...निळसर झाले अंग !

...निळसर झाले अंग !

............................................

मज श्यामसुंदरा, तुझा लागला रंग !
गोरेपण गेले निळसर झाले अंग !

ऐकते जसा मी तव मुरलीचा सूर
दाटते अंतरी निळे निळे काहूर
तू समीप माझ्या...जरी कितीही दूर
विसरुनी स्वतःला तुझ्यात होते दंग !

मी जिथे जिथे, तू तिथे तिथे असतोस...
मजकडे पाहुनी मंद मंद हसतोस...
तू कालिंदीच्या जळातही दिसतोस..
उठतात मनावर निळे निळेच तरंग !

स्वप्नात खुणावे मला निळे आकाश
वेढिती तुझे मज निळे निळे करपाश
ये, ये घनश्यामा, अता नको अवकाश...
ये सार्थ कराया नाव तुझे श्रीरंग !

तू अजून माझा जरी कुणी नाहीस...
हा जीव परी तुजसाठी कासावीस !
मी तुला वाहिले मनमोराचे पीस...
दे तुझा एकदा निळा निळा मज संग !

- प्रदीप कुलकर्णी

रचनाकाल ः २ व ३ जुलै २००४