...एकटी मी !

...एकटी मी !
 
मज कधी भेटेल साजण...एकटी मी !
खायला उठते सुनेपण...एकटी मी !
 
वाटते, आहेस माझ्या भोवताली
अंतरी होतात काही हालचाली
भास हे सारेच रे पण...एकटी मी  !

जो ऋतू येई, नकोसा भासतो रे
एकटीला पाहतो अन् हासतो रे
जाळतो हा जीव श्रावण...एकटी मी !
 
काय माझी चूक...केला मी गुन्हा का ?
यायचा नाहीस तू आता पुन्हा का ?
का दुरावा...काय कारण... एकटी मी !

एकटेपण सांग, कुठवर सांग तोलू ?
एकटी मी काय माझ्याशीच बोलू ?
ये पुढे, काहीतरी म्हण...एकटी मी !

रोज सांगावा तुला मी धाडते रे
रोज मी भिंती मनाच्या पाडते रे
ये सख्या, ये रे, विलक्षण एकटी मी !

- प्रदीप कुलकर्णी

 (रचनाकाल ः ऑगस्ट-सप्टेंबर २००२)