ठसा

ती काळोखाची कडा रुपेरी होते
धूसर काही दूर स्वप्नसे दिसते

वळणावर दिसतो उजेड राहुन गेला
तो सहस्ररश्मी मघाच येथुन गेला

झाडांचे शेंडे संथ केशरी होती
हे दंतुर कुरळे ढग ओसंडुन जाती

ही वेळ अशी वैरीण साधते दावा
हुरहूर पुन्हा टोकरते आतुन जीवा

शस्त्रत्याग आता , युद्ध उद्यावर जाई
लोपल्या क्षणांचा पदरव कानी येई...

शांतता कशी? गोंगाट कुठे तो गेला?
त्या मेळाव्याचा ठसा फक्त उरलेला!

--अदिती
(८ ऑगस्ट २००७,
आषाढ कृ. १० शके १९२९)