हात धुवायला बेसिनसमोर जाऊन उभा राहिला. हात धुताना आरशात दिसणाऱ्या आपल्या चेहऱ्याकडे त्याचं लक्ष गेलं. फुगलेला, सुजल्यासारखा दिसणारा वैशिष्ट्यविहीन चेहरा. गोबरे गाल. हनुवटीचा पत्ता नाही. मान दिसत नाही. आपल्या खुरट्या, नीट न आलेल्या मिशांकडे पाहत त्यानं निराशेनं मान हलवली. ’थोडा बारीक झालो आणि ह्या मिशांशिवायही थोबाड बरं दिसेल अशी खात्री झाली की उडवून टाकीन.’ त्यानं कितव्यांदातरी स्वतःला सांगितलं. तो वळला, स्वतःला बाजूनं पाहण्यासाठी. भरपूर बाहेर आलेलं गरगरीत पोट खूपच विचित्र दिसत होतं. तो मोठ्यात मोठा टी-शर्ट अंगाला (अगदी दंडांवरपण)  घट्ट बसला होता. ’फक्त पोटच नाही, तर ही बायकांसारखी पुढे आलेली, पाऊल टाकताच हिंदकळणारी छातीसुद्धा किती विचित्र दिसतेय.’ त्याच्या मनात आलं. त्यानं पोट आत ओढून पाहिलं, मग त्याला याचातरी काय उपयोग आहे असं वाटलं. चष्मा काढून ठेऊन त्यानं तोंड धुतलं. टी-शर्ट ठीकठाक करत तो रेस्टरूमच्या बाहेर निघाला.

रेस्टरूमच्या बाहेर येताना त्यानं चष्मा पुसून डोळ्यांवर लावला. आणि समोर नजर जाताच त्याला रिया दिसली. तिनं त्याच्याकडे बघून एक ओळखीचं स्मित केलं आणि ती मुलींच्या रेस्टरूममध्ये गेली.

सोनूच्या पोटात तिला पाहूनच खोल खड्डा पडला. पटकन आत पळून जाऊन दरवाजा लावून घ्यावा आणि ती नजरेआड होईपर्यंत आतच लपून रहावं असं त्याला वाटलं. पण असलं काही न करता त्यानंसुद्धा हसण्याचा प्रयत्न केला.

रिया म्हणजे अगदी ’अवघड वळणे घेऊन फिरली तारूण्याची नक्षी’ अशी होती. आणि तिच्या खळखळून हसण्यात, तिच्या मोकळ्या वागण्याबोलण्यात, तिच्या आनंदी स्वभावात काहीतरी होतं. कोणालाही तिच्याकडे बेगुमानपणे आकर्षिणारं. तिच्यासाठी ’वळणावळणावर नेत्र पाजळून जागे’ असणाऱ्यांमध्ये सोनूसुद्धा होता. आणि आजचा दिवस विशेष होता, कारण आज तो तिला प्रपोज करणार होता. ’काय सोनूसाहेब! होईल न हिंमत?’ आपल्या जागेकडे जाताना त्यानं स्वतःला विचारलं. आणि मग त्याला वाटलं की हिंमत होवो वा नं होवो, आज तर हे ’काम’ करायचं आहे म्हणजे आहे.

*

आपल्या ’क्यूब’मध्ये वापस आल्यावर त्यानं संगणकाचं कुलुप उघडलं आणि तो आलेली पत्रं वाचायला लागला. सगळी वाचून झाल्यावर, त्यांच्यातल्या काहींना उत्तरं लिहून झाल्यावर नवीन विंडो उघडण्याआधी त्याचे हात आपोआप थांबले. काही क्षण तो तसाच संगणकाच्या पडद्याकडे बघत बसला. आणि मग, थरथरत्या हातांनी त्यानं रियाला पत्र लिहिलं. 

’कॉफी प्यायला येतेस का?’ इतकं लिहून त्यानं पत्र पाठवण्याचं बटन दाबलं आणि एक निःश्वास सोडला. ’पत्र तर पाठवलं. आता पुढचं पुढे.’ असा विचार करत त्यानं काम करायला घेतलं. ऑरकुट, याहू आणि मगलनेटच्या खिडक्यांची उघडझाप करत असताना त्याच्या पत्राचं उत्तर आलं. ’आत्ताच आलो आहोत ऑफिसमध्ये. :-) थोडावेळ काम कर, मग जाऊ. तुझ्या क्यूबमध्ये बोलवायला येईन.’

त्याच्या हृदयाची धडधड थोऽडी स्थिरावली. त्यानं कानाला हेडफोन लावले आणि गाणी चालू करून काम (एकदाचं) सुरू केलं. अर्ध्या-पाऊण तासानं रियानं मागून त्याच्या खांद्यावर हलकेच टक् टक् केलं आणि त्यानं एकदम दचकून मागे पाहिल्यावर ती हसू दाबत खुणेनंच ’चल’ म्हणाली. त्याच्या पोटात परत खड्डा पडला. हृदय जोरानं धडधडू लागलं. ’वेळ’ आली होती. टी-शर्ट पुढून मागून खाली ओढत, लटपटत्या पावलांनी तो तिच्यामागे निघाला.

कॉफीच्या यंत्रामधून दोघांनी कॉफी घेतली. तिनं कपमध्ये साखर टाकली, आणि त्यानं ’उगीच जास्त साखर खायला नको’ म्हणून शुगर फ्री. पण लगेच, मोह न आवरल्यानं बरणीत हात घालून त्यानं काही क्रीम बिस्किटंही उचलली.

एका कोपऱ्यातल्या टेबलशी दोघे जाऊन बसले. कॉफीचा एक घोट घेत रियानं समोरची दैनिकं चाळली.
’मूर्ख लोक आहेत.’ ती म्हणाली. ’कलामलाच दुसऱ्यांदा  राष्ट्रपती करायला हवं होतं. पण नाही. गोंधळ घालताहेत नुस्ता.’
’मूर्ती सुद्धा चांगला पर्याय होता.’
’ते आपण आय.टी. वाले म्हणतो टेडी.’ ती म्हणाली. एकदम तिला काहीतरी आठवलं आणि तो थोडं हसली. ’अमिताभ झाला असता तरी छान झालं असतं. भाषणं ऐकायला मजा आली असती. आणि ऐश्वर्याचं सासर असलं असतं - राष्ट्रपती भवन!’
तोही हसला आणि त्यानं टाईम्स उघडला.

समोरच्या अक्षरांवरून त्याचे डोळे नुसतेच फिरत होते. हृदयातली धडधड काही अजून निमाली नव्हती, पाय अजूनही कापत होते. त्याला खूप अस्वस्थ वाटत होतं. रिया समोर होती आणि तिची कॉफी संपत होती, वेळ झपझप निघून चालली होती. तो अजून काहीच बोलला नहता. शब्द बाहेर पडतच नव्हते, जीभ धजतच नव्हती.

’रिया...’ कसंबसं तो म्हणाला.
दैनिकातून मान काढून प्रश्नार्थक मुद्रेनं तिनं त्याच्याकडे पाहिलं. ’अं?’
आणि त्याचं सगळं अवसान गळालं. ’टेस्टप्लॅन तयार झाला का?’ त्यानं विचारलं.
’हां हो गया टेडी...’ खुर्चीवर रेलत ती म्हणाली. दोन्ही हात मागे करून तिनं आळस दिला. तसेच डोक्यामागे हात बांधत ती म्हणाली, ’कसा गेलाय हा आठवडा, विचारू नकोस. वेड्यासारखं काम केलंय मी. मुळात ज्याची टेस्टिंग करायची तेच नीट येत नसताना सगळा टेस्टप्लॅन लिहिलाय.’
’मॅनेजर काही म्हणत होता का? बुधवारी?’ सोनूनं प्रयत्नपूर्वक सहज आवाजात विचारलं.
’वही, हमेशाका रोना उसका...’ ती उत्तरली. आणि हसून म्हणाली, ’ग्राहक आपला देव आणि वेळा पाळणं आपलं काम आणि वगैरे वगैरे.’  
तो सुद्धा हसला. ’बरंय, की वीकएण्डला करायला काही ठेवलं नाहीयेस. नाहीतर यावं लागलं असतं, उद्या परवा.’
’तेच तर मलाही टाळायचं होतं. म्हणूनच इतकी मरमर केली. बघू...चांगला प्लॅन बनतोय उद्या साठी.’
’कसला प्लॅन?’ असं तो अगदी विचारणारच होता, तोच त्यालाच तो प्लॅन आठवला. तो काहीतरी बोलणार इतक्यात तिचा मोबाईल वाजला.
तिनं कोण कॉल करतंय ते पाहिलं आणि येणारा कॉल कट् केला. ’अभिनवचा होता.’ ती म्हणाली. ’नक्की मला शोधत असेल... आजच्या ’नाईट ट्रेक’ बद्दल असणार काहीतरी.’ 
बोलताबोलता ती उठली. ’मै चलती हूं. तू ये कॉफी संपवून. बाय् टेडी!’
आणि ती लगबगीनं कॅफेटेरियाच्या बाहेर निघून गेली.
आपल्याकडून कधीच हिंमत होणार नाही असं सोनूला वाटलं. त्यानं एव्हाना गार झालेली ती कॉफी संपवली आणि तोही जड पावलांनी क्यूबकडे निघाला.

*

कॅफेटेरियाच्या बाहेर येताच अभिनवची हाक त्याच्या कानी पडली. ’अबे सोनू!’ काय करत होतास इतका वेळ तिथे? सकाळी सकाळी काय सगळी बिस्किटं संपवलीस का?’ त्यानं ओरडून विचारलं.
अभिनवच्या बाजूलाच उभा असलेला प्रमोद जोरात हसला.
’फक्त तीन बिस्किटं खाल्ली आहेत मी!’ सोनूला ओरडून सांगावं वाटलं. आलेला राग गिळत त्यानंही विनोद आपल्याला विनोदीच वाटल्यासारखा हसरा चेहरा केला आणि तो त्याचा खुर्चीवर जाऊन बसला.
’सोनू!’ रियाची हाक ऐकून तो उभा झाला. ’आजच्या ट्रेकला येतोयेस नं?’ तिनं विचारलं.
’वो नहीं आयेगा रिया.’ रोहननं परस्पर उत्तर दिलं. ’सोनू आणि ट्रेकिंग? हल्दीरामचं दुकान कसं चालेल?’
सगळे हसले. रियाही.
सोनू खाली बसला. शरमिंदं, अपमानित वाटत असतानाही  ’दुर्लक्ष कर, दुर्लक्ष कर.’ असं त्यानं स्वत:ला सांगितलं. आजपर्यंत तो तेच तर करत आला होता.
संगणकाचं कुलूप काढून त्यानं पटापट चारपाच खिडक्या उघडल्या, कानांना लावण्यासाठी हेडफोन्स उचलले, आणि त्याला अभिनवच्या क्यूबमधून बोलण्याचे आवाज ऐकू आले. तो रियाला ट्रेकबद्दल काहीतरी सांगत होता बहुतेक.
अभिनव काहीतरी म्हणाला. मग रियाचं तेच वेडावणारं खळखळून हसणं ऐकू आलं आणि पाठोपाठ तिचे उद्गार, ’तू भी ना अभिनव!’ आणि मग अभिनवचं हास्य.

