'पक्षी'

आज निराळी
सकाळ होती...
एक वेगळा
पक्षी येउन
बसला होता
खिडकीवरती...

नुकता पाउस
पडला होता
पक्षी त्यातच
भिजला होता...

मला वाटले,
त्या पक्ष्याला
घरात घ्यावे...
अन एखाद्या
फडक्याने
कोरडे पुसावे...

कोनाड्याशी
ऊब करावी
पसरुन चादर...
दाणे किंवा
फळ एखादे
खाऊ द्यावे...

पक्षी पण तो
पक्षी होता
'मनुष्य' नव्हता...
ऊन पसरता
पसार झाला
बघता-बघता...