...हा सुखाचा सोहळा !!

...हा सुखाचा सोहळा !!

चांदणे उधळीत का तू पाहसी माझ्याकडे ?
आतला अंधार मजला त्यामुळे छळतो किती...!
भोवती माझ्या कशाला गीत गुणगुणतेस तू ?
अंतरी काटे़; तरीही श्वास दरवळतो किती !

काय ओसाडीत माझ्या नेमके तू पाहिले ?
अंगणी येऊन माझ्या का अशी फुलतेस तू ?
मंद हेलावा न मी...मी हेलकावे सारखा...
अन् तरीही कोणत्या आशेवरी झुलतेस तू ?

सोड माझा हातही अन् सोड माझी साथही
चार माझ्या पावलांची साथही घेऊ नको...
वाट मी काट्याकुट्यांची, विस्तवाची चालतो...
मजसवे येऊ नको तू मजसवे येऊ नको...

भेट झाली; बोललो...हे सांग आहे का कमी ?
पाहिलेले स्वप्न व्हावे नेहमी साकार का ?
आपल्या तारा मनांच्या छेडल्या गेल्या जरी...
सोबतीला जन्मभर राहील तो झंकार का ?

ओंजळीला गंध आहे, ही फुले सुकली तरी...
रंग आहे तोच आहे, त्या क्षणांचा कोवळा
हा ऋतू आला...तसा जाणारही होताच ना ?
दुःख का ताटातुटीचे...हा सुखाचा सोहळा !!

(रचनाकाल ः ११ फेब्रुवारी २००३)

- प्रदीप कुलकर्णी