’चांगला आहे अभिनव.’ सोनूला एकदम वाटलं. ’उत्साही, आनंदी, तडतडा, आणि बारीक आहे मुख्य म्हणजे. रियाला त्याच्यात रस आहे यात काहीच नवल नाही. मी...मी हा असा. जाडच्याजाड, घुमा, ऑफिसमध्ये येऊन काम करून रूमला निघून जाणारा. कोणाला मी आवडण्याचं काय कारण?’
’बरं झालं मी तिला माझ्या मनातलं सांगितलं नाही. स्वभावानं मी कितीही चांगला असलो, अगदी ’हार्ट ऑफ गोल्ड’ वगैरे असलो तरी त्यामुळे तिनं बाकी सगळ्याकडे का दुर्लक्ष करावं?’ त्याच्या मनात आलं.
’टेडी म्हणते मला ती. टेडी बीयर. आय ऍम अ क्युट लिट्ल इनोसंट थिंग फॉर हर. मी टेडी नाही 'पुरूष' आहे हे तिच्या कधी डोक्यातच आलं नाहीये. खरंच, बरं झालं, मी तिला विचारलं नाही ते.
ती अभिनवला लखलाभ. तो डिझर्व करतो सगळं काही. माझी कशाचीच लायकी नाही. माझ्यासारख्याला ती का हो म्हणेल?'

त्यानं एक सुस्कारा सोडला. एका अजस्त्र पायानं आपल्याला चिरडून भुईसपाट करून टाकलं आहे असं काहीसं त्याला वाटलं. हरल्यासारखं. आणि त्याला हरल्यासारखं वाटलं होतं ते काही अभिनव ’जिंकत’ होता म्हणून नाही, तर आपल्यासारख्याला स्पर्धेत उतरण्याचा, लढण्याचा हक्कच नाही, आपली ती लायकीच नाही हे सत्य त्याला नव्यानं जाणवलं होतं म्हणून.

*

थोड्या वेळानं रिया तिथून निघून गेली आणि अभिनव सोनूच्या बाजूलाच असलेल्या प्रमोदच्या क्यूबमध्ये आला.
’अरे यार ये लडकी...’ सोनूला ऐकू आलं.
’वेडा झालोय यार मी! हा ट्रेक होऊन जाऊ दे, लगेच विचारतो तिला...’ अभिनव म्हणाला.
’अबे आत्ता विचार की! ट्रेक होईपर्यंत का थांबतो आहेस?’
’नको यार. भिती वाटते...तिनं ट्रेकिंग वगैरे भरपूर केलेलं असलं तरी, आपल्यासोबत पहिल्यांदाच येतेय ती. होऊन जाऊ दे हा ट्रेक. सकाळी सकाळी डोंगर उतरल्या उतरल्या विचारीन तिला....काय म्हणेल रे ती? हो म्हणेल ना?
’का काळजी करतोस बे इतकी? तुला नाही तर कोणाला हो म्हणेल?’ प्रमोद उत्तरला.

अभिनव काहीतरी म्हणत होता; पण सोनूला आता ते ऐकायचं नव्हतं. त्यानं हेडफोन्स् लाऊन गाणी चालू केली. पण तरीही त्याच्या मनात आलंच, ’रिया त्याला नक्की हो म्हणेल. आणि तो विचारणार आहेच तिला, ट्रेक संपल्यावर.’

आणि ह्या विचारासरशी त्याच्या मनात काहीतरी घडलं. त्याचं अपयश, आपली लायकीच नाही असं वाटणं, रियाचं अभिनवसोबत हसणं, हा नाईट ट्रेक, तिनं अभिनवनं बोलवल्यामुळे पहिल्यांदाच ऑफिसमधल्यांसोबत ट्रेकिंगला जाणं, आणि अभिनवचा तिला विचारण्याचा इरादा, तिनं हो म्हणण्याची जोरदार शक्यता हे सारं सारं त्याच्या मनात क्षणार्धात येऊन गेलं; कसंतरी हे सगळं एकमेकांत जोडल्या गेलं, मिसळल्या गेलं आणि त्यातून त्याला त्याच्याकरताचा अर्थ स्पष्ट दिसला.

आपला विचार बदलण्याच्या आत तो उठला आणि अभिनवकडे जाऊन म्हणाला, ’अभिनव, मी सुद्धा येतोय ट्रेकला.’

*

संगणकाच्या पडद्यावरची नजर न काढता अभिनव उपहासानं उद्गारला, ’तू!’ आणि एकदम ’खीक’ करून हसला.
’खरंच सांगतोय यार. हसतोस काय?’ त्यानं दुखावलेल्या आवाजात विचारलं.
अभिनवनं हातातलं काम संपवलं. सावकाश तो सोनूकडे वळला. ’ठीक आहे सोनू, नाही हसत. सिरिअसली बात करता हूं. हे बघ, आम्ही स्कंदगिरीला चाललो आहोत. आणि स्कंदगिरीचा ट्रेक काही सोपा नाहीये. मी तिथे जाऊन आलेल्यांचे ब्लॉग वाचलेत. अंतर खूप आहे. चढण अवघड, अगदी अंत पाहणारी आहे. आम्ही ट्रेकिंग रात्रीच्या अंधारात करणार आहोत. आणि तुला ट्रेकिंगचा काहीच अनुभव नाहीये. बघ, विचार कर, आणि ठरव काय ते.’  
त्यानं सेकंदभर विचार केला. 'नाही' म्हणावं असं त्याला वाटलं, पण त्याच वेळेस त्याला अभिनवच्या चेहऱ्यावरचं हास्य दिसलं. त्याचं उत्तर माहिती असल्याचं हास्य होतं ते. एकदम तो म्हणाला, ’केला विचार. मी येतोय.’
अभिनवला थोडं आश्चर्य वाटल्याचं त्याच्या नजरेतून सुटलं नाही. अभिनवनं खांदे उडवले. ’ठीक आहे, टेडी. निर्णय तुझा आहे शेवटी. मी तुला आत्ता लगेच एक पत्र पाठवतो. त्यात काय तयारी करावी लागेल ते सगळं लिहिलेलं आहे. रात्री दहा वाजता इथंच ऑफिसला ये. टी.टी. नं जाणार आहोत आपण.'
’आणि पैशांचं काय?’ सोनूनं विचारलं.
’खर्च काही फार होणार नाही. त्या पत्रात लिहिलेलं सामान तर तूच स्वत:करता आणायचं आहेस. तुझ्याकरताची स्लीपिंग बॅग मी सांगून ठेवीन. त्याचाकरता जे लागतील ते आणि टी.टी. चं भाडं. ते आपल्यात विभागलं जाईल. ट्रेक झाल्यावर वापस येताना आपण हिशोब करू.’

त्यानं मान डोलावली, आणि ’थॅंक्स्’ म्हणून तो जागेवर जाऊन बसला.
क्षणभर त्याला स्वत:ची भिती वाटली. हे नवीनच काहीतरी होतं. आपण असंही वागू शकतो हे त्याच्या गावीही नव्हतं. आठवड्याच्या बाकी पाच दिवसांप्रमाणे त्याचे शनिवार रविवार कसे जाणार हे ठरलेलं होतं. लॅपटॉपवर चित्रपट पाहत, सतत काहीन् काही खात, आरामात लोळत तो त्याच्या सुट्ट्या घालवायचा. जिम लावल्यावर एका आठवड्यापेक्षा जास्त तो तिथं कधी जाऊ शकला नव्हता. शारिरिक श्रम काळे की गोरे हेही तो विसरला होता. त्यानं मैदानी खेळ खेळून कैक वर्षं लोटली होती. त्याचं चालणं म्हणजे कोपऱ्यावरच्या दुकानापर्यंतचं. त्याचा व्यायाम म्हणजे (स्वतःचे) कपडे धुणं. 
गेले कित्येक महिने त्याच्या दिनक्रमात काहीच फरक पडलेला नव्हता. अधूनमधून त्याला त्याची गरज वाटली होती, नाही असं नाही. पण उठून काही करण्याचा उत्साह त्याला कधीच वाटलेला नव्हता.
’आणि आता आपण ह्या रियाच्या पायी त्या ट्रेकला जायचं कबूल करून बसलो आहोत.’ त्याच्या मनात आलं. ’अचानक, एकदम, आपल्याला काय शक्य आहे आणि काय नाही याचा बिल्कूल विचार न करता. सोनू, असला वेडेपणा तू कधीपासून करू लागलास? आणि काय साध्य होणार आहे, तू ट्रेकला जाऊन? अभिनव काय म्हणला ते ऐकलंस नं? तू पूर्ण स्कंदगिरी चढशील याची शक्यता जवळजवळ नाहीच. आणि जरी तू ते करून दाखवलंस, तरी काहीच बदलणार नाही.'
’मला नाही माहित मला एकदम का ट्रेकिंगला जावं वाटलं ते.’ त्याला उत्तर आलं. ’वाटलं इतकं खरं. आणि आता मी टाकलेलं पाऊल मागे घेऊ शकत नाही. असेही इतकं हसतात मला सगळे. आता जर मी अभिनवला 'मी येत नाहीये' असं सांगितलं तर त्यांना ते येणाऱ्या कितीतरी दिवसांसाठी पुरेल. आणि रिया...’
’हसू देत. रियाला सुद्धा हसू देत. काही बिघडत नाही. कसलेकसले डोंगर चढताना हृदय बंद पडून मरण्यापेक्षा ते कधीही परवडलं.’
’काही मरत नाही मी. बघू....अजून संध्याकाळ व्हायला भरपूर वेळ आहे. तोपर्यंत ठरवीन काय करायचं ते.’ त्यानं स्वतःला सांगितलं.

