आईची मुलं

हल्लीची मूल स्वतःची किती प्रगती करू शकतात या बद्दल मला भरपूर शंका वाटते.मुलाचं समाजात मुक्तपणे वावरण्याच बळ त्यांचे आईवडील स्वतःच हिरावून घेतात अस वाटत.हे सगळं लिहिण्याची वेळ येते आहे कारण माझ्या अनुभवाची मर्यादा उरली नाही आहे.आईची हि लाडकी मूल की मुलांची लाडकी आई त्यांचं प्रेम की त्यांची भीती हे सगळे प्रश्न माझ्या मनात सध्या चालू आहेत.

अनुभव :-

१- आम्ही मित्रमैत्रिणींनी सहलीला जायचं ठरवलं त्याप्रमाणे सर्व बेत आखले.भरपूर चर्चे नंतर सहलीची जागा वॉटरपार्कला जाण्याची ठरली. त्यात एक मित्र म्हणतो मी घरी सांगणार नाही मी कामाच्या निमित्तानेच घराबाहेर पडतो आणि मग तुम्हाला भेटतो. आम्ही म्हटलं ठीक आहे काही हरकत नाही. मग हा म्हणतो माझ्यासाठी टॉवेल आणि कपडे तुम्ही आणा मी घरातून घेऊन निघालो तर आईला कळेल.बापरे हि तर हद्दच झाली. मी विचार करतो या मुलाला महिन्यातले तीन रविवार अर्ध्या दिवसासाठी कामावर जावं लागत त्यातला एक रविवार हा सहलीला आमच्या बरोबर येतो आहे हे जर त्याच्या घरी कळाल तर काय बिघडेल?

२- मला मोबाईल घ्यायचा होता आम्ही ट्रेनमधून प्रवास करत होतो मी एका मित्राला म्हटलं आपण मोबाईल घ्यायला जाऊया. तर हा म्हणतो घरी आईला सांगावं लागेल.मी विचार केला काय फरक पडला असता हा आईला न सांगता माझ्या बरोबर दोन स्टेशन पुढे आला असता तर?

३- माझ्या एका शाळेतल्या मित्राला माझ्या ऑफिसमध्ये काम मिळवून दिल. तसं काम फिरतीच होत घरी यायला उशीर होतो या सगळ्या गोष्टी त्याला माहिती होत्या. ईंटरव्हीवच्या दिवशी हा मला सांगतो मी एकटा नाही जाणार तू पण चल माझ्या बरोबर म्हटलं ठीक आहे.कामावर लागला त्या दिवशी त्याची आई मला म्हणते नीट घेऊन जा रे ह्याला ह्याला प्रवासाची नीट माहिती नाही आहे. मी मनातल्या मनात विचार केला २३ वर्षाच्या या ( लहान )मुलाच बोट घट्ट पकडून ह्याला मुंबईभर नीट फिरवावं अशी ह्याच्या आईची इच्छा आहे का? कामाला लागल्याच्या दुसऱ्या दिवशी माझ्या घरी फोन अरे ह्याला मालाडला जायला सांगितलं आहे हा मालाडला एवढ्या लांब कसा जाणार यावर मी तो कसा जाऊ शकेल ते सांगितलं. तिसऱ्या दिवशी रात्री १० वाजता माझ्या घरी फोन हा अजून आला नाही आमच्या घरच्यांनी सांगितलं निनादला तर घरी यायला कधी तरी १२ १२.३०वाजतात तुम्ही काही काळजी करू नका जास्त काम असेल तर होतो असा उशीर तो येईल घरी त्यांनी ठीक आहे म्हणून फोन ठेवून दिला. चवथ्या दिवशी त्याचा मला फोन आला हे काम सोडतो आहे म्हणून. त्याच्या घरच्यांनी त्याला ते काम सोडायला लावलं कारण घरी यायला १०-११ वाजायचे.यावर म्हणतो काल मी पास काढला मग त्या पासाचे आणि तीन दिवसाचे पैसे हवे मला. माझ्या ऑफिसने देऊ केले. त्यात ह्याच्या ईच्छे प्रमाणे १०० रु कमी होते तर त्यावर ह्याच म्हणणं नाही तीन दिवसाचे मला एवढेच पैसे पाहिजे तर ते मी माझ्या पाकिटातून देऊ केले आणि कटकट संपवली.

४- दुसरा इंजिनिअर आला तो जास्तीत जास्त आठ वाजेपर्यंत काम करू शकत होता.रात्री आठ नंतर त्याच्या आईच मन घरी लागायचं नाही आठ वाजले अजून हा कसा आला नाही आणि इकडे हा आठ वाजले की आई घरी चिंता करत असेल म्हणून ह्याच मन कामात लागणार नाही.हे सुधा न समजण्या पलीकडचं?

५- आमच्या सोसायटीत एका कुटुंबातली दोन मूल खाली कधीच खेळायला नसतात.ना क्रिकेट ना बेटमिंटन कुठल्याच खेळात नाही. एक दिवशी संध्याकाळी सर्व मूल खाली खेळत असताना हा मुलगा बेटमिंटनचे क्लासेस जिमखान्यात लावले आहे तेथे खेळण्यास जात होता. आम्ही सर्व एकमेकांच्या चहेऱ्याकडे बघत होतो सर्वांच्या मनात एकच प्रश्न हा आमच्यात खेळला तर काय बिघडेल? सोसायटीत खेळायचं नाही जास्त कोणाशी बोलायचं नाही फक्त कुठले क्लास लावले की झालं हि कोणाची मानसिकता आहे त्या मुलाची की त्याच्या आईवडीलांची.

आता कंटाळ आला आहे या असल्या अनुभवांचा.आपल्या मुलांना मुंबईतच इतकं जपणाऱ्या या आईवडीलांची मूल परदेशी गेली तर ? पण खरंच हि मूल आपल्या आईला सोडून परदेशी जाऊ शकतील का?

काय भविष्य असेल असल्या मम्मीज बॉय बनलेल्या आणि बनवलेल्या मुलांचं ?