'दोहे'

मराठीत कुणी 'दोहे' लिहिल्याचे ऐकिवात वा वाचनात नाही... दोहे हा एक विशिष्ट छंदातला द्वीपदीचा प्रकार आहे. द्वीपदी असल्यामुळे गजलच्या सुट्या शेराप्रमाणे तिची गोडी चाखता येते. 'दोहे' लिहिण्याचा हा माझाही पहिलाच प्रयत्न.

'दोहे'

१.
दु:खाइतका सोबती दुसरा कुणी नसे
दु:खाचे उपकार मी फेडू सांग कसे?...

२.
जपले आहे आजतो आठवणींना फार
सोसत नाही यापुढे आठवणींचा भार...

३.
एकटेपणी भोगतो तुझेच सारे भास
तू नसताना राहतो तुझा असा सहवास!...

४.
घडते आहे वेगळे, 'विशेष' काही आज
तू येण्याने बदलतो, सभोवती अंदाज...