पण संध्याकाळ झाली तरी त्याचा काहीच निर्णय होऊ शकला नाही. ऑफिसच्या बाहेर पडताना त्यानं अभिनवचं पत्र छापून सोबत घेतलं, ’रूमला जाऊन ठरवू काय ते’ असा विचार करून. लिफ्टपाशी त्याला रिया भेटली.
’हाऽय टेडी!’ ती म्हणाली.
’हाय रिया!’ मजल्यांच्या अंकांकडे पाहत तो म्हणाला. नेहमीप्रमाणे दोन्ही लिफ्ट सोबत सरकत होत्या.
’ये लिफ्टस् भी ना!’ रिया उद्गारली. ’कोणी लिहिलंय यांचं लॉजिक, काय माहित.’
’बरंय आपण लिहिलं नाहीये ते. चालल्याच नसत्या नाहीतर.’ तो उत्तरला.
रिया हसली आणि तिनं विचारलं, ’अभिनव म्हणत होता की तू सुद्धा येतोयेस ट्रेकला?’
’हो.’ तो उत्तरला.
’हं...गुड फॉर यू.’ ती म्हणाली.
तो काहीतरी बोलणार होता तेवढयात लिफ्ट आली.
तळमजल्यावर लिफ्टच्या बाहेर पडताना ती म्हणाली, ’बाय टेडी. आना जरूर!’
ओझं वाढल्यासारखं वाटलं त्याला. रियानं ’आना जरूर’ असं म्हणल्यावर न जाण्याचं ठरवणं त्याच्याकरता अजून अवघड होऊन बसलं होतं.

*

घड्याळात आठ वाजलेले पाहून त्यानं लॅपटॉप बंद केला आणि एक सुस्कारा सोडत तो उठला. ’आता किती विचार करणार? जाऊ, होईल तितकं चढू... करून तर पाहू ट्रेकिंग.’ नमकीनचं रिकामं पाकीट कचरापेटीत टाकताना त्यानं विचार केला. ’आणि...रियासुद्धा म्हणली आहे, नक्की ये म्हणून.’

अभिनवनं पाठवलेलं पत्र आठवणीनं सोबत घेऊन त्यानं जवळचं सुपरमार्केट गाठलं. तिथे पत्रातल्या यादीवरून नजर फिरवताना त्याला ’वा! आज कॅडबरीज् खाताना अपराधी वाटायला नको!’ असं वाटून थोडी मौज वाटली.

त्या सुपरमार्केटमध्ये त्यानं यादीबरहुकुम सगळी खरेदी केली. भरपूर उजेड पाडणारी विजेरी, तिचे सेल्स, पाण्याच्या दोन लिटरच्या दोन बाटल्या, बिस्किटांचे पुडे, दहा-बारा कॅडबरीज् आणि इतर चॉकलेटस्, थंडी बाधू नये म्हणून एक मफलर, डासांनी जवळ फिरकू नये म्हणून ओडोमॉस, आणि जळवांपासून वाचायला म्हणून मीठ, व्हिनेगर, आणि सिगरेटस्.

तिथून बाहेर पडल्यावर त्यानं व्यवस्थित, भरपेट जेवण केलं, मग त्याच्या नेहमीच्या मिठाईच्या दुकानाशी थांबून गरमगरम जिलब्या खाल्ल्या, आणि मग रूमवर येऊन त्यानं कपडे बदलले, ’उंच दिसावं’ म्हणून घेतलेले वुडलॅंडस् चे शूज घातले.

नवीन काही करण्याची, अताची भिती त्याला वाटत होतीच, आणि आपल्याला हे ट्रेकिंग-बेकिंग जमणार नाही असंही वाटत होतं, काय होईल, सगळे काय म्हणतील, रिया काय म्हणेल ही काळजीही होतीच; पण त्याचबरोबर ’करून तर बघू ट्रेकिंग’ हे ठरवल्यामुळे त्याला थोडंथोडं छान, थोडंथोडं उत्तेजितही वाटू लागलं होतं.

*

दहाला यायची ठरलेली टी.टी. ऑफिसला पोचायला अकरा वाजले. दार उघडून सोनू आत शिरला, आणि सामूहिक निराशेच्या जोरदार आवाजांनी त्याचं स्वागत केलं.
’बच्चा लोग, निकालो पैसे!’ रिया विजयी स्वरात ओरडली.
मुकाट्यानं अभिनवनं शंभरची नोट काढली, आणि त्याच्या बाजूला बसलेल्या रियाला दिली. बाकीच्यांनीही त्याचं अनुकरण केलं.
कुठे बसावं ते तो बघत असताना टी.टी. सुरू झाली, आणि पाठीवरची बॅग काढत सोनू रियाच्या बाजूला, जायच्यायायच्या वाटेच्या दुसऱ्या बाजूस असलेल्या खुर्चीत बसला.
रियानं पैसे मोजले, ऐटीत पाकीट काढून त्यात ठेवले, आणि त्याच्याकडे वळून, हात पुढे करून ती म्हणाली, ’थॅंक्स् टेडी. आज तुझ्यामुळे बसल्या बसल्या आठशेची कमाई झाली.’
त्यानं तिचा हात हाती घेतला. त्या स्पर्शाची वीज त्याचा अंगागात क्षणभरासाठी दौडून गेली.
काही बोलायचं त्याला सुचलंच नाही. दोघांचे हात विलग झाले तशी तीच म्हणाली,’ अरे पूछ तो, काय झालं म्हणून.’
’काय झालं?’ त्यानं बावळटासारखं विचारलं.
रिया गोड हसली, आणि म्हणाली, ’यार टेडी, आम्ही पैज लावली होती. कोणालाच वाटत नव्हतं तू येशील असं. ह्या अभिनवची’ - तिनं अभिनवकडे हात केला. - ’तर खात्रीच झाली होती की तू काही फोन वगैरे नाही केलास म्हणजे नक्की डुम्मा मारलास अशी. फक्त मी म्हणत होते की टेडी आयेगा जरूर.’
म्हणजे सगळे तो नाही येणार असं म्हणत असताना एकट्या रियानं तो नक्की येईल असं म्हणून सगळ्यांशी पैज लावली होती तर. त्याला एकदम छान वाटलं.  आत एक नाजूक फूल फुलल्यासारखं. तो सुद्धा हसला.
रिया थोडी पुढे झुकली. ’राज की बात तो ये है की,’ ती म्हणाली, ’वाटलं तर मलाही नव्हतं, तू येशील असं. पण मी विचार केला, बेट लगानेमें हर्जही क्या है? देख, हरण्याचा काही प्रश्नच नव्हता; आणि जिंकले तर मस्तपैकी पैसे मिळणार होते!’
ती खळखळून हसली. तिचं स्पष्टीकरण ऐकणाऱ्या अभिनवनं ’यू!’ असं उद्गारत तिच्या खांद्यावर बुक्की मारली, आणि ती परत खळखळली.
तिच्यावर खिळलेली नजर वळवून सोनूनं बाहेर बेंगलोरच्या रस्त्यांकडे पाहिलं, आणि हलकेच मान हलवली. काही क्षणांपूर्वीच फुललेलं ते फूल बघताबघता असं कोमेजलं होतं.

’अरे अभिनव!’ मागून कोणीतरी ओरडलं.
’क्या बे?’ अभिनवनं वळत प्रतिसाद दिला.
’इंट्रो नाही केलीस?’
’अबे तू हलू नकोस. टी. टी. कलंडेल.’ त्याला उठताना पाहून अभिनव ओरडला.
पण तो मागून ओरडणारा आधीच उठला होता, आणि अभिनवच्या खूर्चीकडे निघाला होता. ’साले, ज्यादा बकबक की तो मच्छरकी तरह मसल दुंगा तुझे.’ खुर्चीच्या पाठीला घट्ट धरून उभं राहत, एक जाडजूड बोट अभिनवकडे रोखत त्यानं धमकी दिली, आणि दोघंही जोरजोरात हसले.
’तुम्ही काही वाटून घेऊ नका भाभीजी.’ तो रियाला म्हणाला. ’मी फक्त बोलतो. अभि तक कभी मसला नहीं है आपके अभिनवको.’
तो गडगडाटी हसला, पण अभिनव एकदम गोरामोरा झाला. विषय बदलण्यासाठी त्यानं सोनूला हाक मारली, ’सोनू, हा माझा कॉलेजचा मित्र, मंजूनाथ. किलर मंजा.’ तो म्हणाला. ’आणि हा सोनू, माझा कलीग.’ त्यानं ’किलर मंजा’ला सांगितलं.

मंजूनाथशी हस्तांदोलन करताना सोनूला खरंखुरं आश्चर्य वाटलं. आपल्याहून जाड लोक असतात हे त्याला नक्कीच माहित होतं, पण त्याच्यापेक्षा दुपटी-तिपटीनं जाड तरूण तो पहिल्यांदाच पाहत होता. आणि मुख्य म्हणजे हा 'किलर मंजा' आपल्या वजनाची, शरिराच्या अवस्थेची फिकिर न करता ट्रेकिंगला आला होता. ’हा करू शकतो, तर आपणही सहज करू शकू.’ त्याला वाटून गेलं.

बाराच्या सुमारास हेब्बळचा भुलभुलैया उड्डाणपूल पार करून ते महामार्गाला लागले. टी.टी.नं मग चांगलाच वेग घेतला. अर्ध्या तासात त्यांनी देवनहळ्ळी मागे टाकलं आणि मग थोड्या वेळानं एका ढाब्याला ते जेवणासाठी थांबले.

’आपण व्यवस्थित जेवण केलं आहे. आणि आता चढायचं सुद्धा आहे. काही नाही खायचं आता.’ आत शिरताना त्यानं स्वत:ला बजावलं. टेबलपर्य़ंत पोचून तिथे बसेपर्यंत त्याचा विचार ’थोडं काहीतरी आणि कॉफी वगैरे. पण त्याहून जास्त काही नाही.’ इतका बदलला. आणि पदार्थांच्या यादीवरून नजर फिरवून झाल्यावर त्यानं वेटरला ’एक पनीर फ्राइड राईस आणि एक स्वीट लस्सी आणा.’ असं सांगितलं.
’अरे! तू सुद्धा जेवला नाहीस का?’ त्याच्या बाजूला बसलेल्या हरविंदरनं विचारलं.
त्यानं मान हलवली, ’नाही पाजी. थोडं काहीतरी खाल्लंय. जेवण असं आत्ताच करतोय.’ त्यानं खोटंच सांगितलं. आणि, ’नाहीतरी चार तास झाले आहेत जेवून. आपण काही अपवाद नाही, इतक्या वेळानं कोणालाही परत भूक लागते. आणि आता चढायचं सुद्धा आहे...’ अशी स्वत:ची समजूत घातली. 

टी. टी. परत महामार्गावर धावू लागली आणि जवळजवळ सगळेच, रात्रीमुळे, नुकत्याच झालेल्या जेवणामुळे, वेगामुळे, वाहणाऱ्या गार वाऱ्यामुळे पेंगुळले. चालत्या गाडीत झोपणं सोनूला कधीच जमलं नव्हतं. खिडकीतून बाहेर बघत तो जागा राहिला. ’काय नशीब आहे यार!’ त्याच्या मनात आलं. ’हाताच्या अंतरावर बसली आहे रिया, पण आहे अभिनवच्या बाजूला. हाताच्या अंतरावर असलेल्या टेडीच्या मनात काय चालू आहे हे तिच्या गावीही नाहीये...’ त्याची नजर तिच्याकडे वळली. तिचं डोकं अभिनवच्या खांद्यावर विसावलेलं त्याला दिसलं, आणि तिचे विश्वासानं मिटलेले डोळे, तिच्या चेहऱ्यावरचं हलकं हास्य... सारंकाही जाळणारी एक आग त्याच्या आत पेटली. काहीतरी करावं, तिला गदागदा हलवून उठवावं, आणि ओरडून ओरडून मनातलं सगळं सांगावं असं त्याला वाटून गेलं. आणि त्याच क्षणी स्वत:ची हतबलता त्याला नव्यानं जाणवली. स्वत:चं काही प्रयत्न करण्यासाठीसुद्धा लायक नसणं त्याला परत एकदा कोसळवून गेलं. सगळं असह्य होत त्यानं परत विरूद्ध दिशेला, खिडकीबाहेर अंधारात पाहिलं, आणि क्षणोक्षणी जवळ येणाऱ्या संकटाबद्दल विचार करण्याचा प्रयत्न केला. थोडं उत्साही वाटून घेत जरी तो निघाला होता तरी आता, ट्रेकिंग सुरू व्हायला अगदी दोनच तास राहिलेले असताना, त्याला परत भिती वाटायला सुरूवात झाली होती.

*

महामार्ग सोडून गाडी डावीकडे वळली, आणि एका गावात शिरली. थोड्याच वेळात पक्का रस्तासुद्धा संपला. बसू लागलेल्या हादऱ्यांनी सगळे जागे झाले. ’आलं का स्कंदगिरी?’ मागून निशांतनं झोपाळलेल्या आवाजात विचारलं, आणि एक जोरदार जांभई दिली. सोनूनं मागे वळून मान डोलावली, आणि मागे वळताना रियाकडे एक चोरटी नजर टाकली. ती सुद्धा जागी झाली होती, आणि अभिनवला डोळे मोठे करून काहीतरी विचारत होती.

काही वेळातच टी. टी. नं तो मातीचा कच्चा रस्ताही सोडला. एक सफाईदार वळण घेऊन चालकानं गाडी एका मंदिराच्या आवारात आणून उभी केली. मागे वळून तो म्हणाला, ’पोचलो आपण साहेब.’

आळोखेपिळोखे देत सगळे उठले आणि एकएक करून खाली उतरले. सोनूनं टी-शर्ट पुढूनमागून खाली ओढला आणि आसमंत न्याहाळला. थोडं उंचीवर पोचले होते ते. मघाशी लागलेल्या गावाचे दिवे दूरवर दिसत होते. आजूबाजूला दाट झाडी होती.  मंदिराच्या समोर एक सोडियम-व्हेपरचा दिवा होता आणि तो आसपासचा भाग उजळत होता. एक कुत्रं कुठुनतरी येऊन ह्यांच्याकडे उत्सुकतेनं पाहत उभं राहिलं होतं. गाडीच्या आवाजानं मंदिराच्या ओसरीवर झोपलेले लोक जागे झाले होते. एक म्हातारा खोकू लागला होता, आणि अजून एक जण बिडी शिलगावीत होता.
त्याचं लक्ष आकाशाकडे गेलं. चांगलंच ढगाळलेलं होतं ते. त्यानं डोंगर शोधण्याचा प्रयत्न केला, पण त्याला काही तो दिसला नाही.

उतरल्या उतरल्या हलका व्हायला पळालेला अभिनव टी. टी. कडे परतला आणि त्यानं चालकाला विचारलं, ’नक्की हेच आहे ना? आम्हाला कोणालाच डोंगर दिसत नाहीये.’
’ते ह्या लाईटमुळे साहेब.’ त्या मंदिरासमोरच्या दिव्याकडे हात करत चालक म्हणाला. ’आणि आज चंद्र सुद्धा नाहीये. स्कंदगिरी ट्रेक साठी इथेच थांबावं लागतं. इथून एक पाच किलोमीटर चालायचं आणि मग चढायला सुरूवात करायची.’  त्यानं माहिती दिली.
’बापरे! इतकं तर आपण गेल्या वर्षभरात चाललो नसू.’ सोनूच्या मनात आलं. ’गाडी पुढे जात नाही का?’ त्यानं चालकाला विचारलं.
’च्यक्!’ चालकानं मान हलवली आणि त्या बिडी ओढणाऱ्या माणसाला हाक दिली, ’रामप्पा! ए रामप्पा!!’
रामप्पानं तिकडूनच ’काय?’ असं खुणेनं विचारलं.
चालकानं ह्या सगळ्यांकडे हात केला.
बिडी विझवत रामप्पा उठला, आणि दाढी खाजवत समोर येऊन उभा राहिला.  
चालकाची आणि त्याची कानडीत काही बातचीत झाली, आणि मग चालक म्हणाला, ’साहेब, हा रामप्पा. गाईड. हा तुमच्यासोबत येऊ शकतो वरपर्यंत.’
रामप्पानं सगळ्यांना एक घाऊक सलाम केला.
अभिनवनं त्याच्याशी पैशांची बोलणी केली, आणि वळून सगळ्याचं मत आजमवलं. रामप्पा पैसे काही जास्त मागत नव्हता, आणि रात्रीच्या वेळी कोणी माहितगार सोबत असणं कधीही चांगलंच होतं.
अभिनवचा होकार कळताच रामप्पा मंदिराच्या ओसरीकडे निघून गेला. चालकानं टी. टी. चं मागचं दार उघडलं, आणि सगळ्यांनी आपापली स्लीपिंग बॅग उचलली.
सोनूनं हातातली बॅग नीट पाहिली. खांद्यावर लटकवायची पिशवी होती ती. आतमध्ये गुंडाळी केलेली पातळ गादी होती. पिशवीचे बंद असल्या मजेशीर लांबीचे होते, की तिला फक्त एका खांद्यावर लटकवणंच शक्य होतं.
सोबत आणलेली बॅग उघडून त्यानं विजेरी बाहेर काढली, बॅग पाठीला लावली, स्लीपिंग बॅग एका खांद्याला लटकवली, आणि दुसऱ्या हातात विजेरी घेऊन तो सज्ज झाला.
सगळ्यांची तयारी होईपर्यंत रामप्पा तिकडून शाल लपेटून आणि हातात काठी घेऊन आला.
’निघायचं नं?’ त्यानं विचारलं.
’हो!’ चा एकच गजर झाला.
रामप्पा चालू लागला, ते कुत्रं रामप्पाच्या मागेमागे निघालं आणि सगळे त्यांच्या मागे चालू लागले.

*

ज्या दिशेनं त्यांची गाडी मंदिराच्या आवारात आली होती, त्याच्या विरूद्ध दिशेला ते वळले. हळूहळू ते मंदिर, तिथला प्रकाश मागे पडला, आणि रात्रीचा मखमली अंधार त्यांच्या सोबतीला आला. गाडीवाटेवरून चालले होते ते. दोन्ही बाजूला झाडी होती. विजेरीच्या प्रकाशात पायापुढची वाट उजळून निघत होती.
चालताचालता सोनू थबकला, आणि विजेरी विझवून त्यानं सभोवार पाहिलं. सगळयावर पसरलेली रात्र, ढगाळलेलं आभाळ, मातीची वाट, झाडी, शांतता, रातकिड्यांचे आवाज आणि समोर दिसू लागलेले डोंगरांचे आकार. स्वच्छ हवेचा त्यानं छातीभरून श्वास घेतला. त्याला का कोण जाणे, एकदम खूप छाऽन वाटलं.  

विजेरी पेटवून तो परत चालू लागला आणि लवकरच त्यानं नुकत्याच पुढे गेलेल्या मंजूनाथला गाठलं. थोडक्या चालण्यानं सुद्धा मंजूनाथ दमला होता. तोंड उघडं टाकून धापा टाकत तो चालत होता.

’गाने गाते है!’ पुढून रियाचा आवाज आला. तिच्या बाजूला चालणाऱ्या अभिनवनं उगीचच एक आनंदी आरोळी ठोकली.
पाजीनं गायला सुरूवात केली, ’हो खैके पान बनारस वाला...’ सगळ्यांनी त्याच्या सुरात सूर मिसळला. सगळ्यांच्या काही कदम मागे असणाऱ्या सोनूनं सुद्धा आवाज लावला. गाणी गाण्याच्या नादात थोड्या वेळानं चालू झालेली चढण त्याच्या ध्यानातही आली नाही.

चालकानं सांगितल्याप्रमाणे, पाचेक किलोमीटर चालल्यावर रामप्पा डावीकडे वळला, आणि काही पावलं जाऊन सगळ्यांकरता थांबला. सगळे गोळा झाल्यावर, थोडी विश्रांती घेऊन झाल्यावर ते पुढे निघाले. त्यांनी आता गाडीवाटही सोडली होती. आता त्यांच्या दोन्ही बाजूंना कर्नाटकात बऱ्याचदा दिसणारे अजस्त्र दगड होते आणि जमिनीवर पडलेल्या दगडादगडांतून त्यांची वाट वर कुठेतरी चढत जात होती.

दगडांचा आधार घेत, कधी कपाऱ्यांमधून, तर कधी दगडांना वळसा घालत, पायाखालच्या दगडांना चुकवत सोनू चढत राहिला. त्याची अवस्था एव्हाना बिकट झाली होती. हृदय भयंकरच धडधडत होतं, श्वास फुलला होता, सर्वांग घामाघूम झालं होतं. किलर मंजा त्याच्या मागे काही अंतरावर होता, आणि बाकी सगळे ह्या दोघांच्या पुढे होते. त्यांचीसुद्धा परिस्थिती सोनूइतकी नसली तरी सोनूसारखीच झाली होती बहुतेक. गाण्यांचे आवाज येणं आता बंद झालं होतं.

एकदम किलर मंजा मट्कन खाली बसला आणि कशीबशी त्यानं सोनूला हाळी दिली, ’सोनू!’
सोनू वळला. मंजाला नीट बोलताही येत नव्हतं. बॅगमधून बाटली काढून त्यानं घटाघटा पाणी पिलं, उरलेलं चेहऱ्यावर ओतून घेतलं, आणि कसाबसा तो सोनूला म्हणाला, ’मी.....नाही चालू शकत अजून.....गो अहेड... त्यांना सांग.’ आणि तो मागे कलंडला. दगडाला टेकून बसला.
सोनूनं खिशातून मोबाईल काढला. रेंज बिल्कुल नव्हती. ’काळजी करू नकोस, मी जातो पुढे, आम्ही बघतो काय करता येतंय ते. आराम कर तू इथेच.’ त्यानं मंजाला धीर दिला आणि तो पुढे निघाला.

एक वळण घेतल्यावर त्याला विजेऱ्यांचा प्रकाश दिसला. ते काही खूप दूर नव्हते. वाटेच्या बाजूच्या एका सपाट दगडावर ते ह्या दोघांची वाट पाहत विसावले होते.
सोनू त्या दगडावर चढताच रोहन ओरडला, ’कलका सूरज हमें यही दिखानेका इरादा है क्या? कुठे होतास?’
त्याच्याकडे लक्षही न देता सोनूनं अभिनवला शोधलं, आणि त्याला मंजाबद्दल सांगितलं.
’माय गॉड!’ अभिनव उद्गारला.
’आता काय करायचं?’ प्रमोदनं विचारलं.
थोडा वेळ अभिनवनं विचार केला, मग तो म्हणाला, ’मी जातो. त्याला तिथेच सोडू तर शकत नाही ना...त्याला टी. टी. पर्यंत पोचवून येतो.’
’तू काय करणार आहेस?' एकदम त्यानं सोनूला विचारलं. 'आत्ताच ठरव. आपण स्कंदगिरीचा पायथा गाठलाय आत्ताशी. चढण इथून सुरू होईल. बघ, विचार कर. नंतर वापस यायचं म्हणलास तर ते सुद्धा खूप अवघड पडेल.’ 
’प्रयत्न तर करीन मी. पूर्ण चढण्याचा.’ सोनूनं उत्तर दिलं.
’दॅट्स द स्पिरिट, टेडी!’ रिया म्हणाली.
अभिनवनं खांदे उडवले आणि तो जायला वळला. ’रूक, अभिनव.’ प्रमोद म्हणाला. ’एकटा जाणार का?’ त्यानं विचारलं.
’नाही, मी सुद्धा जातेय त्याच्या सोबत.’ उठत रिया म्हणाली. 
प्रमोद ’मी येतो तुझ्यासोबत.’ असं म्हणणारच होता, पण रियाला जायचंय म्हणल्यावर तो मनातल्या मनात हसला आणि गप्प झाला.
लख्खकन काहीतरी चमकलं सोनूच्या मनात. ’म्हणजे येताना हे दोघं एकटेच.’ त्याला वाटून गेलं, आणि विचारही न करता तो बोलला, ’मी सुद्धा येतो तुमच्या सोबत.’
अभिनवनं एकदम रियाकडे पाहिलं, आणि तिनं त्याच्याकडे. डोळे एकमेकांशी काही बोलले, आणि अभिनव सोनूला म्हणाला, ’वेडा झालास का? ज्यादा हिरो मत बन, थांब इथेच. तू अजून दहा किलोमीटर चाललास तर इथे परत आल्यावर आम्हाला तुला सोडायला परत एकदा गाडीपर्यंत जावं लागेल. रात्रभर काय हत्तींना पिंजऱ्यात पोचवत बसू का?’
रियाचं मन सोनूलाही कळलं होतं, अपमान पचवून तो नेहमीसारखाच शांत राहिला.
’कोई जरूरत नहीं है टेडी.’ रिया समजवण्याच्या सुरात म्हणाली. ’थोड्याच वेळात परत येऊ आम्ही.’ तिनं सांगितलं आणि ती अभिनवसोबत निघून गेली.  
त्यांच्या विजेऱ्यांचा प्रकाश वळणाआड जाईपर्यंत सोनू बघत राहिला. मग एक सुस्कारा सोडत त्यानं दोन्ही बॅग्ज काढल्या, आणि तो बाकीच्यांसारखा त्या दगडावर पसरला.

काही वेळानं दोघातिघांनी सोबत आणलेले नमकीनचे पुडे उघडले. सोनूनंही मिल्कीबार काढले. कितीतरी वेळापासून ते त्याला खुणावत होते. पण 'दुसरं कोणीच काही खात नाहीये, आणि आपणच चॉकलेटस् काढले तर परत सगळे हसतील', असा विचार करून त्यानं स्वतःला रोखलं होतं.

गप्पा सुरू झाल्या. बोलताबोलता मॅनेजरचा विषय निघाला. बोलून बोलून चोथा झालेल्या ऑफिसमधल्या गोष्टी परत चघळल्या गेल्या, नव्यानं त्या मॅनेजरला शिव्या दिल्या गेल्या. वळणं घेत घेत गप्पांची गाडी ’अभिनव-रिया’ ह्या थांब्याला येऊन पोहचली.
’लकी आहे स्साला!’ रोहननं सगळ्यांच्याच मनातलं बोलून दाखवलं.
’हो यार. कितना प्यार है नं, भाई बहनमें?’ हरविंदरनं खोट्याच निरागसपणे विचारलं, आणि सगळे खिदळले.
’भाई-बहन? अभी देखना, ठुकाई करूनच येतील ते.’ गुंजन म्हणाला, आणि हास्याची अजून एक फैर झडली.
सोनूला एकदम भिती वाटली. ’असं काही होऊ नाही त्यांच्यामध्ये.’ त्याला मनापासून वाटलं. अस्वस्थ मनानं तो त्यांची वाट पहात राहिला.

तासा-दीडतासानं त्यांच्या बोलण्याचे आवाज ऐकू आले. थोड्या वेळात ते दगडावर पोचले, आणि लगेच लवंडले.
’अबे झोपताय काय? चला की आता!’ स्वत: न उठता निशांत म्हणाला.
’थकलो आहोत यार...थोडा वेळ.’ त्याच्या चेहऱ्याजवळ नाक आणून कसलातरी वास घेणाऱ्या रामप्पाच्या कुत्र्यापासून गडबडीनं दूर सरकत अभिनव उत्तरला.
’म्हणजे चालून थकला आहात की...’ रोहननं वाक्य अर्धवट सोडलं, आणि परत सगळ्यांचं दबकं हास्य ऐकू आलं.
’डर्टी माईंडस्!’ रिया उद्गारली, आणि सगळ्यांच्या हसण्यात सामील झाली.

काही वेळानं रामप्पा उठून उभा राहिला, आणि मग एकेक करून सगळेच उठले. सोनूनं दोन्ही बॅग्ज परत अंगावर घेतल्या आणि हातातली विजेरी पेटवली.
त्याच वाटेनं अजून थोडं चालल्यावर रामप्पा थांबला. त्यांच्या उजवीकडे एक टेकडी दिसत होती, आणि डावीकडे होता एक महाकाय डोंगर. उंचच्याउंच, त्याच्या शिखराकडे पाहण्यासाठी मान पूर्ण वर वळवायला लावणारा, आभाळाच्या पार्श्वभूमीवर स्वत:ची विशाल आकृती रेखून उद्दामपणे उभा असणारा.
थांबलेल्या रामप्पानं त्याच डोंगराकडे हात केला, आणि तो म्हणाला, ’स्कंदगिरी.’

*

सगळ्यांच्या मागोमाग सोनूसुद्धा डावीकडे वळला आणि चालू लागला. स्कंदगिरीच्या आकाराचं दडपण त्याच्या मनावर आलंच होतं, पण तो स्वत:ला ’इतकं चाललो आणि चढलो आहोतच नं आपण...’ असंही सांगत होता.

स्कंदगिरीची चढण लवकरच सुरू झाली. ते एका अरूंद पायवाटेवरून चढत होते. त्यांच्यासारख्या डोंगर चढणाऱ्या लोकांनी, चरायला वर जाणाऱ्या गुरांनी, गुराख्यांनी आणि डोंगरावर येणं जाणं असलेल्या गावकऱ्यांनी चालून चालून बनवलेली; आणि म्हणूनच वरपर्यंत जाण्यासाठी सगळ्यात सोपी असणारी वाट होती ती.

पाठीला लावलेल्या बॅगचं ओझं सोनूला आता व्यवस्थित जाणवू लागलं होतं. ’चार लिटर पाणी. कोणी सांगितलं होतं इतकं घ्यायला?’ चढामुळे आणि पाठीवरच्या वजनामुळे कंबरेत पुढे झुकून चालताना तो स्वत:वरच चरफडला.

कोणीही आता काही बोलत नव्हतं. त्यांच्या जोरजोरात चालू असलेल्या श्वासांचा फक्त आवाज येत होता. चढानं सगळ्यांनाच दमवलं होतं. पण रामप्पाचं कुत्रं मात्र खऱ्या उत्साहात होतं. ते मस्तपैकी सगळ्यांच्या थोडं थोडं पुढे पळत होतं, वाकून कशाकशाचे वास घेत होतं, मधूनच रामप्पापाशी वापस येत होतं आणि पुन्हा पुढे पळत होतं.

’आता हे थांबतील तर बरं’ असं सोनूला वाटलं, पण हे त्याला सजेस्ट करायचं नव्हतं. तो निमूटपणे, मोठ्या प्रयत्नांनी एक एक पाऊल टाकत चढत राहिला.

वाटेनं अजून एक वळण घेतलं, आणि एका जवळजवळ तीन पुरूष उंच दगडाशी ती थांबली. टपाटप उड्या घेत कुत्रं वर चढून गेलं, आणि वरून खाली वाकून रामप्पाकडे पाहू लागलं. कुठून चढायचं ते रामप्पाला माहिती होतं, काठीच्या आधारानं तोही वर चढला. त्याच्या मागोमाग अभिनवसुद्दा थोडा चढला, आणि लगेच खाली उतरला. रियाला मागून आधार देत त्यानं वर चढवलं, आणि मग तो तिच्या सोबतीनं परत चढू लागला.
ते दृष्टीआड झाले, तसा त्यांच्याकडे पाहणारा सोनू भानावर आला. सगळ्यांनीच आता तो दगड चढायला सुरूवात केली होती. एक श्वास घेत तोपण दगडाकडे निघाला, आणि दुसरी समस्या लगेच त्याच्या ध्यानात आली.

अंधार इतका होता की विजेरी बंद करण्याचा विचारही मुर्खपणाचा होता. एक हात विजेरी पकडण्यात गुंतलेला असताना फक्त एकाच हातानं चढताना अतिशय महत्वाचा असणारा आधार घेणं शक्य होतं, आणि त्याच खांद्याला ती स्लीपिंग बॅग लावलेली होती. पाठीवरचं वजनही होतंच. त्यानं लक्षपूर्वक निशांत कसा चढतोय ते पाहिलं, आणि स्लीपिंग बॅग सावरत डोक्याच्या थोडं वर असलेल्या एका खाचेला उजव्या हातानं धरलं. निशांतनं ज्या जागी पाय ठेवला होता त्या, त्याच्या कंबरेइतक्या उंचीवरच्या जागी त्यानंही उजवा पाय ठेवला. आणि मग घाबरत घाबरत, स्वतःचं सगळं वजन उचलत, त्यानं डावा पाय वर घेतला. क्षणात दगडाभोवती स्वत:ला लपेटून घेत त्यानं तो पाय लांबवला, आणि पलीकडे अजून उंचीवर असलेल्या थोड्या सपाट जागी ठेवला. विजेरी धरलेला डावा हात कामाला येणार नव्ह्ताच. डाव्या पायावर सगळा भार तोलत त्यानं स्वतःला पलीकडे नेलं, आणि दगडाचा आधार घेत, ह्र्दयाची धडधड ऐकत तो क्षणभर उभा राहिला. 

इथून पुढे चढण अवघड नव्हती. दगडावर ओणवं होत, एका हातानं आधार घेत तो चढून गेला. वरती पायवाट परत सुरू होत होती, आणि तिथं सगळे लवंडले होते. एकटा निशांत बसून होता. सोनू वरपर्यंत पोचला, आणि सरळ होताना त्याची नजर निशांतशी भिडली. निशांतच्या डोळ्यांत त्याच्यासाठीचं कौतुक तरळून गेल्यासारखं त्याला वाटलं. 

बॅग्ज खाली टाकत तो बदकन खाली बसला, चष्मा काढून त्यानं रूमालानं घाम पुसला, आणि घटाघटा पाणी पिताना रियाला दोन्ही हातांनी धरणारा, खालून आधार देत तिला वर चढवणारा अभिनव त्याच्या डोळ्यांसमोर आला. कितव्यांदातरी त्यानं स्वतःला विचारलं, ’का आलो आहोत आपण या ट्रेकला?’ त्याला परत एकदा, काहीच उत्तर मिळालं नाही.

’कमॉन गाईज!’ उठत हरविंदर उद्गारला. ’डोंट लूज युअर बॉडी हीट!’
’ही काय भानगड आहे बाबा?’ प्रमोदनं पडल्यापडल्या विचारलं.
’अबे, आता आपल्या बॉडीज् गरम झाल्या आहेत ना,’
’कशामुळे?’
’चढल्यामुळे. आता जास्त वेळ थांबलं, की त्या थंड होतात. मग पुन्हा चालायला लागलो की परत त्यांना गरम व्हायला जास्त वेळ लागतो.’
’हो.’ अभिनव हसत म्हणाला. ’आणि सतत चालत राहिलं की बॉडीज् थंडच होत नाहीत. गरम गरम होत राहतात. बैठ नीचे सरदार, पिघल जायेगा नहीं तो.’
सगळे हसले, आणि हरविंदरसुद्धा हसत खाली बसला.

काही वेळानं रामप्पाचं कुत्रं अस्वस्थ झालं, आणि त्यानं परत पडलेल्यांचा वास घ्यायला सुरूवात केली. लगबगीनं सगळे उठले. गालातल्या गालात हसत रामप्पा चालू लागला, आणि बॅग्ज उचलत त्याच्यामागे बाकीचे.

*

मघाशी प्रसन्न वाटणारी रात्र आता सोनूला एक मोठीच अडचण वाटू लागली होती. गार वारा वाहत होता, पण तिकडे लक्ष देण्याच्या परिस्थितीत तो नव्हता. त्याचं सगळं लक्ष चालण्यावर एकवटलेलं होतं. आणि ते गरजेचंही होतंच. शरीर पावलोपावली थकत असताना, हृदय अगदी रियाकरताही धडधडलं नसेल असं धडधडत असताना डोकं शांत ठेऊन, एका पावलाकरताही अंदाज चुकला तर काय होईल याची जाणीव मनात सतत जागी असताना फक्त एका विजेरीच्या उजेडात पुढचं पाऊल कुठे टाकायचं हे सतत ठरवत, चढत राहणं...एवढं मोठं ओझं अंगावर घेऊन - हे तो करत होता. हे आपण का करतो आहोत हे माहित नसताना.

’निशांत!’ थकून थकून त्याच्या दहाएक पावलं पुढे असलेल्या निशांतला सोनूनं हाक दिली. निशांत मागे वळला. ’थांबूयात यार.’ सोनू म्हणाला.
निशांत होता तिथेच खाली बसला. मग त्यानं बॅग्ज काढल्या आणि तो जमिनीवर लवंडला. सोनूनं त्याला गाठलं आणि तो ही त्याच्या बाजूला कोसळला.
काही नं बोलता दोघांनी पाचदहा मिनिटे विश्रांती घेतली, आणि मग ते उठले, पाणी पिऊन निघाले.
’बाकीचे पुढे निघून गेले असतील ना, तर मस्त लागेल आपली.’ निशांत म्हणाला.

पण तसं काही झालेलं नव्हतं. थोड्याच अंतरावर बाकीचे सुद्धा बसले-झोपलेले होते. रोहन परत ओरडतोय की काय असं सोनूला वाटलं, पण तो तारे शोधण्यात गुंतला होता.

रियाही घामेजली होती. तिचे मोकळे केस घामानं चेहऱ्यावर चिकटले होते. जीन्सच्या खिशातून तिनं एक रबरबँण्ड काढलं, आणि सगळे केस मागे ओढून घेत त्या रबरबँण्डनं बांधून टाकले. ही साधीशी कृती करतानाही, सोनूला ती विलक्षण मोहक दिसली.

*

पुढे चढायला त्यांनी सुरूवात केली. ’सांभाळून. आता वाट थोडी अवघड आहे.’ रामप्पानं ओरडून इशारा इशारा दिला. ’आता अजून काय अवघड असणार आहे, काय माहित...’ सोनूच्या मनात आलं.
लवकरच त्यांना पुन्हा ते मोठ्ठाले दगड लागले. काहींना वळसा घेत, काहींवरून चढत, त्यांनी ते पार केले. आणि मग दगडांच्या बरोबरीनं झाडी सुरू झाली. स्वत:ला खरचटण्यापासून वाचवत सोनू झाडीतून चालू लागला. अचानक त्याला काही आवाज ऐकू आला, त्यानं लगेच विजेरीचा प्रकाश तिकडे टाकला. काहीतरी सळसळत निघून गेल्यासारखं त्याला वाटलं. भितीनं त्याचा ताबा घेतला. थरथरत, झाडीची तमा नं बाळगता पळत त्यानं पुढे असलेल्या हरविंदरला गाठलं. ’पाजी, साप!’ तो कसाबसा म्हणाला.
’पता है.’ हरविंदर सहज स्वरात म्हणाला. ’सोबत रहा. प्रकाशात पाहिल्याशिवाय कुठेही पाऊल टाकू नकोस.’ जमिनीवरची नजर न काढता त्यानं सांगितलं.

दोन दगडांमधल्या चिंचोळ्या जागेतून, आणि लगेच असणाऱ्या दाट झाडीतून ते चढत पलीकडे गेले. काही वेळानं झाडी विरळ होऊ लागली, आणि परत मोकळ्यात आल्यावर ते थांबले. 

’क्या टाईम चल रहा है अपना!’ झोपून वर आकाशाकडे पाहताना रोहन म्हणाला. ’रात्रीबेरात्री गुरांसारखं चढऽऽत चाललो आहोत, थकलो की रस्त्यातच झोपायचं, पाणीबिणी प्यायचं, घाम पुसायचा, आणि त्या रामप्पाच्या कुत्र्यानं सांगितलं की उठून परत चढायला लागायचं. वा रे!’
सगळ्यांच्याच चेहऱ्यावर हसू आलं.
’काय मग, उठायचं का?’ कोणीतरी विचारलं. कोणीही त्याला काही उत्तर दिलं नाही आणि कोणी उठलंही नाही.

बराच वेळ त्यांनी आराम केला. ’चला उठा आता.’ शेवटी उठत अभिनव म्हणाला. ’नाहीतर येईल ते कुत्रं, तोंड चाटायला.’  त्यानं त्याचा हात रियापुढे केला, आणि त्याचा आधार घेत, मागून पँट झटकत तीही उभी राहिली.

पण रामप्पाचं कुत्रं काही कोणाला उठवायला आलं नाही. ते बसूनच राहिलं.  त्याच्या बाजूला बसून त्याच्याकडे लक्षपूर्वक पाहणारा रामप्पा म्हणाला, ’काळू थकलाय.’

आणि खरंच, त्याची छाती भात्यासारखी हलत होती. तोंड उघडं टाकून, जीभ पूर्ण बाहेर काढून त्याचं सतत ’वॅहॅ वॅहॅ’ चालू होतं.  रामप्पानं त्याच्या पाठीवर हलकी थाप मारली, पण त्याला काही आता हलायचं नव्हतं बहुतेक. रामप्पानं मान हलवली. ’नाटकं बघा.’ तो ह्यांच्याकडे वळून, थोडं चिडून, थोडं कौतुकानं म्हणाला. ’बरोब्बर माहिती आहे ना, थकल्याचं सोंग केल्यावर रामप्पा औषध देतो म्हणून.’ बोलताबोलता त्यानं खिशातून एक चपटी बाटली काढली. बाजूच्या झाडावरून पानं तोडून त्यांचा सफाईदारपणे द्रोण बनवला, आणि त्यात ’औषध’ ओतून ते काळूला प्यायला दिलं. मग त्यानं स्वतःही दोन घोट घेतले.

काळूनं अजून दारूची मागणी केली, ती पुरी करून घेतली, आणि मग टणकन उडी मारत तो उभा झाला. कोणी मागे येतंय की नाही, हे न पाहताच तो चालू लागला. त्याची मान मस्तच हलत होती, इकडे-तिकडे, इकडे-तिकडे. पाय सरळ रेषेत पडत नव्हते. सगळ्यांना भारीच मजा वाटली. झिंगलेलं कुत्रं ते पहिल्यांदाच पहात होते.

रामप्पा नेमकं काय करतोय ते पाहण्यासाठी सगळे उठलेच होते, हसत हसत ते आता काळूमागे चालू लागले. सोनू आता फारच थकला होता. ’खाली तर मारे ऐटीत रियासमोर म्हणलं आपण, की प्रयत्न करू पूर्ण चढण्याचा... पण होत नाही बहुतेक आपल्याला.’ त्याच्या मनात सारखंसारखं येऊ लागलं होतं. रामप्पाकडून ती बाटली मागून घेऊन थोडी दारू आपणही प्यावी, असंही त्याला वाटून गेलं होतं.

त्यांना चढायला लागून आता बराच वेळ झाला होता, पण तो चढ संपण्याचं नाव काही घेत नव्हता. काहीच बदलत नव्हतं. रात्र, ढगाळलेलं आभाळ, पायाखालची पायवाट, तिच्यावर पडणारा विजेरीचा प्रकाश, दगडं, मधून मधून लागणारी झाडी,  इतकं चढल्यावरही सगळं काही तसंच होतं. प्रत्येक पावलानिशी पाठीवरचं ओझं वाढत चालल्यासारखं सोनूला वाटू लागलं होतं. पुढे टाकाव्या लागणाऱ्या पावलाकरता अडचणी काही कमी होत नव्हत्या, आणि त्याची शक्ती आता संपत चालली होती. घेतलेल्या विश्रांतीनंही काही फरक पडला नव्हता. मुष्किलीनं शंभर पावलं चालल्यावर त्याला परत खाली बसावं आणि तासभर तरी उठू नये असं वाटू लागलं होतं.

पोटऱ्यांमध्ये गोळे आल्यासारखं त्याला वाटलं, आणि तो थबकला. भितीची एक लहर त्याच्या सर्वांगात दौडून गेली. ’आता हे असं ना तळ्यात ना मळ्यात असताना पायात गोळे आले, तर आपण करणार काय?’ तो गठाळला. तिथेच तो खाली बसला. बसताना त्यानं स्कंदगिरीच्या शिखराकडे पाहिलं. इतकं चढल्यावरही, ते अजूनही लांबच दिसत होतं.

सोनू उठला नाही, त्यानं कोणाला हाक मारण्याचा प्रयत्नसुद्धा केला नाही. आपल्या हरलेल्या शरीरासोबत, हरलेल्या मनानं तो तिथंच बसून राहिला.

काही वेळातच पुढे गेलेले त्याचे सोबती त्याला शोधत वापस आले. ’काय झालं सोनू? थकलास का? थांबायचंय का थोडा वेळ?’ निशांतनं विचारलं.
सोनूनं लगेच काहीच उत्तर दिलं नाही. मग जमिनीकडे पाहत निराश स्वरात तो म्हणाला, ’मी नाही चालू शकत आता. एक पाऊलसुद्धा पुढे नाही टाकू शकत. तुम्ही जाऊन या. मी बसून राहतो इथेच.'

*

धपकन त्याच्या समोर बसत कोणीतरी मृदु स्वरात बोललं, ’सोनू, ए सोनू! असं काय करतोस? काय करणार अंधारात एकटा बसून?’
तो आवाज जरी अभिनवचा होता, तरी अभिनव आपल्याशी असं काही बोलतोय यावर त्याचा क्षणभर विश्वास बसला नाही.
त्याच काळजीनं, आपुलकीनं भरलेल्या आवाजात अभिनव पुढे म्हणाला, ’पाहिलंय ना आपण, साप सुद्धा आहेत इथे. आणि इतकं चढला आहेस, अशी अर्ध्यात हार काय मानतोस?’
अजूनही वर न पाहता सोनू म्हणाला, ’नाही होणार मला. शक्यच नाही. माझ्यासारख्यांनी हे असलं काही करण्याचा विचार सुद्धा मनात आणायला नको. तो किलर मंजा शहाणा माझ्यापेक्षा. त्यानं तिथेच तरी ओळखलं काय ते. मी कशाला इतकं चढत आलो काय माहिती.’
त्यानं वर, अभिनवकडे पाहिलं. ’माझ्या पायात गोळे येताहेत. थोडं चाललं तरी श्वास फुलतोय, डोकं गरगरू लागलंय. आणि ते शिखर, ते अजून तितकंच लांब आहे.’ त्यानं परत मान खाली घातली.
एक क्षण अभिनव काहीच बोलला नाही. मग उठत त्यानं सोनूचं मनगट धरलं. ’उठ.’ तो म्हणाला.
सोनूनं मान हलवली. अभिनवनं जोरात त्याचा हात ओढला. सोनू उभा राहिला.
’चल.’ त्याचा हात धरून अभिनव त्याला थोडं पुढे, ज्या दगडाशी तो बसला होता त्याच्या पलीकडे घेऊन गेला.
’बघ.’ पायवाटेहून थोडं दूर घेऊन जाऊन, खाली हात करत अभिनव त्याला म्हणाला.
सोनूनं खाली पाहिलं. रात्रीचं काळं आवरण सगळ्यावर पसरलेलं होतं, आणि नजर जाईल तिकडे लुकलुकणारे दिवे दिसत होते. अभिनवनं एका  उजळलेल्या ठिपक्याकडे बोट दाखवलं. ’ते बघ.’ तो म्हणाला. ’मंदिर. आपली टी. टी. तिथे आहे.’ त्याच रेषेत त्यानं बोट थोडं वर नेलं. ’आणि ते आपण आलो ते गाव.’ एक डोळा मिटत त्यानं अंगठ्यानं त्यांची गाडी उभी होती ती जागा झाकली, आणि पहिल्या बोटानं ते गाव. आणि मग ते, एका वितीएवढं अंतर सोनूपुढे धरत तो म्हणाला, ’हे इतकं चढलो आहोत आपण. आता सांग, अजूनही तुला ते शिखर लांब वाटतं आहे?’
तिथे वाहणारा गार वारा सोनूला नव्यानं जाणवला. त्यानं नकळत एक खोल श्वास घेतला.
त्याच्या खांद्यावर अभिनवनं हात टाकला. आणि दोघंही वळले. बाकीचे होते, तिकडे जाताना अभिनव म्हणाला, ’आय ऍडमिट, की तू काय ट्रेकिंग करणार असं आम्हाला सगळ्यांना वाटलं होतं. पण आज पूर्ण वेळ आम्ही तुला हार न मानता स्कंदगिरीला पादाक्रांत करताना बघतोय. इतकं चढला आहेस, आता थांबू नकोस. फोड दे! दिखा दे स्कंदगिरीको, तू किस मिट्टी से बना है!’
त्याच्याकडे पाहत सोनू हसला.
बोलताबोलता ते बाकीचे होते तिथे परतले. सगळे तिथेच, जागा मिळेल तसे पसरले होते. ’पाहिलंस?’ अभिनवनं विचारलं. ’तू एकटाच नाही, आम्ही सगळेच थकलो आहोत यार. पण एक सांगू? शरीर थकल्यावरसुद्धा काहीतरी असतं...काहीतरी असं की ज्याच्या बळावर माणूस एक पाऊल, मग अजून एक पाऊल, मग अजून एक...पुढे टाकत राहू शकतो. आणि ते म्हणजे आपली इच्छा.’
सोनूचं लक्ष क्षणभरासाठी रियाकडे गेलं. ती अनिमिष नेत्रांनी अभिनवकडे पाहत होती.
’तू म्हणत होतास नं गरगरतंय म्हणून?’ त्याची बॅग उघडत अभिनवनं विचारलं. ’बस, आणि हे खा.’ दोनतीन कॅडबरीज् सोनूच्या पुढे धरत त्यानं सांगितलं.
सोनू खाली बसला, आणि त्यानं एका कॅडबरीचं वेष्टन उघडलं. ’कोणाला हवीये का?’ त्यानं विचारलं.
’तू खा आधी. ते जास्त महत्वाचं आहे.’ अभिनव उत्तरला.
एक मोठी कॅडबरी संपवून सोनूनं पोटभर पाणी पिलं. दुसरी खाताना त्या चॉकलेटची जादू शरीरभर पसरताना त्याला जाणवली, अंगात कोणीतरी शक्ती ओतत असल्यासारखं त्याला वाटलं.
त्याच्याकडे निरखून पहात असलेला प्रमोद हसला. ’चांगलं वाटू लागलं आहे नं? शुगर का डिरेक्ट सप्लाय होता है वो.’
सोनू सुद्धा हसला, आणि पँट झटकत उभा राहिला. ते अर्धं चॉकलेट त्यानं खिशात ठेवलं, आणि बॅग्ज अंगावर चढवताना त्याच्या मनात आलं, ’मंजा शहाणा खरा. जे त्याला जमणार नाही असं वाटलं ते त्यानं केलं नाही. आपण वेडे...आपण बुद्धीचं न ऐकता, हरण्याची खात्री असतानाही, प्रयत्न करून पाहणं निवडलं. अब निभाके देखते है. आता बघूया, हा सोनू जिंकतोय की स्कंदगिरी ते!’
विजेरी पेटवत तो सगळ्यांना म्हणाला, ’निघायचं नं?’
ते शब्द कानावर पडताच इतका वेळ बसून राहिलेला काळू एकदम उठला, आणि चालू लागला. त्याची मान अजूनही तशीच हलत होती, आणि तोंड उघडं टाकून चालताना तो अजूनही मस्त लडखडत होता. नेहमीप्रमाणे रामप्पा त्याच्यामागे निघाला. सोनू थोडासा रेंगाळला. पुढे जाणाऱ्या अभिनवला त्यानं थांबवलं, आणि त्याच्या खांद्यांवर हात ठेवत तो म्हणाला, ’थँक्स्, दोस्त.’ अभिनवही हसला. काही क्षण दोघेही गप्प उभे राहिले. मग अभिनवनं थोडं झुकत पायवाटेकडे एक हात दाखवला, आणि हसत दोघंही चालू लागले.

*

सारं काही अजूनही तेच होतं, काही वेळानं सोनूचं हृदय परत धडधडू लागलं होतं, श्वास परत फुलला होता, विश्रांतीनं ताजतवानं झालेलं शरीर परत थकू लागलं होतं. पण त्याचबरोबर, आता त्याच्यामध्ये काहीतरी नवीन जन्मलं होतं. ’आज तर स्कंदगिरीचं शिखर पहायचंच!’ स्वतःला सांगत तो चालत होता.

अजून जवळपास पाऊण तास ते चढत राहिले, मध्ये त्यांची एक विश्रांतीही घेऊन झाली, आणि मग एकदाचा तो चढ कमीकमी होत संपला. एक वळण घेत पायवाट त्यांना डोंगराच्या कडेपर्यंत घेऊन गेली. तिथे एक खांब लावलेला होता, आणि त्याच्या आसपास अनेक चौकोनी आकाराचे, नीट कापलेले दगड पडलेले होते.

’हुश्श...पोचलो नं?’ प्रमोदनं विचारलं.
’नाही.’ रामप्पानं मान हलवली. त्यांच्या मागे आणि डावीकडे डोंगराचा उतार होता, उजव्या हाताला ते जिकडून आले ती बाजू. आणि त्यांच्या समोर पायवाट अजून पुढे कुठेतरी गेली होती. तिकडे बोट दाखवत तो म्हणाला, ’त्या तिकडे जायचं आहे आता.’

लगेच चालू लागण्याची इच्छा कोणालाच नव्हती, आणि ती जागाही मोठी छान होती. खालचा सारा आसमंत तिथून नजरेच्या टप्प्यात येत होता, गारगार वारा वाहत होता, आणि बसायला दगड होते. आरामात सगळे बसले. बॅग्ज उघडल्या गेल्या, खाण्याचं सामान बाहेर काढल्या गेलं. सोनूनं एक नवी कॅडबरी काढली. (खिशातली अर्धी चढताना संपली होती.) कॅडबरी खाताना त्याला काहीतरी आठवलं. बॅग मधून त्यानं बिस्किटांचा पुडा काढला, आणि काही बिस्किटं काळूपुढे टाकली. काळूही भुकेजला होता बहुतेक. त्यानं ती लगेच गट्टम केली.

’प्यारा है नं?’ रियानं विचारलं.
’हां.’ सोनू पुटपुटला.
’बेवडा है लेकिन.’ रोहन म्हणाला.
’ये सिगरेटभी पिता है?’ हरविंदरनं रामप्पाला विचारलं.
’हो पीतो नं.’ रामप्पा म्हणाला. ’फक्त पेटवून त्याच्या पुढच्या पायाच्या बोटांमध्ये ठेऊन द्यावी लागते.’
हरविंदरला क्षणभर ते खरंच वाटलं, आणि सगळ्यांचं हास्य उसळलं. ’क्या रामप्पा, तुम भी?’ असं विचारत हरविंदरही हसू लागला.

हसण्याचा भर ओसरत असताना अभिनवनं एक हात वर केला, आणि तो ओरडला, ’गाईज, फोटोसेशन!’ 
उत्साहानं सगळे उठले, आणि त्या खांबाभोवती उभे राहिले. बाकीचे आपापल्या जागा घेत असताना सोनू थोडा मागे मागे राहिला, फोटोत त्याचा फक्त चेहराच दिसेल असा. रामप्पाला कॅमेरा कसा चालवायचा ते दाखवून अभिनव पळत ह्यांच्याकडे आला. रामप्पानं बटन दाबताना, नेहमीच्या सवयीनं, ते ह्या फोटोत कुणाला दिसणार नाही हे माहिती असतानाही, सोनूनं पोट आत ओढून घेतलं.
तिथे मग त्यांनी भरपूर फोटो काढले. सगळ्यांच्या आग्रहावरून रामप्पा, काळू आणि हरविंदरचा एक एकत्र फोटो काढल्या गेला. रिया आणि अभिनवनंही फक्त त्यांचे फोटोज काढून घेतले.

’अबे, इकडे लक्ष गेलंय का तुमचं?’ ते असेच खिदळत बसलेले असताना आकाशाकडे बोट दाखवत रोहन ओरडला.
सगळ्यांनी वर पाहिलं. आकाश अगदी थोडं थोडं उजळू लागलं होतं.
गडबडीनं सगळे उठले. सूर्योदय त्यांना स्कंदगिरीच्या शिखरावरूनच पहायचा होता. रामप्पानं मघाशी दाखवलेल्या वाटेनं ते पुढे निघाले.

तासा-दीडतासापूर्वी जर त्यांना झाडी लागली होती, तर आता ते जंगलातून चालले होते. स्वतःला खरचटण्यापासून वाचवणं काही शक्य राहिलं नव्हतं. मधूनच ते दगड होतेच. दाट झाडीतून, विजेरीच्या उजेडात चढत जाताना जमिनीकडे दुर्लक्ष करूनसुद्धा भागण्यासारखं नव्हतं. इथे खाचखळगे, दगडगोटे भरपूर होते.

अजून अर्ध्या तासानं, त्या जंगलातून हातानं फांद्या बाजूला सारत, अंगावरचं ओझं सांभाळत चालत जात असताना सोनूला अचानक पुढून अभिनवची आनंदी आरोळी ऐकू आली, आणि लगेच रियाचा आवाज. पाठोपाठ बाकीच्यांचेही आवाज आले.

खरचटण्याची तमा न बाळगता मोठ्या उत्सुकतेनं सोनू लगबगीनं चालू लागला. काही वेळातच झाडी संपली, पायवाट पन्नासेक पावलं उतरली, आणि तिनं त्याला स्कंदगिरीच्या शिखरावर आणून पोहचवलं.

*

एक खोल श्वास घेत हसऱ्या चेहऱ्यानं सोनूनं आसमंत न्याहाळला. बास्केटबॉलची तीन मैदानं बसतील एवढं पठार त्याच्या समोर पसरलं होतं. पलीकडे, त्या टोकाला एक मंदिर दिसत होतं, आणि त्याच्या डाव्या बाजूला तो जिकडून आला त्याच्या विरूद्ध बाजूला जाणारी एक पायवाट होती.

’शेवटी आलोच आपण, स्कंदगिरीच्या शिखरावर!’ त्याला वाटलं. काहीतरी मिळवल्याचा, जिंकल्याचा आनंद त्याच्या मनाच्या कणाकणातून भरून आला. झटक्यात त्यानं खाली पाहिलं. आपल्या देहावरून त्याची नजर फिरली. आणि त्याला काहीतरी जाणवलं...आजवर कधीच न जाणवलेलं. 'हे माझं शरीर आहे!'  त्याला पहिल्यांदाच स्वत:बद्दल वाटलं. ’हे नुसत्या मागण्याच करत नाही, तर हे माझं ऐकतंसुद्धा. हे माझ्या इच्छेनुसार वाकू शकतं, वळू शकतं. सवय नसताना, काहीच अनुभव नसताना माझ्या मनात अचानक ट्रेकिंग करावी असं येतं, आणि माझं हे शरीर माझी इच्छा पूर्ण करतं!’
विचार न करता निर्णय घेण्यातला, काही मिळवण्यासाठी प्रयत्न करण्यातला मझा त्याला पहिल्यांदाच जाणवला. पर्यावसान ठाऊक नसताना अंधारात घेतलेली उडी माणसाला काय देऊन जाते, हे त्याला दिसलं.

त्याच्या अवतीभवती वाहत मोठ्या प्रेमानं वाऱ्यानं त्याचा घाम पुसला. विचारांमध्ये हरवून तो उभा असताना डावीकडच्या पायवाटेवरून हरविंदरची हाक आली, ’ओये सोनू! तिथे काय करतो आहेस? चल पटकन, सूर्योदय बघायला.’
सोनूनं मान डोलवली, आणि पहाटेच्या त्या प्रकाशात,  त्याचा आनंद ओसंडून वाहू देत, पक्ष्यांसारखे हात फैलावून तो हसत हसत त्या मंदिराच्या दिशेनं नागमोडी धावला. एक वेगळीच नशा त्याला आता चढली होती.

घाईघाईनं मंदिराबाहेर बूट काढून, आत जाऊन त्यानं देवाला नमस्कार केला. ’सोनू जिंकला देवा, जिंकला सोनू.’ भरून आलेल्या आवाजात त्यानं देवाला सांगितलं.
घाईघाईनं बूट घालत तो त्या पायवाटेवरून पळत सुटला. काही अंतर गेल्यावर त्याला समोर उभे असलेले सगळे दिसले.
पूर्वा आता चांगलीच उजळली होती, आणि सूर्याचं आगमन कधीही होणार होतं.
सोनूची नजर एका क्षणाकरता त्याच्या सोबत्यांवरून फिरली. त्याच्याकरता थांबणारे, त्याला धीर देणारे, प्रोत्साहन देणारे, त्याची काळजी करणारे, त्याला मदत करणारे, त्याचे मित्र. त्याला एकदम ते सगळे खूप जवळचे वाटले. त्याच्या डोळ्यांनी रियाला शोधलं.
बाकीच्यांच्या थोडं पुढे ती आणि अभिनव उभे होते. तिचा हात अभिनवच्या हातात होता, आणि त्याला तिला काही विचारण्याची कधी गरजही पडणार नाही हे सत्य सोनूनं एव्हाना स्वीकारलं होतं, आणि सोनूच्या हृदयाचा एक भाग तिच्याकरता कायमच दुखणार होता, आणि हे पक्कं ठाऊक असतानाही त्याला त्या क्षणाला खूप छान वाटत होतं.

रिया आणि अभिनवच्या पलीकडे, ढगांच्या दाट आवरणाला लीलया भेदत, आभाळावर स्वतःचा हक्क सांगत वर वर चढणाऱ्या सहस्त्ररश्मीकडे सोनूनं पाहिलं, आणि त्या नव्या प्रकाशानं आपलं अस्तित्वही अंर्तबाह्य उजळून गेलंय असं त्याला वाटलं.

***